(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Rains Live Updates : विदर्भासह मराठवाड्यात काही ठिकाणी जोराचा पाऊस, नदी नाल्यांना पूर
Maharashtra Rains Live : विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागात जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. या पावसामुळं नदी नाल्यांना पूर आला आहे.
LIVE
Background
Maharashtra Rains Live Updates : सध्या राज्याच्या काही भागात मुसळधार पाऊस कोसळताना दिसत आहे. या पावसामुळं अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. नदी नाल्यांना पूर आल्यानं नागरिकांना मोठा अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषत: मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. शेती पिकांचं मोठं नुकसान झाल्यानं शेतकरी संकटात सापडला आहे. दरम्यान, मुंबई आणि परिसरात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. तसेच लातूर, औरंगाबाद, जिल्ह्यातही पावसानं धुमाकूळ घातला आहे. राज्यात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.
मराठवाडा आणि विदर्भात पावसानं हाहाकार घातला आहे. काही जिल्ह्यात जनजीवन विस्कळीत झालं आहे. शेतकऱ्यांच्या पिकांना मोठा फटका बसला आहे. पिकांचं मोठं नुकसान झाल्यानं शेतकरी संकटात सापडला आहे. दरम्यान, राज्यात पावसाचा जोर कमी झाला असला तरी काही ठिकाणी मात्र जोराचा पाऊस होताना दिसत आहे. या पावसामुळं अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे.
लातूर पाऊस
लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील काही भागात तुफान पाऊस झाला या पावसामुळं सर्वत्र पाणीच पाणी झाल्याचं पाहायला मिळालं. ओढ्यावरील पुलाचा अंदाज न आल्यामुळं दुचाकीस्वार गेल्याची घटना देखील घडली. औसा तालुक्यातील लामजाना, अपचुंदा, जयनगर परिसरात अवघ्या तीस मिनिटात ढगफुटी झाल्यासारखा पाऊस पडला. या पावसामुळं छोट्या मोठ्या ओढ्यांना आणि नाल्यांला प्रचंड पाणी आले.
नागपूर पाऊस
नागपूरमध्येही देखील पाऊस पडत आहे. अनेक भागात दमदार पावसानं हजेरी लावली. शहरातील काही भागात मेघगर्जनेसह तासभर पाऊस बरसला. पावसाच्या या धुवाधार बॅटिंगमुळे शहरातील रस्ते आणि चौक जलमय झाल्याचे पाहायला मिळाले. तासभर मुसळधार बरसल्यावर नंतर पावसाची रिपरिप सुरु होती. जागोजागी पाणी साचलं होतं. त्यामुळं नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. पावसामुळं शहरातील एकूणच दैनंदिन जनजीवन विस्कळीत झाले होते. प्रादेशिक हवामान विभागाने विदर्भात आज जोरदार पावसाचा यलो अलर्ट दिलेला आहे. विशेषतः गोंदिया, भंडारा, गडचिरोली व यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
हिंगोली जिल्ह्यातील ईसापूर धरण 91 टक्के भरलं, दोन दरवाज्यातून पाण्याचा विसर्ग केला जाणार
हिंगोली जिल्ह्यातील ईसापूर धरण 91 टक्के भरले आहे. त्यामुळं या धरणाचे दोन दरवाजे आज उघडले जाणार आहेत. पैनगंगा नदीवरील ईसापूर धरण भरण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळं दोन दरवाजे वीस सेंटी मीटरने उघडले जाणार असून, या दरवाजामधून 1295 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग केला जाणार आहे. तर पैनगंगा नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
पावसाचा जोर कमी झाल्यानं परशुराम घाट सर्वच वाहनांसाठी 1 ऑगस्टपासून खुला होणार
परशुराम घाट सर्वच वाहनांसाठी 1 ऑगस्टपासून 24 तास खुला होणार आहे. पावसाचा जोर कमी झाल्याने प्रशासन निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. दरडी कोसळण्याच्या धोक्यामुळं केवळ दिवसा घाटातून अवजड वाहतूक सुरु होती. आता 1 ऑगस्टपासून रात्री देखील अवजड वाहनांना घाटातून एन्ट्री मिळणार आहे. सायंकाळी 6 ते सकाळी 7 वाजेपर्यत अवजड वाहनांसाठी हा घाट बंद असतो.
गोंदिया जिल्ह्यात धुक्याची चादर
सततच्या पावसामुळं गोंदिया जिल्ह्यात पहाटेच्या सुमारास धुक्याची चादर पसरली होती. निसर्गाच्या मायेचा अद्भुत देखावा पहाटे फिरायला गेलेल्या लोकांना पहायला मिळाला. तर दूसरीकडे धुक्यामुळं वातावरणात आल्हाददायी गारवा निर्माण झाला आहे. एका थंड ठिकाणी आल्याचा अनुभव गोंदियाकरांनी मिळाला.