(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Rain Updates : राज्यात अतिवृष्टीचा इशारा; अनेक ठिकाणी शाळा बंद, जाणून घ्या
Maharashtra Rain : येत्या दोन दिवसामध्ये पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता, अनेक ठिकाणच्या शाळा बंद, तर मुंबई विद्यापीठाच्या आज होणाऱ्या सर्व परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. जाणून घ्या
Maharashtra Rain Updates : राज्यात पुढच्या 48 तासांसाठी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. येत्या दोन दिवसामध्ये पावसाचा हा जोर कायम राहण्याची शक्यता असून अनेक ठिकाणच्या शाळा बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. पुणे, कोल्हापूर, सातारा या ठिकाणी हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे. तर अनेक ठिकाणी नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जाणून घ्या कोणत्या भागात शाळा राहणार बंद
'या' महापालिका क्षेत्रातील शाळांना सुट्टी
आज हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिल्यानंतर ठाणे, पालघर, नवी मुंबई, पनवेल या महापालिका क्षेत्रातील शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. तसेच मुंबई विद्यापीठाच्या आज होणाऱ्या परीक्षा सुद्धा रद्द करण्यात आले आहेत. तर मुंबई महानगर क्षेत्रातील मुंबई वगळता सर्व ठिकाणी शाळांना सुटी देण्यात आल्याचं मुंबई महापालिका प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आलं आहे.
अतिवृष्टीमुळे मुंबई विद्यापीठाच्या आज होणाऱ्या सर्व परीक्षा रद्द
सतत होत असलेल्या अतिवृष्टीमुळे मुंबई विद्यापीठाने आज 14 जुलै 2022 रोजीच्या सर्व परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या परीक्षेची नवीन तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल, असे विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. विनोद पाटील यांनी सांगितले. उद्या म्हणजेच 15 जुलैला मुख्यतः इंजिनिअरिंग विद्याशाखेच्या परीक्षा आहेत. त्याचबरोबर इतरही विद्याशाखेच्या परीक्षाही रद्द करण्यात आल्या आहेत. अशी माहिती उपकुलसचिव विनोद माळाळे यांनी दिली आहे.
ठाण्यात आज-उद्या शाळा बंद
ठाणेमधील अतिवृष्टीची परिस्थिती लक्षात घेवून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून जिल्ह्यातील इयत्ता 12वी पर्यंतच्या शाळांना 14 आणि 15 जुलै रोजी अशी दोन दिवसांची सुटी जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष राजेश नार्वेकर यांनी जाहीर केली आहे.
पुणे जिल्ह्यात शाळा बंद (Pune Rain Update)
पुढील 48 तासात पुणे जिल्ह्यात अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जिल्ह्यातील घाट परिसरात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मुसळधार पावसामुळे पुण्यातील शाळा बंद राहणार आहेत. पावसामुळे शहराच्या सखल भागात पाणी साचतंय. त्यामुळे आज दुपारपासून उद्या सायंकाळपर्यंत शाळा भरणार नाहीत. प्रशासनानं हा निर्णय घेतलाय. हवामान विभागाकडून पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट देखील देण्यात आला आहे.
पिंपरी चिंचवडमधील शाळा आज बंद (Pimpri Chinchwad)
पुण्यासोबतच पिंपरी चिंचवडमधील शाळा उद्याही बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या परिसरात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, पुणे जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
कोल्हापूर आणि साताऱ्यामध्ये शाळा बंद (Kolhapur Satara Rain Updates)
कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यात पुढील 48 तासात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. मुंबईत देखील मोठ्या प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता आहे. कोल्हापूर आणि सांगलीमध्ये मुसळधार पाऊस सुरूच असून पंचगंगा आणि कृष्णा नदीच्या पातळीत वाढ झाली आहे. साताऱ्यामध्ये कोयनेच्या क्षेत्रामध्ये जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. अतिमुसळधार पाऊस पडलेल्या ठिकाणी शाळा बंद ठेवण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.
रायगडमध्येही शाळा बंद (Raigad Rain)
गेल्या दोन दिवसांपासून रायगड जिल्ह्यात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे दोन दिवस शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ज्याठिकाणी मुसळधार पाऊस असेल, तिथे शाळा बंद ठेवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
नांदेड जिल्ह्यातील शाळांना सुट्टी (Nanded)
गेल्या चार दिवसांपासून नांदेड जिल्ह्यात सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. नांदेड जिल्ह्यात बुधवारी सकाळी 8.20 वाजता संपलेल्या पावसानंतर, गेल्या 24 तासात सरासरी 118 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 510.30 मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. त्यामुळे पूरपरिस्थिती पाहता जिल्ह्यातील शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.
संबंधित बातम्या
Maharashtra Rain Updates : राज्यात पावसाचा जोर कायम; पुणे, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यांना रेड अलर्ट तर अनेक ठिकाणी सर्तकतेचा आदेश