Jitendra Awhad: जितेंद्र आव्हाड यांची महिला आयोगाने चौकशी करावी; तक्रारदार महिलेची मागणी
Jitendra Awhad: जितेंद्र आव्हाड यांनी केलेले कृत्य चुकीचे होते असे सांगत राज्य महिला आयोगाने याबाबतची चौकशी करावी अशी मागणी आमदार आव्हाड यांच्याविरोधात तक्रार करणाऱ्या महिलेने केली आहे.
Jitendra Awhad: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्याविरोधात राज्य महिला आयोगाने कारवाई करावी, अशी मागणी तक्रारदार महिलेने केली. आव्हाडांविरोधात विनयभंगाची तक्रार देणाऱ्या पीडित महिलेने आज मुंबईत भाजप प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषद घेत आव्हाडांनी जाणूनबुजून ते कृत्य केले असल्याचा आरोप केला.
पीडित तक्रारदार महिलेने पत्रकार परिषदेत सांगितले की, रविवारी, मुंब्रा येथील उड्डाणपुलाच्या उद्घाटनासाठी मला देखील निमंत्रण होते. ज्यावेळी घटना घडली त्यावेळी प्रचंड गर्दी होती. मी मुख्यमंत्र्यांना भेटायला गेले. त्यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी तू इथे काय करतेस म्हणत मला बाजूला ढकललं. त्यांनी ढकलल्याने तिथं उपस्थित असलेल्या पुरुषांच्या अंगावर गेले. या प्रकारानंतर मुख्यमंत्री तोपर्यंत निघून गेले होते. त्यांची भेट झाली नाही. मात्र, मी पोलीस ठाण्यात गेले आणि तक्रार दाखल केली.
जाणीवपूर्वक कृत्य
आमदार आव्हाड यांनी केलेले कृत्य हे जाणीवपूर्वक होते. गर्दीत धक्का लागतो आणि पकडून धक्का दिला जाणे, यात फरक असल्याचेही या महिलेने म्हटले. महिला आयोगान स्वतः दखल घ्यावी आणि त्यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
जितेंद्र आव्हाड युवती मंचची महिला आयोगाकडे तक्रार
जितेंद्र आव्हाड यांच्यावर राजकीय हेतूने कारवाई करण्यात आली असून विनयभंगाच्या तक्रारीची चौकशी करण्याची मागणी 'डॉ. जितेंद्र आव्हाड युवती मंच'ने राज्य महिला आयोगाकडे केली आहे. तक्रारदार महिलेकडून चुकीचा आरोप करून जितेंद्र आव्हाड यांच्यासोबत समस्त महिला वर्गाचा अपमान करण्यात आला असल्याचा आरोप करण्यात आला आहे. उपलब्ध पुरव्यावरुन खरोखरच विनयभंग झाला आहे का, याची चौकशीची मागणी युवती मंचच्या स्नेहल कांबळे यांनी केली आहे.
आव्हाडांच्या समर्थनासाठी निदर्शने
जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांनी आमदारकीचा राजीनामा देणार असल्याचे ट्वीट केले. त्यानंतर आज सकाळपासून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरू केले आहे. मुंब्रामध्ये बंद पाळण्यात आला आहे. तर, दुसरीकडे काही ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ऋता आव्हाड यांनी पोलिसांच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या: