Ram Navami 2023 : आज देशभरात राम नवमीचा उत्साह, शिर्डीच्या साई मंदिरात दर्शनासाठी भाविकांच्या रांगा
Ram Navami 2023 : आज देशभरात राम नवमीचा (Ram Navami) उत्साह पाहायला मिळत आहे. राज्याच्या विविध भागातील मंदिरामध्ये भक्तांनी दर्शनासाठी रांगा लावल्या आहेत.
Ram Navami 2023 : आज देशभरात राम नवमीचा (Ram Navami) उत्साह पाहायला मिळत आहे. यावर्षीची राम नवमी धुमधडाक्यात साजरी केली जात आहे. यानिमित्त अयोध्येत वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे. तसेच महाराष्ट्रात नागपूर, नाशिक, सातारा, शिर्डी, शेगाव, मुंबईसह राज्यभर वेगवेगळ्या ठिकाणी राम नवमी साजरी केली जात आहे. रामनवमीच्या उत्सवाच्या मुख्य दिवशी शिर्डीतील (Shirdi) साई मंदिरात साई नामाच्या जयघोषानं परिसर दुमदुमून गेला आहे. आज पहाटे काकड आरतीपासूनच शिर्डीत दर्शनासाठी रांगा लागल्या आहेत. राज्यभरातून शेकडो पायी पालख्या शिर्डीत दाखल झाल्या आहेत.
राम नवमीनिमित्त राज्याबाहेरील साईभक्त मोठ्या संख्येने शिर्डीत दाखल झाले आहेत. साईंच्या दर्शनासाठी गर्दी केली आहे. आज सकाळपासूनच दर्शनाच्या रांगा लागल्या आहेत. आज दिवसभर ही गर्दी अशीच राहणार आहे. याचबरोबर सर्व भक्तांना दर्शन घेता यावं यासाठी आज साई मंदिर रात्रभर खुले ठेवण्याचा निर्णय साईबाबा संस्थांनी घेतला आहे.
शेगावमध्ये आज दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम
बुलढाणा जिल्ह्यातील शेगावात संत गजानन महाराज मंदिरात श्री राम जन्मोत्सव उत्सवाला सुरूवात झाली आहे. साडेपाचशे दिंड्यांसह दोन लाख भाविक शेगावात दाखल झाले आहेत. संत गजानन महाराज मंदिरात आज दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल आहे. राम नवमीमित्त शेगाव येथील संत गजानन महाराज मंदिरात राम नवमी उत्सवाचा मुख्य दिवस आज साजरा होत आहे. संत गजानन महाराज हयात असताना त्यांनी याठिकाणी राम नवमी उत्सवास प्रारंभ केला होत. त्यानुसार गुढी पाडव्याच्या दिवसापासून या उत्सवास प्रारंभ होतो. आजही रामनवमी उत्सव संत गजानन महाराज मंदिरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो.
शेगावमध्ये राज्यभरातून दोन लाख भाविक दाखल
राज्यभरातून शेकडो दिंड्या शेगावात दाखल झाल्या असून, आज सकाळी सात वाजता आरतीने रामनवमी मुख्य उत्सवास सुरूवात होणार आहे. दुपारी रथ, अश्वासह पालखीची नगर परीक्रमा असे दिवसभर अनेक कार्यक्रम मंदिरात होणार आहेत. मुख्य आरती दुपारी बारा वाजता असणार आहे. रामनवमी उत्सवासाठी जवळपास साडेपाचशे दिंड्या आणि दोन लाख भाविक शेगावात दाखल झाले आहेत. कोरोनानंतर पहिल्यांदाच यावर्षी रामनवमीचा उत्सव मोठ्या उत्साहात शेगावात साजरा होत आहे. राज्यासह शेजारील मध्यप्रदेश आणि गुजरातमधील भाविकही शेगावात दाखल झाले आहेत. आज योगायोगानं गुरुपुष्यामृतही असल्यानं दिवसभर शेगावात उत्साहाच वातावरण बघायला मिळत आहे.
महत्त्वाच्या बातम्या: