राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना सतर्क, फोडाफोडी टाळण्यासाठी आमदारांची हॉटेलमध्ये रवानगी
आपल्या सरकारने बघता बघता यशस्वी अडीच वर्ष आपण पूर्ण केली आहेत. येणारी अडीच वर्षही आपलीच आहेत. आपल्या सर्वांना मतदानाचा हक्क बजावायचा आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
मुंबई : राज्यसभा निवडणुकीसाठी शिवसेनेनं खास व्यूहरचना आखली आहे. शिवसेनेच्या आमदारांना विश्वासात घेऊन त्यांना हॉटेलमध्ये सुरक्षितही ठेवलं जाणार आहे. राज्यसभा निवडणुकीची शिवसेनेची रणनीती 'माझा'च्या हाती आलीय. या रणनीतीनुसार हॉटेलमध्ये शिवसेनेच्या आमदारांवर शिवसैनिकही नजर ठेवणार आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, आपल्या सरकारने बघता बघता यशस्वी अडीच वर्ष आपण पूर्ण केली आहेत. येणारी अडीच वर्षही आपलीच आहेत. आपल्या सर्वांना मतदानाचा हक्क बजावायचा आहे. यासाठी कुणालाही घाबरायचं नाही जुमानायचं नाही, सामान्य शिवसैनिकांला न्याय द्यायचा आहे. संजय पवार यांना राज्यसभेवर पाठवायचं आहे. संजय पवार हे एक शिवसेनेचे कट्टर कार्यकर्ते आहेत. एका कट्टर शिवसैनिकासाठी आपल्याला ही लढाई लढायची आहे.
राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतं फुटू नयेत म्हणूनशिवसेनेकडून खबरदारी घेण्यात आली आहे. उद्धव ठाकरेंसोबतच्या बैठकीनंतर सर्व आमदार हॉटेलकडे रवाना झाले आहेत. शिवसेना आमदारांच्या बैठकीत काही अपक्ष आमदारही उपस्थित होते. वर्षावर झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी आमदारांना विजयाचा आत्मविश्वास दिला आहे. शिवसेनेकडून आपल्या आमदारांसाठी व्हिप जारी करण्यात आला आहे.
राज्यसभेच्या सहा जागासाठी येत्या 10 जून रोजी निवडणूक होणार आहे. सहा जागासाठी सात उमेदवार रिंगणात असल्यामुळे ही निवडणुक मोठी रंगतदार होणार आहे. शिवसेना आमदार आणि समर्थक लहान पक्ष तसेच अपक्ष आमदारांची फोडाफोडी टाळण्यासाठी शिवसेनेने बैठक बोलवली होती. 10 जून पर्यंत सर्व आमदारांच्या सुरक्षेसाठी हॉटेलमध्ये रहाण्याची व्यवस्था शिवसेनेकडून करण्यात आली आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात तब्बल 18 वर्षानंतर राज्य सभेची निवडणूक होत आहे. निवडणूक टाळण्यासाठी महाविकास आघाडीकडून प्रयत्न करण्यात आले. पण त्यांना अपयश आले. आता निवडणूक होणार यावर शिक्कामोर्तब झालेय. या निवडणूकीत कोणताही दगा फटका होऊ नये, त्यामुळे महाविकास आघाडीने सर्व आमदारांना एकत्र हॉटेलमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतलाय. शिवसेना 55 आमदार, काँग्रेस 44 आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे 54 आमदार (अनिल देशमुख आणि नवाब मलिक वगळता), त्याशिवाय सपोर्ट करणारे काही आमदार... या सर्वांची हॉटेलमध्ये राहण्याची सोय करण्यात आली आहे.