Pune Bandh : आज पुणे बंदची हाक; तब्बल साडेसात हजार पोलीस तैनात, अपमानास्पद घोषणांवर बंदी
Maharashtra Pune Bandh News : आज पुणे बंदची हाक, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांतर्फे सुमारे साडे सात हजार पोलीस तैनात करण्यात येणार
Pune Bandh : राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी (Bhagat Singh Koshyari ) छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत (Chatrapati Shivaji Maharaj) आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे आज पुणे बंदची (Pune Bandh) हाक दिली आहे. यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी सुमारे साडेसात हजार पोलिसांचा बंदोबस्त ठेवला आहे.
पोलिसांचा मोठा बंदोबस्त
आज सकाळी 9.30 वाजता डेक्कन जिमखाना येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मूकमोर्चास प्रारंभ होणार आहे. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे. गृहरक्षक दलाचे जवान, शहर पोलीस दल, राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या, यांच्यासह स्थानिक पोलीस ठाणे, गुन्हे शाखेची पथकांचा बंदोबस्त या मोर्च्याच्या वेळी असणार आहे. त्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचं देखील या मोर्च्यावर लक्ष ठेवणार आहे. तसेच कोणताही गोंधळ होऊ नये, यासाठी पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. डेक्कन जिमखाना, अलका चित्रपटगृह चौक, मार्गे लक्ष्मी रस्त्याने बेलबाग चौकातून लालमहालपर्यंत हा मूकमोर्चा जाणार आहे. त्यामुळे या मार्गावर देखील मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
अपमानास्पद घोषणांवर बंदी
प्रत्येक मोर्च्यात किंवा सभेत मोठ्या प्रमाणात घोषणा केल्या जातात. त्यामुळे अनेकदा गोंधळाचं वातावरण निर्माण होतं. त्यामुळे भगतसिंह कोश्यारीच्या वक्तव्याविरोधात आजच्या पुणे बंदमध्ये अपमानास्पद घोषणांवर बंदी घालण्यात आली आहे. या बंद दरम्यान संपूर्ण शहरात सुरक्षा मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली आहे. पुणे पोलिसांनी सुमारे 100 वरिष्ठ अधिकारी, 1000 हून अधिक पोलीस कर्मचारी तैनात केले आहेत.
इतर बातम्या
Pune Bandh : राज्यपालांविरोधात पुण्यातील गणेश मंडळं आक्रमक; राज्यपालांविरोधात पुणे बंदला पाठिंबा
साध्या वेशातील अनेक हवालदार
पुणे बंदच्या वेळी मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. यावेळी मोठा अनुचित प्रकार घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहरात मोठा बंदोबस्त असणार आहे. अनेक ठिकाणी पोलीस तैनात असणार आहे. घोषणाबाजीला देखील बंदी कऱण्यात आली आहे. शिवाय साध्यावेशातील अनेक हवालदारदेखील असणार आहे.
नेत्यांची उपस्थिती
या मोर्च्यात छत्रपती उदयनराजे महाराज, छत्रपती संभाजी राजे, विरोधी पक्षनेते अजितदादा पवार, शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे आदी नेते सहभागी होणार आहेत तसेच ते जाहीर सभेतही बोलणार आहेत. यात स्थानिक नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित असणार आहे. त्यासोबतच पुण्यातील 36 गणेशोत्सव मंडळानेदेखील या बंदला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे ते देखील मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याची शक्यता आहे. व्यापारी संघटनेचे कार्यकर्तेदेखील सहभागी होणार आहे आणि स्थानिक नागरिकांनाही मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.