'कुछ मिठा हो जाए'... इस्लामपुरातील कार्यक्रमात जयंत पाटील यांच्याकडून सदाभाऊंना कॅडबरी भेट
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माजी मंत्री सदाभाऊ खोत यांना एका कार्यक्रमात कॅडबरी दिली. या प्रसंगानंतर आता दोघांमधील कटूता दूर होणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
सांगली : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) हे पक्षीय विरोधक इस्लामपूर नगरपालिकेच्या एका कार्यक्रमाच्या निमित्ताने एका व्यासपीठावर एकत्र आले होते. यावेळी जयंतरावांनी सदाभाऊंना कॅडबरी भेट देत दोघांमधील कटूता दूर करत ‘कुछ मिठा हो जाए’चा संदेश यानिमित्ताने दिली. वास्तविक ही कॅडबरी एका चिमुकलीने जयंत पाटील यांना भेट दिली होती. पण जयंत पाटलांनी ती कॅडबरी सदाभाऊना ऑफर केली.
इस्लामपूर नगरपालिकेच्या मलनिस्सारण प्रक्रिया केंद्र, पंपिंग स्टेशन व ड्रेनेज नेटवर्क कामाचा शुभारंभ काल मंत्री पाटील, आमदार खोत आणि खासदार धैर्यशील माने यांच्या उपस्थितीत झाला. जयंतरावांनी शहरातील परिस्थिती मांडताना अचानक सदाभाऊंकडे मोर्चा वळवला. 'तुम्ही तिकडे वरती राहता, आम्हाला जेवायला केव्हा बोलावताय..जेवण राहु द्या, किमान चहा-पाण्याला बोलवा.. आम्ही येताना सोबत खासदारांना आणतो, कारण मागच्यावेळी तुम्ही त्यांचा प्रचार केला होता'. असे म्हणताच हशा पिकला.
यावेळी व्यासपीठावर जयंत पाटील याना छोट्याश्या मुलींनी कॅडबरी आणून दिली. तीच पाटील यांनी सदाभाऊंना कॅडबरी खायला दिली. शिवाय आधी भाषणासाठीही आग्रह केला. या कार्यक्रमात दोघांच्यात खेळीमेळीचे वातावरण दिसून आल्याने याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. इस्लामपूर नगरपालिकेची निवडणूक देखील तोंडावर आली आहे. असताना जयंतराव यांच्याकडून सदाभाऊ खोत यांना कॅडबरी भेट देणे यावर अनेक राजकीय अर्थ काढले जात आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या :