शरद पवार दोन दिवसांच्या सोलापूर दौऱ्यावर, राजकीय गणितं बदलणार? दिग्गजांच्या घरवापसीच्या चर्चेनं भाजपचे धाबे दणाणले
Maharashtra Politics: पवार साहेबांच्या मनात काय आहे? हे भले भले ओळखू शकत नाहीत. मात्र त्यांनी ज्या पद्धतीनं दोन दिवस सोलापूर जिल्ह्याला दिले आहेत, ते पाहता सोलापूर जिल्ह्यातील भाजप आणि विरोधकांसाठी ही धोक्याची घंटा असेल.
![शरद पवार दोन दिवसांच्या सोलापूर दौऱ्यावर, राजकीय गणितं बदलणार? दिग्गजांच्या घरवापसीच्या चर्चेनं भाजपचे धाबे दणाणले Maharashtra Politics Sharad Pawar two day visit to Solapur will change political calculations Know Details शरद पवार दोन दिवसांच्या सोलापूर दौऱ्यावर, राजकीय गणितं बदलणार? दिग्गजांच्या घरवापसीच्या चर्चेनं भाजपचे धाबे दणाणले](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/05/895c9be8563c04162d7868b1b80366101683258658030315_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Maharashtra Politics: राजीनाम्याच्या राजकीय नाट्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) सोलापूर (Solapur) जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. अशातच 2024 च्या निवडणुकीची गणितं नव्यानं मांडण्यात येण्याचे संकेत या दौऱ्यातून मिळत आहेत. पहिल्यापासून शरद पवार यांचे सोलापूर जिल्ह्यावर मनापासून प्रेम असल्यानं सोलापूरवर कायम त्यांचं बारीक लक्ष असतं. गेल्या काही वर्षांपासून मात्र राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीची ताकद कमीकमी होत गेली. यावेळी माढा (Madha), मोहोळ (Mohol) या दोन मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झाले होते, तर कारमाळ्याला राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवारानं आमदारकी मिळवली होती.
पवार यांचे कट्टर सहकारी असणारे मोहिते पाटील, प्रशांत परिचारक, लक्ष्मण ढोबळे यांनी भाजपचे कमळ हातात घेतले आणि जिल्ह्यात भाजपाची सत्ता दिसू लागली. ज्या माढा लोकसभेचे नेतृत्व शरद पवार यांनी केले होते, ती जागाही भाजपनं गेल्यावेळी मोठ्या फरकानं जिंकली होती. हीच विस्कटलेली घडी पुन्हा बसवण्यासाठी 83 वर्षांचा तरुण पुन्हा मैदानात उताराला आहे. या सर्व दौऱ्यात पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला, माळशिरस, बार्शीसह सोलापूर शहर आणि अक्कलकोट विधानसभेसाठी पवार सहकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. यासाठीही काही धाडसी पावले उचलण्यास पवारांनी संकेत दिले असून पंढरपूरमध्ये विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर कार्यक्रम घेताना तरुण उद्योजक अभिजित पाटील यांना झुकतं माप दिलं आहे. विशेष म्हणजे, या कार्यक्रमातून राष्ट्रवादीचे भगीरथ भालके, कल्याणराव काळे या नेत्यांच्या नावाला कात्री लावल्यानं येत्या विधानसभेसाठी अभिजित पाटील हेच पंढरपूर मंगळवेढ्याचे उमेदवार राहण्याची शक्यता आहे.
सांगोल्यात देखील राष्ट्रवादीचे माजी आमदार दीपक साळुंखे यांनी शेकाप विरोधात शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांना ताकद दिली होती. आता दीपक साळुंखे हे स्वतः विधानसभेसाठी इच्छुक असून या दौऱ्यात नेमकी कोणती गोळाबेरीज होणार हेही लवकरच समोर येईल. येत्या निवडणुकांपूर्वी राष्ट्रवादी सोडून गेलेले काही दिग्गज मंडळींची घरवापसी बाबत देखील चर्चा अपेक्षित असून माढा लोकसभेसाठी एक तरुण नेत्याला पुन्हा पक्षात आणण्याचे प्रयत्न होण्याचे संकेत आहेत. याशिवाय भाजपमधील अनेक लहान मोठे नेते राष्ट्रवादीत आणून पुन्हा सोलापूर जिल्ह्यावर राष्ट्रवादीची पकड मजबूत करणं हेच पवारांच्या दौऱ्यातील उद्दिष्ट असणार आहे. राजीनामा नाट्यानंतर पवार पहिल्यांदाच जाहीर कार्यक्रमासाठी बाहेर पडले असून त्यांना राष्ट्रवादीला पूर्ण ताकतीनं सत्तेत आणण्यासाठी लागणाऱ्या सगळ्या ठेवणीतल्या खेळ्या खेळाव्या लागणार आहेत. एका बाजूला उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाच्या आमदारांच्या विरोधात काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना ठाकरे सेनेत आणण्याच्या हालचाली सुरु झाल्यानं आता राष्ट्रवादीला भाजपसोबत आपल्या मित्रांनाही शह देत मुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीकडे आणण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. पवार साहेबांच्या मनात काय आहे? हे भले भले ओळखू शकत नाहीत. मात्र त्यांनी ज्या पद्धतीनं दोन दिवस सोलापूर जिल्ह्याला दिले आहेत, ते पाहता सोलापूर जिल्ह्यातील भाजप आणि विरोधकांसाठी ही धोक्याची घंटा असेल.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)