Maharashtra Rain Live Updates : मुसळधार पावसानं मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली
Maharashtra Rain Live : मुंबईसह राज्याच्या विविध भागात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. आजही राज्यात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
LIVE
Background
Maharashtra Rain Live Updates : राज्याच्या विविध भागात पावसानं (Rain) जोरदार हजेरी लावली आहे. मुंबईसह, ठाणे नवी मुंबई, पालघर या परिसरात विजांच्या कडकडाटासह पावसानं हजेरी लावली आहे. तर दुसरीकडे पुणे, नागपूर कोकणातील सिंधुदुर्गमध्येही मुसळधार पावसानं हजेरी लावली. आजही अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. दरम्यान, आजही राज्यात कोकणसह, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
सध्या नवी मुंबईसह पनवेल परिसरात विजेच्या कडकडाटासह पाऊस पडत आहे. पालघर जिल्ह्यातील वाडा कुडुस भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. तसेच दिवसभराच्या दमट वातावरणानंतर नागपुरात देखील विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला.
या पावसामुळं पिकांना जीवदान मिळालं आहे. त्यामुळं शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत. राज्यात मुंबईसह ठाणे परिसारत पावसानं चांगलीच हजेरी लावली. त्याचबरोबर रत्नागिरी, पुणे, सिंधुदुर्ग, सोलापूर, अहमदनगर जिल्ह्यातही पावसानं हजेरी लावली. तसेच अमरावती जिल्ह्यातही चांगला पाऊस झाला आहे.
आजपासून पावसाचा जोर वाढणार
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार राज्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. आजपासून (8 सप्टेंबर) राज्यात पावसाचा जोर अधिक वाढणार आहे. नंदूरबार, धुळे, जळगाव, पालघर आणि ठाणे वगळता संपूर्ण राज्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवण्यात आली आहे. त्यामुळं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. दरम्यान, राज्याच्या विविध भागात पावसानं चांगलीच हजेरी लावली आहे. गेली काही दिवस पावसानं उघडीप दिली होती. मात्र, पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला आहे. मुंबईसह ठाणे परिसारत पावसानं चांगली हजेरी लावली आहे. लांबलेल्या पावसामुळं खरीप पिके धोक्यात आली होती, मात्र, पावसामुळं पिकांना जीवदान मिळालं आहे.
Nashik Rain : नाशिक शहरासह जिल्ह्याभरात पावसाची जोरदार हजेरी
नाशिक शहरासह जिल्ह्याभरात पावसाची जोरदार हजेरी लावली आहे. मुसळधार पावसानं शहरातील रस्त्याना नद्यांचे रूप आल असून उड्डाण पुलासह शहरातील महत्वाच्या रस्त्यावर जागोजागी वाहतूक कोंडी झाल्याचं दिसून आलं. रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. पावसामुळे शहरातील सराफ बाजारात पाणी साचलं आहे. त्यामुळे गणेशभक्तांची तारांबळ उडाली आहे.
Kalyan Rain : तासाभराच्या पावसात कल्याण डोंबिवली महापालिका मुख्यालय तुंबले
आज संध्याकाळच्या सुमारास कल्याण डोंबिवली परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावली. या तासाभराच्या पावसात चक्क कल्याण डोंबिवली महापालिकेचे मुख्यालय तुंबल्याचे दिसून आलं. मुख्यालयाच्या आवारात पाणी साचल्याने पालिकेत पार्क केलेली दुचाकी काढताना कर्मचारी तसेच नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागली .
Thane Rain : ठाण्यात धुंवाधार पाऊस
कल्याण-डोंबिवली आणि ठाणे परिसरात मागील तीन तासात धुंवाधार पाऊस.
ऐरोली परिसरात 84 मिमी पावसाची नोंद, तर वाशी परिसरात 74 मिमी पावसाची नोंद.
डोंबिवलीत मागील 3 तासात 60 मिमी पावसाची नोंद.
ठाण्यातील चिराक नगरमध्ये 77 मिमी, ढोकळीमध्ये 73 मिमी पावसाची नोंद
कोपरी आणि नौपाडा परिसरात 100 मिमीहून अधिक पाऊस
मुंबईतील भांडूप परिसरात देखील पावसाची चांगली हजेरी, भांडूप कॉम्प्लेक्सच्या केंद्रावर 80 मिमी पावसाची नोंद
Mumbai Rain : लोकल ट्रेन उशिराने, कुर्ला स्टेशनवर मोठी गर्दी
मुंबईत झालेल्या मुसळधार पावसाचा फटका मुंबईच्या जीवनवाहिनीला बसला आहे. मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. लोकल ट्रेन उशिराने धावत असल्याने कुर्ला रेल्वे स्थानकात अप आणि डाऊनच्या दिशेने दोन्ही फलाटांवर गर्दी झाली आहे. ऐन घरी जाण्याच्या वेळेस झालेल्या या खोळंब्याने चाकरमान्यांना त्रासाला सामोरे जावे लागले आहे. मात्र आता पावसाने थोडी उसंत घेतल्याने वाहतूक सुरळीत होण्याची शक्यता आहे.
Thane Rain : मुंब्रा कळवा भागात मुसळधार पाऊस, पारसिक डोंगरावरून पाण्याचे मोठे प्रवाह थेट रेल्वे ट्रॅकवर
मुंब्रा कळवा भागात झालेल्या प्रचंड पावसामुळे पारसिक डोंगरावरून पाण्याचे मोठे प्रवाह थेट रेल्वे ट्रॅकवर आले. मध्य रेल्वेच्या ट्रॅक बाजूलाच पारसिकचा डोंगर असल्याने हे पाणी थेट ट्रॅक वर येत होते. पावसाचा जोर जसा कमी झाला तसे पाणी देखील कमी झाले. मात्र यामुळे मध्य रेल्वेच्या तिसऱ्या आणि चौथ्या ट्रॅक वरील वाहतूक 15 ते 20 मिनिटे बंद ठेवण्यात आली होती. पाणी ओसरल्याने ही वाहतूक पुन्हा सुरु करण्यात आली आहे.