CM Eknath Shinde : आम्हाला 50 खोके, गद्दार म्हणता...सोक्षमोक्ष लावतो; CM शिंदेंनी ठाकरे गटाचे ते पत्र समोर आणले
CM Eknath Shinde Vs Uddhav Thackeray : 50 कोटींच्या मुद्यांवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल केला.
Maharashtra Politics Shiv Sena : राज्याच्या विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाचे शुक्रवारी (4 ऑगस्ट 2023) सूप वाजले. अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केलेल्या वक्तव्यानंतर खळबळ उडाली. आमच्या पक्षातील 50 आमदारांना खोके आणि गद्दार म्हणा...त्याचा सोक्षमोक्ष लावला पाहिजे, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर हल्लाबोल केला.
विधानसभेत अंतिम आठवडा चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटावर हल्लाबोल करताना म्हटले की, आमच्या 50 आमदारांना खोके आणि गद्दार म्हणता. त्याचा सोसोक्षमोक्ष लावला पाहिजे. कोणी बेईमानी केली हे समोर यायला हवे. बोलता खुप येत मात्र माझा तो स्वभाव नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले. 50 कोटी रुपये तात्काळ वर्ग करा असं बँकेत पत्र देता. पक्ष आमच्याकडे आहे मग पैसे कसला मागता असा सवाल करताना एक मिनीटाचा विचार न करता मी तात्काळ देऊन टाकले. आम्हाला तुमची संपत्ती नको. बाळासाहेब यांचे विचार हीच आमची संपत्ती असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
50 कोटींचे प्रकरण आहे तरी काय?
शिवसेना पक्षाच्या बँकेतील ठेवीवर शिवसेना पक्षाचे मुख्य नेता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाला अधिकार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने बॅंकेतील पक्षाच्या खात्यावर असलेले 50 कोटी रुपये मागितले होते.
शिवसेना पक्षाचे खाते असलेल्या SBI बॅंकेतील दोन FD आणि बॅंक खात्यातील ठेवी एकूण 50 कोटी रुपये परत मिळवण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते सुभाष देसाई आणि अनिल देसाई यांनी भारतीय स्टेट बॅंकेला विनंती पत्र पाठवले होते. मात्र बॅंकेने ठाकरे गटाचे नेते सुभाष देसाई आणि अनिल देसाई यांना या निधीवर आता तुम्ही खातेदार नसून तुम्हाला अधिकार नसल्याचे सांगितले. तुम्हाला हा निधी परत मिळवायचा असेल तुमचे हे पत्र आम्ही आता जे खातेदार आहेत त्या शिवसेना पक्षाच्या अधीकृत नेत्यांकडे पाठवतो, असे कळवले. त्यानुसार SBI बॅंक व्यवस्थापनाने सुभाष देसाई आणि अनिल देसाई यांचे पत्र शिवसेना मुख्य नेता एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठवले.
SBI बॅंकेचे तसे पत्र मिळताच शिवसेना मुख्य नेता एकनाथ शिंदे यांनी बँकेतील 50 कोटी रुपये तात्काळ सुभाष देसाई आणि अनिल देसाई यांच्याकडे वर्ग केले.