आज कुठं रेड तर कुठं ऑरेंज अलर्ट, 'या' जिल्ह्यांना सावधानतेचा इशारा, जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज
आजही हवामान विभागानं राज्यात मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. आज राज्यातील काही भागात रेड अलर्ट (red alert) तर काही भागात ऑरेंज अलर्ट जारी केलाय.
Maharashtra Rain News : सध्या मुंबईसह (Mumbai) राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस (Heavy Rain) कोसळत आहे. काही ठिकाणी पावसामुळं वाहतुकीवर परिणाम झाल्याचं देखील पाहायला मिळत आहे. दरम्यान, आजही हवामान विभागानं राज्यात मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. आज राज्यातील काही भागात रेड अलर्ट (red alert) तर काही भागात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. जाणून घेऊयात हवामान विभागाचा सविस्तर अंदाज.
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार राज्यातील 6 जिल्ह्यामध्ये आज पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामध्ये कोकणातील रत्नागिरी या जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर दुसरीकडं पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात रेड अलर्ट देण्यात आला आहे. तसेच विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या चार जिल्ह्यांमध्ये देखील पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. म्हणजे या सहा जिल्ह्यांमध्ए आज अतिमुसळधार किंवा अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.
रेड अलर्ट म्हणजे काय?
जेव्हा एखाद्या भागात अतिमुसळधार किंवा अतिवृष्टीचा अंदाज असतो अशा वेळी रेड अलर्ट जारी करण्यात येतो. रेड अलर्ट म्हणजे मोठ्या संकटाची शक्यता. त्यामुळे नागरिकांनी शक्यतो घरी राहण्याच्या सूचना दिल्या जातात.
मुंबईसह 'या' जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी
दरम्यान, मुंबईसह राज्यातील ठाणे, पालघर, पुणे आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर विदर्भातील अमरावती, वर्धा आणि नागपूर या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर विदर्भातील इतर काही जिल्ह्यांसह मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये आज पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच कोल्हापूर आणि अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये देखील पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मुंबईत सकाळपासून मुसळधार पाऊस सुरु
हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार मुंबईत सध्या जोरदजार पाऊस सुरु आहे. पश्चिम उपनगरात आज सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. जोरदार पाऊस असल्यामुळं अंधेरी सबवे खाली दोन ते तीन फूट पाणी भरले आहे. त्यामुळं अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. पश्चिम उपनगरात आज सकाळपासून जोरदार पाऊस असल्यामुळे सखल भागांमध्ये देखील पाणी भरायला सुरुवात झाली आहे. अंधेरी सबवे बाहेर पोलिसांनी बॅरिकेटिंग करून वाहतुकीसाठी बंद केला आहे. त्यासोबत पोलीस आणि पालिकेचा लाईफ गार्ड यांचा अंधेरी सबवे बाहेर बंदोबस्त तैनात करण्यात आले आहेत.
महत्वाच्या बातम्या:
Pune Water : दिलासादायक! शहराची पाण्याची चिंता मिटली; खडकवासला धरणक्षेत्रात पाणीसाठा वाढला, वाचा आजची आकडेवारी