(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Shivsena Symbol: ठाकरेंच्या धगधगत्या मशालीला, शिंदे गटाचे 'तळपत्या सूर्या'ने उत्तर? निवडणूक आयोगाच्या घोषणेची प्रतिक्षा
Shivsena Symbol: शिवसेनेच्या शिंदे गटाने निवडणूक आयोगाला तीन चिन्हांचा पर्याय दिला आहे. निवडणूक आयोगाकडून शिंदे गटाला तळपता सूर्य हे चिन्ह मिळण्याची शक्यता आहे.
Shivsena Symbol: शिवसेनेच्या शिंदे गटाने (Shivsena Shinde Faction Election Symbol) निवडणूक आयोगाला (Election Commission) तीन चिन्हांचा पर्याय सादर केला आहे. शिंदे गटाने दिलेल्या पर्यायांपैकी निवडणूक आयोगाकडून 'तळपता सूर्य' ( Election Symbol Sun) या चिन्हाला मंजूरी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेनेच्या दोन गटात मशाल विरुद्ध तळपता सूर्य असा सामना रंगणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
सोमवारी, निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला 'शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे' (Shivsena Uddhav Balasaheb Thackeray) हे नाव आणि मशाल हे चिन्ह दिले. तर, शिंदे गटाला 'बाळासाहेबांची शिवसेना' (Balasahebanchi Shivsena) हे नाव दिले. मात्र, शिंदे गटाने चिन्हासाठी दिलेले तिन्ही पर्याय फेटाळून लावले होते. त्यानंतर निवडणूक आयोगाने आज सकाळपर्यंत नवीन चिन्हाचा पर्याय देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, आज सकाळी शिंदे गटाने निवडणूक आयोगाला ई-मेल द्वारे निवडणूक चिन्हाचे पर्याय पाठवले होते. यामध्ये तळपता सूर्य, ढाल तलवार आणि पिंपळाचे झाड हा पर्याय पाठवला होता. त्यापैकी निवडणूक आयोगाने तळपता सूर्य हे निवडणूक चिन्ह शिंदे गटाला देण्याची अधिक शक्यता आहे.
ठाकरे गटाला मशाल निवडणूक चिन्ह
शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाला निवडणूक आयोगाने मशाल हे निवडणूक चिन्ह दिले. ठाकरे गटाने त्रिशुळ, उगवता सूर्य आणि मशाल या चिन्हांचा पर्याय दिला होता. त्रिशुळ हे चिन्ह धार्मिक असल्याने देता येणार नाही आणि उगवता सूर्य हे निवडणूक चिन्ह तामिळनाडूतील द्रमुक पक्षाचे असल्याने देता येणार नसल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले होते. तर, मशाल हे चिन्ह समता पक्षाचे निवडणूक चिन्ह होते. मात्र, त्यांना अपेक्षित मतदान न झाल्याने त्यांच्या चिन्हांवरील आरक्षण काढण्यात आल्याने हे चिन्ह ठाकरे गटाला मिळाले.
शिंदे गटाने निवडणूक आयोगाला सादर केलेल्या तीन निवडणूक चिन्हांपैकी पहिले दोन निवडणूक चिन्ह हे ठाकरे गटासारखेच होते. तिसरे निवडणूक चिन्ह 'गदा' होते.
निवडणूक आयोगाच्या घोषणेनंतर ठाकरे गटाकडून मशाल या चिन्हाचा सोशल मीडियावर जोरदार प्रचार करण्यात आला. शिवसैनिकांकडून उत्साहात या चिन्हाचे स्वागत करण्यात आले. मंगळवारीदेखील राज्यातील विविध ठिकाणी शिवसैनिकांकडून कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या: