(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Hingoli: ईसापूर धरणाचे तेरा दरवाजे उघडले; मराठवाडा विदर्भाचा संपर्क तुटला
Hingoli: ईसापूर धरणातून पाण्याचा विसर्ग केल्याने हिंगोली-पुसद रोडवर असलेल्या शिऊर पुलावरून जवळपास तीन ते चार फूट उंच इतके पाणी वाहत आहे.
Hingoli Rain: हिंगोली जिल्ह्याला पुन्हा एकदा जोरदार पावसाने झोडून काढले आहे. त्यामुळे ईसापूर धरणाचे 13 दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. तर धरणातून पाण्याचा विसर्ग केल्याने मराठवाडा आणि विदर्भाला जोडणाऱ्या रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली आहे. शिऊर पुलावरून वाहत असल्याने मराठवाडा आणि विदर्भाचा संपर्क तुटला आहे. त्यामुळे लांबच लांबपर्यंत वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे.
मराठवाड्यात मंगळवारी बहुतांश भागांत पावसाने जोरदार हजेरी लावली. दरम्यान हिंगोली जिल्ह्यातील 30 मंडळांत कमी-जास्त प्रमाणात पाऊस झाला. ज्यात हिंगोली, औंढा नागनाथ, सेनगाव तालुक्यातील अनेक मंडळांचा समावेश आहे. जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे प्रशासनाने ईसापूर धरणातून पाण्याचा विसर्ग करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ईसापूर धरणाचे 13 दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
प्रवासी शोधतायत पर्यायी मार्ग...
ईसापूर धरणातून पाण्याचा विसर्ग केल्याने हिंगोली-पुसद रोडवर असलेल्या शिऊर पुलावरून जवळपास तीन ते चार फूट उंच इतके पाणी वाहत आहे. त्यामुळे या पाण्यातून प्रवास करू नये असे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात येत आहे. तर पोलिसांनी वाहतूक सुद्धा थांबवली आहे. सतत जोरदार सुरू असलेल्या पावसामुळे ईसापुर धरणात आवक वाढली आहे. परिणामी विसर्ग सुरू केल्याने अशा पद्धतीने वाहतूक बंद झाली आहे. शिऊर पुलावरील वाहतूक बंद केल्याने प्रवासी पर्यायी मार्ग शोधून प्रवास करताना सुद्धा दिसून येत आहेत.
शेतकऱ्यांना मोठा फटका...
हिंगोली जिल्ह्यात यापूर्वीच पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झाले आहे. त्यातच आता पुन्हा एकदा अतिवृष्टी होत असल्याने बळीराजाच्या चिंतेत वाढ झाली आहे. गेली तीन वर्षे सतत मराठवाड्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला असून, त्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे. त्यातच सरकारकडून भक्कम नुकसानभरपाई मिळत नसल्याचा आरोपही शेतकऱ्यांनी केली आहे.
नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा...
ईसापूर धरणातून पाण्याचा विसर्ग केल्याने नदीला पूर आला आहे. त्यामुळे नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच गावकऱ्यांनी नदीच्या पात्रात उतरू नयेत अशा सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. सोबतच जनावरे किंवा इतर साहित्य घेऊन नदीत जाण्याचे धाडस कुणेही करू नयेत अशा सूचना सुद्धा प्रशासनाने दिल्या आहेत.