Maharashtra Rains : राज्यात अनेक जिल्ह्यांत पावसाची हजेरी, 20 जिल्ह्यांना यलो अलर्ट, बळीराजाची चिंता वाढली
Maharashtra Rain Update : राज्यभरात पुढचे दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्राच्या प्रभावामुळं महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे.
Maharashtra Rain Update : राज्यात पुढचे दोन दिवस पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्राच्या प्रभावामुळं विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. आज विदर्भ, मराठवाड्याला यलो अलर्ट देण्यात आलाय. त्याचबरोबर नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगावसह इतर काही जिल्हांत देखील पावसाची शक्यता आहे.परभणी, हिंगोली, नांदेड जालना, वाशिम, अकोला, अमरावती, नागपूर, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली, भंडारा गोंदिया, औरंगाबाद, बीड या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. परतीच्या पावसानं मोठं नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
अकोला शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात काल जोरदार पावसाने हजेरी लावली. अकोला जिल्ह्यातल्या तेल्हारा तालुक्यातील दानापूर भागात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. तर दहा दिवसांच्या उघडीपनंतर वाशिम जिल्ह्यात काल परतीच्या पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी तारांबळ उडाली. परतीच्या पावसामुळे काढणीला आलेल्या पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे. तसेच, बुलढाणा जिल्ह्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. बुलढाणा जिल्ह्यातल्या शेगाव, संग्रामपूर, मोताळा, लोणार आणि मेहकर तालुक्यात परतीच्या पावसाने हजेरी लावली. काढणीला आलेलं पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली आहे.
चंद्रपूर शहर आणि जिल्ह्यात सर्वत्र पावसानं हजेरी लावली. काल रात्रीपासून चंद्रपूर जिल्ह्यात ढगाळ वातावरण होतं. त्यानंतर काल दुपारपासून पावसाला सुरुवात झाली. या पावसामुळे सोयाबीन, कापूस आणि धान पिकाचं नुकसान होण्याची शक्यता आहे. तर यवतमाळ जिल्ह्यात आलेल्या मुसळधार पावसानं शेतातील पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. हाता तोंडाशी आलेला घास मातीमोल केल्याचे चित्र घाटंजी तालुक्यात पाहायला मिळालं. या भागात मुसळधार पावसाने कापसाचे पीक ओले झाले. तर, काही ठिकाणी ते पाण्यात वाहून गेले त्यामुळे शेतकऱ्याचे मोठं नुकसान झाले आहे.
परभणीत रात्रीपासून संततधार पाऊस; काढलेल्या सोयाबीनच्या नुकसानीची शक्यता
परभणीत काल रात्रीपासून परतीच्या पावसाला सुरुवात झालीय. परभणी शहरासह जिल्हाभरात संततधार पाऊस सुरु आहे.त्यामुळे सोयाबीन काढणी थांबली असुन ज्या शेतकऱ्यांनी आपले सोयाबीन काढले आहेत त्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. अगोदरच यंदा परभणी जिल्ह्यात सरासरीच्या जास्त पाऊस झालाय ज्यात साडे चार लाख हेक्टर वरील नुकसान झालेले आहे त्यातून जे काही वाचले आहे ते पदरात पाडून घेण्याचा शेतकरी प्रयत्न करत आहेत मात्र पुन्हा पाऊस सुरु झाल्याने ते ही हाथी लागण्याची शक्यता आता मावळली आहे.