Maharashtra Rain : मुंबईसह राज्यातील काही भागात पावसाची हजेरी, आज कोकणात पावसाचा यलो अलर्ट
Maharashtra Rain : राज्यातील काही भागात पावसानं (Rain) हजेरी लावली आहे. तर काही भागात अद्यापही पावसाची प्रतीक्षा कायम आहे.
Maharashtra Rain : मुंबईसह (Mumbai) राज्यातील काही भागात पावसानं (Rain) हजेरी लावली आहे. तर काही भागात अद्यापही पावसाची प्रतीक्षा कायम आहे. पावसाळा सुरु होऊन एक महिना होऊन गेला तरी पाऊस नसल्यानं शेतकरी (इोीसाीे) चिंतेत असल्याचं चित्र दिसत आहे. दरम्यान, मुंबईसह उपनगर, ठाणे, पुणे तसेच कोकणातील जिल्ह्यात पावसानं चांगली हजेरी लावल्याचं चित्र दिसत आहे. हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार आज कोकणात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच पश्चिम पुणे जिल्ह्यातही पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळं नारिकांना खबरदारी बाळगण्याचं आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आलं आहे.
रायगडमध्ये जोरदार पावसाची हजेरी
कोकणात सध्या पावसाची संततधार सुरु आहे. त्यामुळे बळीराजा सुखावला आहे. सतत पडत असलेल्या पावसामुळे शेत चिखलमय झाल्याने नांगरणीत शेतकरी गुंतलेला पाहयला मिळतोय..
सध्या कोकणातील गावागावांत पावसाने उगवलेल्या हिरव्यागार गवतामधून बळीराजा शेत नांगरताना निसर्गाचं देखण रुप पाहायला मिळतय. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार राजयगड जिल्ह्यामध्येही जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. खार बंदीस्ताच्या बंधाऱ्याला तडे गेल्यानं परिसरातील 48 गावांना धोका निर्माण झाला आहे. त्यामुळं गावकरी संतप्त झाले आहेत. दरम्यान, आजही हवामान विभागानं रायगड जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे.
भिवंडी शहरात पावसाची दमदार हजेरी
भिवंडी शहर तसेच ग्रामीण भागामध्ये मागील दोन ते तीन दिवसांपासून पाऊस कोसळत आहे. या जोरदार पावसामुळे भिवंडी शहरातील पटेलनगर परिसरात गुडघाभर पाणी साचल्याचे चित्र दिसून आले. त्यामुळं नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. काही तासांच्या पावसात जर भिवंडी शहरातील एका परिसराची अशी अवस्था असेल तर पावसाचा जोर कायम राहिला तर भिवंडी शहरातील अनेक भागात मोठ्या प्रमाणात पाणी भरण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळं प्रशासनाने जागोजागी सखल भागात साचणारे पाणी निचरा कसा होईल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
पालघर जिल्ह्यात गेल्या आठ दिवसापासून पाऊस सुरु
पालघर जिल्ह्यात गेल्या आठ दिवसापासून सातत्याने पाऊस सुरू आहे. गेल्या तीन दिवसापासून मुसळधार पाऊस सुरु आहे. याचा परिणाम म्हणून पालघर जिल्ह्यातील नदी नाले ओसंडून वाहत आहेत. तर जिल्ह्यातील प्रमुख धरणांच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे पालघर जिल्ह्यातील प्रमुख शहरांसह वसई विरार महानगरपालिकेच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटला आहे. मात्र, हा पाऊस सुरु असताना काही शेतकऱ्यांनी भात पेरण्या केल्या होत्या, त्या मुसळधार पावसामुळे वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तर आत्ता ज्या भात पेरण्या होणार आहेत त्याही खोळंबलेल्या आहेत. जिल्ह्यातील सूर्या वैतरणा पिंजाळ या प्रमुख नद्या भरुन वाहत असून जनजीवन विस्कळीत होण्याची स्थिती निर्माण झाली आहे. तर शेतकऱ्यांवर सुद्धा दुबार पेरण्या करण्याचे संकट ओढवले आहे.