Maharashtra Rain : परभणीसह वाशीम आणि यवतमाळ जिल्ह्यात जोरदार पाऊस, आज कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट
Maharashtra Rain : कोकण विभाग आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्हे वगळता अन्य ठिकाणी पावसाची प्रतीक्षा आहे. हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार आजही राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Maharashtra Rain : राज्याच्या काही भागात पावसानं (Rain) हजेरी लावली आहे. मात्र, अद्यापही राज्यातील अनेक भागात पावसाची प्रतीक्षा कायम आहे. कोकण विभाग आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्हे वगळता अन्य ठिकाणी पावसाची प्रतीक्षा आहे. राज्यातील शेतकरी चांगल्या पावसाची वाट बघत आहेत. पावसामुळं शेतीचं काम खोळंबली आहेत. दरम्यान राज्यातील कोकणातील जिल्ह्यांसह मुंबई, ठाणे, परभणी, यवतमाळ या जिल्ह्यात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार आजही राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट
आज राज्यातील कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळं नागरिकांनी खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे. पुढील दोन ते तीन दिवस कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. विदर्भातही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मराठवाड्यात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.
परभणी शहरासह जिल्ह्यात मोसमातील पहिलाच पाऊस
जुन महिना संपूण जुलैचा पहिला आठवडा संपत आला तरी परभणी जिल्ह्यात यंदा पावसाने दडी मारली होती. मात्र सव्वा महिन्यांनंतर परभणी शहरासह जिल्ह्यात यंदाच्या मोसमातील पहिलाच जोरदार पाऊस पडला. शहरासह जिल्ह्यात मागच्या एक तासापासून धुव्वाधार पाऊस सुरू आहे. ज्यामुळं शहरातील अनेक रस्त्यांवर पाणी साचायला सुरुवात झाली. शेतकरी वर्ग ज्या पावसाच्या प्रतीक्षेत होता तो पाऊस पडत असल्याने रखडलेल्या पेरण्या मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
वाशीम जिल्ह्यात जोरदार पाऊस
पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या वाशिम जिल्ह्यात रिसोड, मालेगाव आणि कारंजा या तालुक्यात पावसाने दमदार बॅटिंग केल्याने केदार नदीला पूर आला आहे. वाशिम जिल्ह्यात पावसाची सूरुवात रिसोड तालुक्यात झाली. त्यानंतर मालेगाव आणि कारंजा इथ दमदार पाऊस बरसला. त्यामुळं शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मागील चार दिवसापासून जिल्ह्यात पावसाची प्रतीक्षा शेतकऱ्यांना लागून होती. आज ज्या भागात पावसाने हजेरी लावली त्या भागातील शेतकऱ्यांना थोडाफार दिलासा मिळाला आहे.
अडान नदीला पूर; यवतमाळ-दारव्हा महामार्ग बंद
यवतमाळ जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू आहे. या पावसामुळं दारव्हा तालुक्यातील बोरीअरब पासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या दहिफळ गावात ढगफुटी सदृश्य पाऊस कोसळला. त्यामुळे दहिफळ नाल्याला पूर आला आहे. या नाल्याचे पाणी अडाण नदीला मिळत असल्याने बोरी अरब जवळच्या अडाण नदीला पूर आल्याने यवतमाळ-दारव्हा महामार्ग वाहतुकीसाठी बंद झाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
मुसळधार पावसाचा खिशावरही परिणाम! भाज्यांचे भाव गगनाला भिडले, आलं आणि टोमॅटो विक्रमी किमतीला