राज्याचा श्वास कोंडला! मुंबई, पुणे नाही तर अनेक शहरांमधील हवेची गुणवत्ता पातळी खालवली, नायट्रोजनडायऑक्साईडच्या धुलीकणांमध्ये वाढ
राज्यातल्या अनेक शहरांचा हवा गुणवत्ता निर्देशांक समाधानकारक श्रेणीतून मॉडरेट (मध्यम) श्रेणीत गेला आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आकडेवारीवरून हे चित्र स्पष्ट झाले आहे.
मुंबई : राज्यात मुंबई (Mumbai), पुणे (pune) या बड्या शहरातील वायू प्रदुषणात (air pollution) सातत्याने वाढ होत असल्याचं समोर आलं आहे. परंतु आता फक्त मुंबई, पुणे नाही तर राज्यातल्या अनेक शहरांमधील हवा गुणवत्ता खालवल्याचं धक्कादायक चित्र समोर आले आहे. मागील 24 तासात राज्यातल्या अनेक शहरांचा हवा गुणवत्ता निर्देशांक समाधानकारक श्रेणीतून मॉडरेट (मध्यम) श्रेणीत गेला आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आकडेवारीवरून हे चित्र स्पष्ट झाले आहे.
मागील 24 तासात राज्यातल्या अनेक शहरात प्रदूषक पीएम 2.5, पीएम 10 च्या धुलिकणांच्या मात्रेत वाढ झाल्याचं चित्र आहे. पुण्यात NO2 तर जालन्यात O3 प्रदूषकाची मात्रा वाढली आहे. उल्हासनगर परिसरात हवा गुणवत्ता वाईट श्रेणीत, एक्यूआय 213 वर तर जळगावात एक्यूआय 199 वर आहे. पूर्वेकडून येणारे वारे, वाऱ्यांची कमी गती, तापमानात होणारी घट आणि डस्ट लिफ्टींगमुळे हवा गुणवत्ता बिघडली आहे. मुंबई महापालिकेकडून हवा गुणवत्ता सुधारण्यासाठी उपाययोजना करण्यास सुरुवात झालीय त्यानंतर मुंबईतील हवेच्या निर्देशांकात सुधारणा झाल्याचं चित्र दिसत आहे.
दिल्लीत पुन्हा परिस्थिती नियंत्रणाबाहेर
मागील काही दिवसात दिल्लीतील हवेची गुणवत्ता मुंबई, पुण्यापेक्षा चांगली परिस्थिती पाहायला मिळत होती . दिल्ली परिसरात झालेल्या पावसाने परिस्थिती सुधारणा झाली होती, मात्र दिल्लीत पुन्हा परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याचं चित्र आहे. दिल्लीतील हवा गुणवत्ता निर्देशांक 306 वर म्हणजे अतिशय वाईट श्रेणीत गेल्याचं पाहायला मिळत आहे.
मागील 24 तासात कोणत्या शहरात काय आहे परिस्थिती? आणि कुठे कोणत्या प्रदूषणाच्या संख्येत वाढ झाली आहे?
अकोला | 142 | पीएम 2.5 |
अमरावती | 112 | पीएम 10 |
औरंगाबाद | 154 | पीएम 2.5, पीएम 10 |
बदलापूर | 170 | पीएम 10 |
बेलापूर | 128 | पीएम 10 |
चंद्रपूर | 110 | पीएम 2.5 |
धुळे | 143 | पीएम 2.5 |
जळगाव | 199 | पीएम 2.5 |
जालना | 89 | ओ 3 |
कल्याण | 150 | पीएम 10 |
कोल्हापूर | 189 | पीएम 2.5, पीएम 10 |
लातूर | 88 | पीएम 2.5 |
महाड | 103 | पीएम 2.5 |
मुंबई | 172 | पीएम 2.5, पीएम 10 |
नागपूर | 125 | पीएम 2.5 |
नांदेड | 103 | पीएम 10 |
नाशिक | 110 | पीएम 2.5 |
नवी मुंबई | 191 | पीएम 2.5 |
परभणी | 136 | पीएम 2.5 |
पिंपरी चिंचवड | 138 | पीएम 2.5 |
पुणे | 127 | एनओ 2, पीएम 10 |
सांगली | 134 | पीएम 2.5 |
सोलापूर | 140 | पीएम 2.5, पीएम 10 |
ठाणे | 174 | पीएम 10 |
उल्हासनगर | 213 | पीएम 2.5 |
प्रदुषीत हवेसाठी वाहतूक जबाबदार
तापमानात घट झाल्यावर प्रदूषणात ही वाढ नोंदवली जाते. जेव्हा तापमान जास्त असते तेव्हा वातावरणातली आर्द्रता कमी असते आणि कोरडे हवामान असते. या प्रदूषित हवेसाठी वाहतूक देखील कारणीभूत आहे. शहरात रोज हजारो लोक आपल्या स्वत:च्या वाहनाने प्रवास करतात. त्यामुळे हवेतील वातावरणात प्रचंड प्रमाणात धुलीकण पसरतात.