Maharashtra Temperature Update: परभणी 4.6 अंशावर! गोदावरीही दिसेनाशी झाली, शेकोट्या पेटल्या, राज्यभर कुठे काय तापमान? पहा..
Maharashtra Temperature Update: मराठवाड्यात तापमानात कमालीची घट झाली असून गारठ्यानं नागरिक कुडकुडले आहेत.
Maharashtra Temperature Update: राज्यात सध्या गारठ्यानं नागरिकांना हुडहुडी भरली आहे. मराठवाडा, विदर्भासह मध्य व उत्तर महाराष्ट्रातही निचांकी तापमानाच्या नोंदी होत आहेत. सातपुड्यात तर दवबिंदू गोठून गाड्यांच्या, घरांच्या छतावर बर्फ दिसू लागलाय. उत्तरेकडील थंड वाऱ्यांच्या प्रवाहामुळे राज्यात हाडं गोठवणारी थंडी पडलीय. परभणीत आज तापमानाचा पारा 4.6 अंशांवर गेला होता. तर दुसरीकडे धुक्याची चादर ही पाहायला मिळाली. महामार्गावर दाट धुक्यानं दृष्यमानता कमी झाली होती. गोदावरी नदीही धुक्यात हरवल्याचं पहायला मिळालं. बर्फावर जशा वाफा दिसून येतात तसेच चित्र गोदावरीच्या पाण्यावर पाहायला मिळाले आहे.पाण्यावर पूर्णतः धुके दिसत असल्याने गोदावरी दिसेनासी झाली होती. दरम्यान, धुळ्यात आज तापमान पुन्हा 4.1 अंशांवर गेल्याचं दिसलं.थंडींनं सामान्यांच्या जनजीवनावर परिणाम झालाय. शेतात, गोठ्यात शेतकरी आपल्या अंगावर पांघरुण घेऊन जनावरांना शेकोटीच्या उबेला बांधतायत.
मध्य महाराष्ट्रात कुठे काय तापमान?
मध्य महाराष्ट्रात तापमानाचा पारा चांगलाच घसरलाय. अहिल्यानगरमध्ये ७ अंश सेल्सियस एवढ्या किमान तापमानाची नोंद झाली.नाशिक जिल्ह्यात 8.4 अंश सेल्सियस तर पुण्यात 10.6 अंशांवर पारा गेला होता. बहुतांश ठिकाणी 10 ते 12 अंश सेल्सियसपर्यंत पारा गेल्याचे हवामान विभागाने नोंदवले.
सातपुड्याच्या डोंगररांगांमध्ये तापमान घसरले
सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये तापमान घसरलं आहे.नंदूरबार जिल्ह्यात थंडीचा कडाका कायम असून तापमान ७ अंश सेल्सियस वर गेलंय. तोरणमाळ येथे ७ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे.तापी नदीच्या काठावर सारंगखेडा येथे भरलेल्या घोडे बाजारात थंडी पासून बचावासाठी घोड्यांची विशेष काळजी घेतली जात आहे.
मराठवाडा विदर्भ गारठला
मराठवाड्यात तापमानात कमालीची घट झाली असून गारठ्यानं नागरिक कुडकुडले आहेत. आज छत्रपती संभाजीनगरात 10.3 अंश तापमानाची नोंद करण्यात आली असून बीड 9.9, हिंगोली 7, लातूर 13.8, धाराशिव 14 तर परभणी 4.6 अंशांवर गेले होते. विदर्भातही तापमानात प्रचंड घट दिसत असून अकोल्याचा पारा आज 9.6 अंशांवर होता. ही या मोसमातील सर्वात निच्चांकी तापमानाची नोंद आहे. आजच तापमान 10.2 अंश सेल्शिअस असून धुळे शहरासह जिल्ह्याचा तापमानाचा पारा हा चार अंशावर येऊन ठेपला असताना सर्वसामान्यांच्या जनजीवनावर परिणाम झाला आहे. दुभत्या जनावरांची काळजी घेण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी कसरत करावी लागत असून थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिक ऊबदार कपड्यांचा आधार घेताना पाहायला मिळत आहेत.
वाचा: