Sangli Leopard Scare: सांगलीत घुसला बिबट्या! पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न, शहरात खळबळ
Sangli Leopard Scare: सांगली शहरात बिबट्या घुसल्याने खळबळ उडाली आहे. राजवाडा चौक याठिकाणी हा बिबट्या दबा धरून बसला असून त्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाकडून प्रयत्न सुरू आहेत.
सांगली : सांगली शहरातील राजवाडा चौक परिसरात आज सकाळी बिबट्याचे दर्शन झाल्याने खळबळ उडाली आहे. सकाळी सव्वासातच्या सुमारास एका चहावाल्यासह काही नागरिकांना बिबट्याचे दर्शन झाले. दरम्यान बिबट्या अद्यापही रॉकेल लाईन परिसरातील एका पडक्या घरात लपला असून वनविभागाकडून त्याला पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सांगली शहरात बिबट्या घुसल्याने खळबळ उडाली आहे. राजवाडा चौक याठिकाणी हा बिबट्या दबा धरून बसला असून त्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाकडून प्रयत्न सुरू आहेत. कोल्हापुरहून या बिबट्याला पकडण्यासाठी बेशुद्ध करणाऱ्या बंदुकीसह विशेष पथक दाखल झाले आहे.
सकाळपासूनच पोलिसांनी राजवाडा चौक ते पटेल चौकाकडे जाणारे रस्ते वाहतुकीसाठी बंद केले होते. सकाळी साडेनऊच्या सुमारास वनविभागाच्या पथकाने त्या पडक्या घराजवळ जाळी बांधली. तर पडक्या घराच्या दुसर्या बाजूकडूनही वनविभागाने जाळी लावली आहे. बिबट्याला पकडण्यासाठी कोल्हापूरहून बचाव पथकाला पाचारण करण्यात आले आहे. पडक्या घरात त्याचा शोध घेऊन त्याला बेशुद्ध करून पकडण्यात येणार असल्याचे ढाणके यांनी सांगितले. शिवाय त्याच्या पायाच्या ठस्यावरून तो तीन वर्षांचा असावा, असा अंदाजही वन अधिकारी यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान सकाळी आठ वाजल्यापासून बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाचे प्रयत्न सुरू आहेत.
कुत्र्याची केली शिकार
एका टेरेसवर बिबट्याने कुत्र्याची शिकार केल्याचे दिसून आले. वनविभागाने पंचनामा करून कुत्र्याचे शव ताब्यात घेतले आहे. बिबट्याने पूर्ण रस्ता ओलांडून सुमारे आठ ते दहा फूट उंच असलेल्या भिंतीवरून उडी मारून पडक्या घरात प्रवेश केल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. हा बिबट्या सांगलीत कुठून आला, हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही.
बिबट्याला पकडण्यासाठी कोल्हापूरहुन विशेष पथक दाखल
सांगली शहरांमध्ये मध्यवर्ती वस्तीत बिबट्या घुसल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. पहाटेच्या सुमारास हा बिबट्या शहरात दाखल झाला असून सकाळी राजवाडा चौक या ठिकाणी बिबट्याचे दर्शन झाला आहे. तरी या ठिकाणी असणाऱ्या एका व्यापारी संकुल मध्ये कुत्र्याला ठार करण्यात आल्याची बाब निदर्शनास आली आहे. या ठिकाणीच बिबट्याचे ठसे आढळून आले आहेत.
नागरिकांनी काळजी घ्यावी
वनविभाग पोलीस प्रशासन आणि महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या विभागाच्यावतीने रेस्क्यू ऑपरेशन सुरू करत बिबट्याला जेरबंद करण्याचे मोहीम चालू करण्यात आलेली आहे. तसेच त्याला पकडण्यासाठी कोल्हापूरहून विशेष पथक सांगलीत दाखल झालेलं आहे. ते बेशुद्ध करणारे बंदुकी सह 14 जणांचे पथक आणि प्राणिमित्र बिबट्याचा शोध घेऊन जेरबंद करण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान घटनास्थळी सापडलेल्या ठशांवरून हा तीन वर्षाचा बिबट्या असून त्याला जेरबंद करण्यासाठी वन विभाग प्रयत्न करत आहे, मात्र नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन वन अधिकारी प्रमोद धानके यांनी केले आहे.