Maharashtra Politics: परतीचे दोर कापले नाहीत, शिंदे गटातील 'हा' आमदार आमच्या संपर्कात; सुषमा अंधारे यांचा मोठा दावा
Maharashtra Politics: बंडखोर आमदारांचे शिवसेनेत परतीचे दोर कापले नसल्याचे शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी म्हटले. आमदार संजय शिरसाट संपर्कात असल्याचे त्यांनी म्हटले.
Maharashtra Politics: आम्ही बंडखोरांच्या परतीचे दोर कापले नसल्याचे सांगत शिवसेना (Shivsena Thackeray) उपनेत्या सुषमा अंधारे (Sushama Andhare) यांनी मोठा दावा केला आहे. शिंदे गटात काही आमदार नाराज असून काहीजण संपर्कात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. शिंदे गटात असलेले आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) आमच्या संपर्कात असल्याचा दावा त्यांनी केला आहे. सुषमा अंधारे या सध्या 'महाप्रबोधन यात्रे'निमित्त (Mahaprabodhan Yatra) जळगावात (Jalgaon) आहेत. त्यानिमित्ताने त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
सुषमा अंधारे यांनी म्हटले की, शिवसेना नेते आदित्य ठाकरे आणि आम्ही संयमित भाषेचा वापर करत आहोत. आम्ही टीका करताना कधीही पातळी सोडणार नसल्याचे म्हटले. बंडखोरांना माघारी परता येईल असे संकेत देताना त्यांनी परतीचे दोर आमच्याकडून कापले गेले नसल्याचे म्हटले. आमदार संजय शिरसाट हे शिंदे गटात अस्वस्थ असून त्यांना पश्चाताप होत आहे. ते आमच्या संपर्कात असल्याचे सुषमा अंधारे यांनी म्हटले.
भाजपवर टीका करताना अंधारे यांनी सांगितले की, ईडी, सीबीआयचा भाजपकडून दुरुपयोग सुरू आहे. भाजपमध्ये असलेल्या कोणत्याही भ्रष्टाचारी नेत्याविरोधात कारवाई केली जात नसल्याचे त्यांनी म्हटले. कोरोना काळात जिल्ह्यात झालेल्या अपहाराबाबत कोणतीही कारवाई केली जात नाही. किरीट सोमय्या यांची ई़डीशी जवळीक आहे. त्यांनी पाचोरा येथील जमीन आरक्षणाच्या प्रश्नात लक्ष घालावे अशी मागणी केली. महापौर शिवसेनेच्या आहेत म्हणून महापालिकेचा निधी पालकमंत्री रोखत आहेत ,त्यांना त्रास दिला जात आहे हे योग्य आहे का असा सवालही त्यांनी केला. मागील काही दिवसात कुरघोडीचे राजकारण सुरू असून लोकांच्या प्रश्नांवर चर्चा होत नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर घोषणा झाल्या आहेत. मात्र, या घोषणा हवेतच असल्याचे त्यांनी सांगितले.
विवेकानंद यांचे हिंदुत्व हवे
सुषमा अंधारे यांनी हिंदुत्वावर भूमिका स्पष्ट करताना म्हटले की मला सर्व धर्माबाबत आदर आहे. स्वामी विवेकानंद यांनी शिकागोमधील परिषदेत हिंदुत्व सांगितले ते महत्त्वाचे असल्याचे त्यांनी म्हटले.
बच्चू कडू लढाऊ तर राणा हे उथळ नेते
बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यात सुरू असलेल्या वादाबाबत अंधारे यांनी भाष्य केले. बच्चू कडू हे लढाऊ आणि स्वाभिमानी आहेत. त्यांच्यावर आरोप होणे हे चुकीचे आहे. त्यांच्यावर झालेल्या आरोपांमुळे दु:ख होणे हे अपेक्षित आहे. मात्र, रवी राणा हे उथळ व्यक्तीमत्त्वाचे असून चर्चेत राहण्यासाठी ते सतत काहीतरी बोलत असतात अशी टीकाही अंधारे यांनी केली.