Maharashtra Politics Devendra Fadnavis: एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री! अजित पवार हे मुख्यमंत्री होणार नाही याची त्यांना पूर्वकल्पना: देवेंद्र फडणवीस
Maharashtra Politics Devendra Fadnavis: एकनाथ शिंदे हेच राज्याचे मुख्यमंत्री राहणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट सांगितले.
Maharashtra Politics Chief Minister: महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आहेत आणि तेच राहणार आहेत, असा स्पष्ट निर्वाळा राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी म्हटले. विधीमंडळ अधिवेशनानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत सुरू असलेल्या चर्चेवर भाष्य करत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. अजित पवार (Ajit Pawar) हे मुख्यमंत्री होणार नाही, याची त्यांना पूर्वकल्पना असल्याचाही गौप्यस्फोट फडणवीस यांनी केला.
मागील काही दिवसांपासून राज्यात मुख्यमंत्री बदलाच्या चर्चा सुरू आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गच्छंती होणार असून त्याजागी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची वर्णी लागणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. अजित पवार यांनी मुख्यमंत्रीपदासाठी महायुतीत प्रवेश केला असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.
मुख्यमंत्री बदलावर सुरू असलेल्या चर्चांवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज स्पष्टपणे भाष्य केले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, महायुती सरकारचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत आणि तेच राहणार आहेत. त्यांच्याच नेतृत्त्वात लढवणार आहोत.
मुख्यमंत्री आपल्या पक्षाचा असावा कुठल्याही पक्षाला वाटणे वावगं नाही. शिवसेनेचे मुख्यमंत्री आज आहेत. भाजपच्या लोकांना भाजपचा मुख्यमंत्री झाला पाहिजे असं वाटू शकते, राष्ट्रवादीच्या लोकांना अजित पवार मुख्यमंत्री व्हावं असं त्यांना वाटू शकतं. यात काही चुकीचे नाही. पण, मुख्यमंत्रीपदात कुठलाही बदल होणार नाही. एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री आहेत आणि तेच राहतील असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना त्याबाबत तशी पूर्वकल्पना दिली असून त्यांनी ते स्वीकारले आहे. मी अतिशय स्पष्टपणे सांगतो 10 तारीख 11 तारीख आणि 9 तारीखला काही होणार नाही. काही झालं तर विस्तार होईल..त्याची तारीख मुख्यमंत्री करतील असेही फडणवीस यांनी म्हटले. माझं वक्तव्य कानउघडणीसाठी पुरे आहे असे म्हणत मुख्यमंत्रीपदावरून वक्तव्य करणाऱ्या आमदारांना त्यांनी सुनावले. मुख्यमंत्रीबदलावरून विरोधक पतंगबाजी करत असल्याचेही त्यांनी म्हटले.
महाराष्ट्राच्या राजकारण (Maharashtra Politics) आलेल्या अस्थिरतेमुळे रोज वेगवेगळ्या चर्चा होत असतात. अजित पवार (Ajit Pawar) सत्तेत सहभागी झाल्यापासून शिवसेनेत नाराजी असल्याची चर्चा होतेय. त्यातच आता अजित पवार मुख्यमंत्री होण्याची चर्चा सुरू झाल्याने शिवसेनेतील अस्वस्थता वाढू लागल्याची चर्चा सुरू होती.