Maharashtra SSC HSC Board Exam : दहावी-बारावी परीक्षांमधील पेपरफुटी टाळण्यासाठी राज्य शिक्षण मंडळाने घेतला मोठा निर्णय
Maharashtra SSC HSC Board Exam : दहावी-बारावी परीक्षेतील पेपरफुटी टाळण्यासाठी आता विद्यार्थ्यांना परीक्षेच्या वेळेतच प्रश्नपत्रिका देण्यात येणार आहे. याआधी 10 मिनिटे आधी प्रश्नपत्रिका दिली जात होती.
Maharashtra SSC HSC Board Exam : दहावी-बारावी परीक्षांमधील पेपरफुटी टाळण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने मोठा निर्णय घेतला आहे. दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना दहा मिनिटे आधी मिळणार नाही. परीक्षांमधील पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर राज्य शिक्षण मंडळाचा निर्णय घेतला आहे. बोर्डाचे पेपर सुरू होण्याआधीच मोबाईलवर प्रश्नपत्रिका वायरल होत असल्याच्या घटना निदर्शनास आल्याने बोर्डाने हा निर्णय घेतला आहे.
दहावी बारावी परीक्षांच्या दरम्यान विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी आणि त्याप्रमाणे पेपर कसा लिहायचा? हे ठरवण्यासाठी परीक्षा केंद्रावर दहा मिनिटे आधी प्रश्नपत्रिका दिली जात होती. मात्र यंदापासून राज्य शिक्षण मंडळाने ही सुविधा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रश्नपत्रिका मोबाईलवर तसेच अन्य समाज माध्यमातून व्हायरल झाल्याच्या अफवा व काही अंशी अशा घटना निदर्शनास आलेल्या आहेत. पेपरफुटीच्या अशा अफवांमुळे परीक्षार्थ्यांच्या मनात संभ्रम निर्माण होतो. त्यामुळे पेपरफुटीच्या घटनांना प्रतिबंध व्हावा तसेच परीक्षा निकोप, भयमुक्त व कॉपीमुक्त वातावरणात सुरळीत पार पडाव्यात यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
दहावी बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पडण्यासाठी शुक्रवारी कॉपीमुक्त अभियानाची बैठक राज्य शासनाच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. परीक्षा विद्यार्थ्यांच्या जीवनातील एक महत्वपूर्ण टप्पा असल्यामुळे पालक व समाज घटक यांचे या परीक्षांकडे बारकाईने लक्ष असते. मात्र पेपरफुटीच्या अशा अफवांमुळे मंडळाच्या प्रतिमेवर त्याचा परिणाम होतो. त्यामुळे यंदापासून सकाळ सत्रात सकाळी 11 वाजता तसेच दुपारच्या सत्रात 3 वाजता परीक्षा दालनात प्रश्नपत्रिकांचे वितरण करण्यात येणार असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले आहे.
परीक्षा दालनात ज्या क्रमाने विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिकांचे वाटप होईल, त्याच क्रमाने परीक्षा संपल्यानंतर उत्तरपत्रिका गोळा करण्याच्या सूचना सर्व दालन पर्यवेक्षकांना संबंधित परिरक्षक केंद्रसंचालक यांच्याकडून देण्यात येणार आहेत.
परीक्षेला वेळेआधी अर्धा तास पोहोचणे आवश्यक
यंदा प्रश्नपत्रिका वेळेवरच मिळणार असली तरी विद्यार्थ्यांना हॉल तिकिटावर नमूद वेळेप्रमाणे अर्धा तास आधी उपस्थित रहावे लागणार असल्याची माहिती राज्य शिक्षण मंडळाने दिली आहे. सकाळ सत्रात होणाऱ्या परीक्षेची वेळ १०. ३० नोंदवलेली आहे तर दुपारच्या सत्रामध्ये होणाऱ्या पेपरसाठी प्रवेश पत्रावर अडीच ची वेळ आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI