फडणवीस-राज यांनी भाषणावेळी पूरक टायमिंग साधल्याने मिलीभगत आहे हे सिद्ध होतं : जयंत पाटील
राज ठाकरेंवर ईडीचा किंवा अन्य कोणता तरी दबाव असल्याने आणि त्यांनी फक्त शरद पवारांवर बोलायचे, बाकी काही बोलायचं नाही असे सांगितल्याने ते केवळ शरद पवार यांच्यावर बोलतात, असे जयंत पाटील म्हणाले.
![फडणवीस-राज यांनी भाषणावेळी पूरक टायमिंग साधल्याने मिलीभगत आहे हे सिद्ध होतं : जयंत पाटील Maharashtra Politics It seems that BJP has written the script of Raj Thackeray's speech as he is not talking about inflation says Jayant Patil फडणवीस-राज यांनी भाषणावेळी पूरक टायमिंग साधल्याने मिलीभगत आहे हे सिद्ध होतं : जयंत पाटील](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/02/83a60681911e6b0cb5ec31736515c8cb_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
सांगली : राज ठाकरे यांच्या औरंगाबादमधील भाषणात मला काहीच दम वाटला नाही. भाषणात नवीन काहीच मुद्दे नव्हते. मागील सभेत जे मुद्दे मांडले गेले तेच मुद्दे या भाषणात होते. त्यामुळे राज ठाकरे यांच्याकडे नवीन काही सांगण्यासारखे नाही असे दिसत आहे. महागाईवर बोलून मग राष्ट्रवादीच्या नेत्यांना शिव्या-शाप द्यायचे असतील तर द्या. पण राज साहेबांनी महागाईवर पण बोलावे. पण ते बोलत नसल्याने राज यांच्या भाषणाची स्क्रिप्ट भाजपने लिहून दिलीय असे दिसतेय, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली.
शरद पवारांचा द्वेष करा, त्यांच्याविरोधात बोला, अशी स्क्रिप्ट राज ठाकरे यांना कुणीतरी दिली आहे. ती स्क्रिप्ट वाचण्याचा दबाव राज ठाकरेंवर दिसतोय आणि त्यामुळे ते काही कारणामुळे नाईलाजास्तव शरद पवारांवर टीका करत आहेत. त्यामुळे भाषणावेळी राज ठाकरे यांची फारच केविलवाणी अवस्था दिसली. शरद पवार यांच्याविरोधात जितके जास्त बोलता येईल आणि महाराष्ट्रामध्ये जातीयवादी विष कालवून धर्माधर्मात तेढ निर्माण करुन समाजात विष कसे पसरवता येईल यासाठी जितके जास्त कसे चिथावणीखोर बोलता येईल तसा प्रयत्न राज ठाकरेंच्या भाषणातून दिसत होता, असं म्हणत जयंत पाटील यांनी राज ठाकरे यांच्या भाषणातील मुद्द्यांवर टीका केली.
मुंबईतील देवेंद्र फडणवीस यांच्या सभेतील भाषण संपले आणि त्यानंतर राज ठाकरे औरंगाबादमधील स्टेजवर भाषणासाठी व्यासपीठावर चढले. फडणवीस आणि राज ठाकरे या दोघांकडूनही भाषणाबाबत पूरक टायमिंग साधून टीव्ही मीडिया व्यापून घेण्याचा प्रयत्न अचूक झाला. यातून मिलीभगत आहे हे सिद्ध होतेय, अशी टीकाही जयंत पाटील यांनी केली. राष्ट्रवादी आणि खासकरुन शरद पवार यांच्यावर बोलले तरच कव्हरेज मिळते. त्यामुळे राज ठाकरे सतत शरद पवार यांच्यावर बोलत आहेत, असं जयंत पाटील म्हणाले.
महाराष्ट्रातील हिंदू आणि मुस्लीम दोघेही हुशार झाले आहेत. मतांच्या राजकारणासाठी या साऱ्या गोष्टी चालू आहे हे हिंदू आणि मुस्लीम समाजाला माहित आहे. यांना हिंदू-मुस्लिमांच्या विकासाचे देणेघेणे नाही. महागाई किती वाढलीय, पेट्रोल, डिझेल किती महाग आहे, यावर राज ठाकरे का नाही बोलत? गॅस, सीएनजी, स्टील, सिमेंटचे दर वाढले किती वाढले, यावर राज साहेबांनी बोलावं. महागाईवर बोलून मग राष्ट्रवादीच्या नेत्यांना शिव्या-शाप द्यायचे असतील तर द्या. आम्हाला काही वाटणार नाही. त्यामुळे महागाईवर न बोलता बाकी गोष्टीवर राज साहेब बोलत असल्याने राज यांच्या भाषणाची स्क्रिप्ट भाजपने लिहून दिलीय असे दिसतेय. भाजपला अडचणीत आणणाऱ्या एकाही मुद्द्यावर ठाकरे बोलत नाहीत. अजून राज यांच्या मनसेची भाजपशी युती झालेली नाही किंवा भाजपने अजून राज ठाकरे यांना कुठे स्थान दिलंय, असे असताना देशातील परिस्थितीवर बोलताना, भडकलेल्या महागाईवर बोलताना राज ठाकरे यांना भाजपवरच बोलायला हवे. पण आपण भाजपवर का बोलत नाही याचे उत्तर राज ठाकरे देऊ शकत नाहीत. कारण राज ठाकरेंवर ईडीचा किंवा अन्य कोणता तरी दबाव असल्याने आणि त्यांनी फक्त शरद पवारांच्यावर बोलायचे, बाकी काही बोलायचं नाही असे सांगितले गेल्याने राज ठाकरे केवळ शरद पवार यांच्यावर बोलतात, असे जयंत पाटील म्हणाले.
लोकमान्य टिळक यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली या राज ठाकरे यांच्या दाव्यावर बोलताना जयंत पाटील यांनी महात्मा ज्योतिबा फुले आणि महाराष्ट्रामधील समस्थ ओबीसी समाजाने केलेलं काम दुर्लक्षित व्हावं, अशा पद्धतीचा जातीयवाद राज ठाकरे यांच्याकडून होतोय असं वाटत नाही का? असा प्रश्न उपस्थित केला.
संबंधित बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)