Maharashtra Rain Live Updates : राज्याच्या विविध भागात पावसाची जोरदार हजेरी, आजही मुसळधार पावसाचा इशारा
Maharashtra Rain Live Updates : राज्याच्या विविध भागात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. या पावसामुळं काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुंबईत देखील जोरदार पाऊस पडत आहे.
LIVE
Background
Maharashtra Rain Live Updates : सध्या राज्यात काही भागात पावसानं (Rain) धुमाकूळ घातला आहे. या पावसामुळं काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. नदी नाले दुथडी भरुन वाहत आहे. मुंबईसह परिसरात मध्यरात्रीपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. या पावसामुळं मुंबईतील सखल भागांमध्ये पाणी साचलं आहे. त्यामुळं वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. तसेच मराठवाडा आणि कोकण पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात देखील जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. दरम्यान, 11 ऑगस्टपर्यंत राज्यात सर्वत्र जोरदार पाऊस पडेल असा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. पुढील दोन दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्रातील घाट माथ्यावर अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
कोल्हापूर पाऊस
दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यात सुरु असलेल्या दमदार पावसाने पंचगंगा नदी पुन्हा एकदा पात्राबाहेर पडली आह. राजाराम बंधारा पाणी पातळी 33 फूट 2 इंच इतकी आहे. पंचगंगा नदी इशारा पातळी 39 फूट व धोका पातळी 43 फूट आहे. जिल्ह्यातील आतापर्यंत 58 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. दरम्यान, दुधगंगा धरणाचे सांडव्यावरील 5 वक्राकार दरवाजे उघडले असून, त्यातून 423 क्युसेक्सने विसर्ग सुरु आहे. तसेच पॉवर हाऊसमधून 1 हजार क्युसेक्स असा एकूण 1 हजार 423 क्युसेक्सने विसर्ग सुरु आहे.
मराठवाडा पाऊस
मराठवाड्यातील अनेक भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. आणखी दोन दिवस पावसाचा मराठवाड्यात मुक्काम असणार आहे. हवामान विभागाने याबाबत अंदाज वर्तवला आहे. त्यामुळं आधीच ओल्या दुष्काळासारखी परिस्थिती निर्माण झाली असताना, आता पुन्हा दोन दिवस पाऊस बरसणार असल्याने बळीराजाची चिंता वाढली आहे. प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज नांदेड, जालना, हिंगोली व परभणी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे. तर 10 ऑगस्ट रोजी औरंगाबाद जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे.
बीड जिल्ह्यात आठ दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसानं जोरदार हजेरी लावली. त्यामुळं नदी नाल्यातून पाणी वाहताना पाहायला मिळाले. सोबतच लातूर जिल्ह्यात दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने पुन्हा हजेरी लावली. दुपारच्या सुमारास तब्बल दोन तास झालेल्या मुसळधार पावसामुळं अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणीच पाणी असल्याचे चित्र होते.
महत्त्वाच्या बातम्या:
भंडारा शहरातील अनेक घरात शिरलं पावसाचं पाणी
नांदेड जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून संततधार, शेती पिकांना बसणार फटका
नांदेड जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरु आहे. दरम्यान, काल रात्रीही पावसाची दमदार बॅटिंग सुरुच होती. गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या पावसाच्या रिपरिपीमुळे जिल्ह्यातील गोदावरी, आसना, मांजरा, पैनगंगा, मन्याड ह्या नद्या दुथडी भरून वाहत आहेत. तर जिल्ह्यातील छोटे मोठे 35 प्रकल्प तुडुंब भरले असून विष्णुपुरी प्रकल्प ही 74 टक्के क्षमतेने भरला आहे. पावसाच्या या संतधारमुळे पुराच्या व अतिवृष्टीच्या तावडीतून वाचलेली उर्वरित सोयाबीन, हळद, उडीद,मूग, कापूस, केळी ही पिकेही जाण्याचा मार्गावर आहेत.
दोन दिवस झालेल्या दमदार पावसामुळे कोल्हापुरातील राधानगरी धरण 95 टक्के भरलं
Kolhapur Rains : दोन दिवस झालेल्या दमदार पावसामुळे कोल्हापुरातील राधानगरी धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. राधानगरी धरण 95 टक्के भरलं आहे. धरणाचे स्वयंचलित दरवाजे आज सायंकाळपर्यंत उघडण्याची शक्यता आहे. तर पंचगंगा नदीची पाणी पातळी 37 फुटांवर पोहोचली आहे. सध्या शहर आणि परिसरात पावसाने उघडीप दिली असून धरण क्षेत्रातही पावसाची विश्रांती आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज घेता अलमट्टी धरणातील पाण्याचा विसर्ग वाढवला
Satara News : पश्चिम महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज घेता अलमट्टी धरणातील पाण्याचा विसर्ग वाढवला आहे. कालपर्यंत 1 लाख क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरु असताना आता 1 लाख 25 हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरु आहे. दरम्यान कोयना धरणाचे कधीही दरवाजे उघडले जाऊ शकतात. कोयना धरणात सध्या 80 टीएमसी इतका पाणीसाठा आहे. कोयना आणि महाबळेश्वर परिसरात पावसाची संततधार कायम आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यात मुसळधार पाऊस, शेती पिकांचं मोठं नुकसान
Yavatmal Rain : यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील नारळी परिसरामध्ये एक ते दीड तास मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळं शेतामध्ये पाणी साचून कपाशी व सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ढग फुटी सदृश पाण्यामुळं नाल्यांना पूर आला आहे. शेतामध्ये नाल्याचे पाणी शिरुन सोयाबीन, कपाशी पिके खरडून गेली आहेत. शेतातील पिकासह शेतातील माती देखील पाण्यामुळे वाहून गेली आहे. या पुरामुळे अनेक हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.