कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मांढरदेवीच्या काळूबाईची यात्रा रद्द
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील प्रचलित असलेल्या मांढरदेवी गडावरील काळुबाईची यात्रा यंदा रद्द करण्यात आली आहे.
सातारा : ओमायक्रोनचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सातारा जिल्ह्यातील मांढरदेवी यात्रा रद्द करण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. या यात्रेला महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यातील भाविक मोठ्या प्रमाणात उपस्थित राहतात. त्यामुळे मोठ्या संख्येने येणाऱ्या भाविकांना रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे
यंदाची यात्रा 16, 17 आणि 18 जानेवारी नियोजीत आहे. यंदाच्या यात्रेचा मुख्य दिवस 17 जानेवरी आहे. मात्र देवीच्या दर्शनासाठी येणारे भाविक यात्रेअगोदर 15 दिवस आणि यात्रेनंतर 15 दिवस गर्दी करत असतात. त्यामुळे 10 जानेवारी ते 1 फेब्रुवारी दरम्यान मांढरदेवी परिसरात कलम 144 लागू करण्यात आले आहे
मांढरदेवीची यात्रा रद्द झाल्याने स्थानिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात आला आहे. आता सलग येणाऱ्या यात्रा ही रद्द होण्याची शक्यता आहे. तसेच जिल्हाधिकाऱ्यांकडून तसे संकेत देण्यात आला आहे. मांढरदेव गडावरील काळूबाई नवसाला पावणारी देवी अशी आख्यायिका असल्याने राज्यभरातील लाखो भाविक या ठिकाणी देव दर्शनासाठी येत असतात. यात्रा काळात मांढरदेवी गडावर सुमारे 7 ते 8 लाख भाविक देवीच्या दर्शनासाठी येत असतात.
काय आहेत नवे नियम?
- मांढरदेवी गडावर गर्दी होईल अशा धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम किंवा मिरवणूकांच्या आयोजन करण्यास बंदी घातली आहे
- यात्रेदरम्यान धार्मिक कार्यक्रम पुजारी आणि ट्रस्टचे सदस्य यांना परवानगी
- यात्रा कालावधीत ट्रस्टी आणि पुजारी वगळून इतर व्यक्तींना दर्शनासाठी बंदी
- यात्रा काळात भाविकांना तसेच स्थानिकांना तंबू उभारण्यास बंदी
- तसेच पशू आणि पक्षी यांचा बळी देण्यास बंदी घालण्यात आली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या सप्तश्रृंगी देवीच्या दर्शनासाठी 10 वर्षांखालील मुलं आणि 65 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना प्रवेशबंदी करण्यात आलीय. वणीच्या सप्तश्रृंगी देवस्थान समितीने हा निर्णय घेतलाय. गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने खबरदारी म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
इतर महत्त्वाच्या बातम्या :