Chhagan Bhujbal : छगन भुजबळ शरद पवारांच्या भेटीला सिल्व्हर ओकवर, सुप्रिया सुळे प्रतिक्रिया म्हणाल्या, 'भुजबळ साहेबांना भेटण्यासाठी...'
Chhagan Bhujbal : छगन भुजबळ शरद पवारांच्या भेटीला सिल्व्हर ओकवर दाखल झाले आहेत, त्यनंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यावर सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
मुंबई: मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या (OBC Reservation) बैठकीच्या मुद्द्यावरुन कालच (रविवारी 14 जुलै) शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे आज(सोमवारी) सकाळी अचानकपणे शरद पवार यांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओक (Silver oak) येथे दाखल झाले. छगन भुजबळ भेटीसाठी दाखल झाल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. छगन भुजबळ अचानक शरद पवार यांना भेटायला का आले, याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. त्यामुळे या भेटीबाबत अनेकांची उत्सुकता वाढली आहे. याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांना प्रश्न विचारला असता हे मी तुमच्याकडूनच ऐकते असं त्यांनी म्हटलं आहे.
छगन भुजबळ पवारांच्या भेटीवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
मी पुण्यात आहे. शरद पवार (Sharad Pawar) हे मुंबईमध्ये आहेत. नेमकं काय झालंय बाबतची माहिती मला नाही. छगन भुजबळ शरद पवारांना भेटायला गेले आहेत हे मी तुमच्याकडूनच ऐकते आहे. त्याबाबततची मला कोणतीही माहिती नाही, असं सुप्रिया सुळे आज पुण्यात माध्यमांशी बोलताना म्हणाल्या.
माध्यमांनी सुळेंना भुजबळांच्या नाराजीबाबत केलेल्या प्रश्नावर उत्तर देताना त्या म्हणाल्या, 'छगन भुजबळ यांची महायुतीमध्ये हेळसांड होत आहे, हे नाकारता येत नाही'.
छगन भुजबळ पवारांच्या भेटीवर उमेश पाटलांची प्रतिक्रिया
भेटीवर उमेश पाटील म्हणाले, छगन भुजबळ हे जेष्ठ नेते आहेत. शरद पवार (Sharad Pawar) देखील राज्यासह देशातील मोठे नेते आहेत. त्यांना भेटण्यासाठी छगन भुजबळ यांना विचारून जाण्याची आवश्कता नाही. राज्यात अनेकदा वेगवेगळ्या पक्षांचे नेते भेटायला जातात. ते आपण सर्वांनी पाहिलं आहे. आम्ही आता वेगळी भूमिका घेतली आहे. आम्ही भाजपसोबत जाण्याआधी आम्ही निर्णय घेण्याआधी त्याची संपुर्ण कल्पना शरद पवारांना होती असं देखील उमेश पाटलांनी यावेळी म्हटलं आहे.
शरद पवार यांच्या भेटीसाठी छगन भुजबळ वेटिंगवर
छगन भुजबळ यांना शरद पवारांकडून भेट देण्यात आलेली नव्हती. त्यामुळे बराच वेळ छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) वेटिंगवर बसल्याची माहिती समोर आली आहे. शरद पवार यांची प्रकृती बरी नसल्यानं त्यांनी दोन दिवसांपासून भेटी गाठी आणि राजकीय कार्यक्रम रद्द केले होते. मात्र, आज छगन भुजबळ थेट शरद पवार यांची वेळ न घेत सिल्वर ओकवर दाखल झाले.
शरद पवार यांच्याकडून आज केवळ दोन व्यक्तींना भेटीसाठी वेळ देण्यात आली अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी एबीपी माझाला दिली. यापैकी एक असलेले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नवनिर्वाचित आमदार मिलिंद नार्वेकर शरद पवारांच्या भेटीसाठी दाखल झाले होते. शरद पवारांची भेट घेतल्यानंतर मिलिंद नार्वेकर त्यांना सिल्वर ओक मधून बाहेर पडल्याची माहिती आहे.
VIDEO : छगन भुजबळ आणि शरद पवार भेटीवर सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या?
संबधित बातम्या: Chhagan Bhujbal Sharad Pawar : शरद पवार यांच्या भेटीसाठी छगन भुजबळ वेटिंगवर, भेट घेऊनच परतणार, भुजबळांचा पवित्रा