Maharashtra Rain Update : राज्यभरात 11 ऑगस्टपर्यंत जोरदार पावसाचा इशारा, कोणत्या भागाला कोणता अलर्ट?
Maharashtra Rain Update : पुढील तीन दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्रातील घाट माथ्यावर अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर काही ठिकाणी अतिवृष्टीची देखील शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
Maharashtra Rain Update : काहीशा विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसाने संपूर्ण राज्यभरात धुमशान घातलं आहे. राज्यभरात सर्वदूर पावसाने हजेरी लागली आहे. अनेक ठिकाणी नदी नाले ओसंडून वाहत आहेत. परिणामी अनेक गावांचा संपर्क तुटला असून शेतीचंही मोठं नुकसान झालं आहे. त्यातच हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजामुळे सगळ्यांच्याच चिंतेत भर पडली आहे. कारण महाराष्ट्रात 11 ऑगस्टपर्यंत सर्वत्र जोरदार पाऊस पडेल असा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. पुढील तीन दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्रातील घाट माथ्यावर अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर काही ठिकाणी अतिवृष्टीची देखील शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
बंगालच्या उपसागर भागात तयार झालेल्या कमी दाबाचे क्षेत्र पुढील 24 तासात तीव्र होत डिप्रेशनमध्ये रुपांतरीत होणार आहे. त्यामुळे कोकण किनारपट्टी भागात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने चांगल्या पावसाची शक्यता आहे.
विदर्भात आज अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तर आज पूर्व विदर्भात जोरदार पावसाची चिन्ह आहे. गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, भंडारा, नागपुरात काही ठिकाणी विजांसह मुसळधार पावसाची शक्यता आहे. गडचिरोलीत एक-दोन ठिकाणी अतिवृष्टीचा अंदाज आहे, अशी माहिती नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राने दिली.
कोणत्या भागाला कोणता अलर्ट?
कोकण
रेड अलर्ट : पालघर, ठाणे, रत्नागिरी, मुंबई, रायगडमध्ये काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता
ऑरेंज अलर्ट : सिंधुदुर्ग
मध्य महाराष्ट्र
रेड अलर्ट : पुणे, कोल्हापूर, सातारातील घाट परिसरात काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता
ऑरेंज अलर्ट : नाशिकमधील घाट परिसरात अतिमुसळधारेचा इशारा
यलो अलर्ट : नंदुरबारमधील घाट परिसरात मुसळधार, जळगावमध्ये काही ठिकाणी मुसळधार
मराठवाडा
ऑरेंज अलर्ट : नांदेड, हिंगोली, परभणी
यलो अलर्ट : जालना, बीड, लातूर
विदर्भ
रेड अलर्ट : गडचिरोलीत काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता
ऑरेंज अलर्ट : भंडारा, चंद्रपूर, गोंदिया आणि नागपूर
यलो अलर्ट : अकोला, अमरावती, बुलढाणा, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ