(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Saroj Ahire NCP: सही केली म्हणून माझा पाठिंबा गृहीत धरला, कुणासोबत जावं हे ठरलं नाही: आमदार सरोज अहिरे
Nashik News : नाशिकच्या (Nashik) आमदार सरोज आहिरे यांनी अखेर माध्यमांशी संवाद साधत आपली भूमिका जाहीर केली आहे.
Saroj Ahire NCP : नवीन आमदारांचे प्रचंड मरण असून दादा आणि साहेब यांच्यात निवडणे अवघड आहे. आमच्या सारख्या आमदारांची अडचण होते आहे. माझ्या कामासाठी मी देवगिरीवर गेले होते. म्हणून मी सही केली आणि शपथ विधीला गेले. मात्र त्यांनी माझा पाठिंबा गृहीत धरला. त्यांनतर सुप्रियाताई, साहेबांशी पण चर्चा केली. पण आता मतदारांचा कौल घेऊन निर्णय घेईल, असे स्पष्टीकरण राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरे (Saroj Ahire) यांनी दिले आहे.
गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील राजकारण तापले असून राजकीय समीकरणे पूर्णतः बदलली आहेत. अशातच अजित पवार (Ajit Pawar) गटाच्या शपथविधीसाठी उपस्थित असलेल्या नाशिकच्या (Nashik) आमदार सरोज आहिरे यांनी अखेर माध्यमांशी संवाद साधत आपली भूमिका जाहीर केली आहे. रविवारच्या घडामोडीनंतर त्या देखील नॉट रिचेबल होत्या. अखेर त्यांनी मौन सोडले असून अजित पवार आणि शरद पवार (Sharad Pawar) या दोघांमध्ये कुण्या एकाला निवडणे अवघड असल्याचे सांगत मतदार संघातील लोकांशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे अहिरे यांनी सांगितले. आज त्यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली. तसेच सध्या दोन्ही जवळच्या नेत्यांमध्ये चॉइस करता येत नाही, मी सही केली म्हणून माझा पाठिंबा त्यांनी गृहीत धरला. दोन्ही नेत्यांमध्ये एकाला निवडणे म्हणजे जीवन मरणाचा प्रश्न असून आमचे असे क्षेत्र त्यात चर्चा होणार असे त्या म्हणाल्या.
सरोज अहिरे यांनी राष्ट्रवादीच्या (Maharashtra Politics) फुटीनंतर शपथविधीला उपस्थिती दर्शवली. त्यानंतर त्यांनी सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्याशी देखील चर्चा केली. या चर्चेनंतर नाशिकला माघारी फिरल्या. यावेळी आजारी असल्याने त्यांनी हॉस्पिटलमधून पत्रकार परिषद घेत आपली म्हणणे मांडले. अहिरे म्हणाल्या कि, नवीन आमदारांचे प्रचंड मरण आहे, दादा आणि साहेब यांच्यात निवडणे अवघड आहे. आमच्या सारख्या आमदारांची अडचण होते आहे. माझ्या कामासाठी मी देवगिरीवर गेले होते. म्हणून मी सही केली आणि शपथ विधीला गेले. मात्र मला काहीच कल्पना नव्हती. यानंतर मात्र सुप्रियाताईसह साहेबांशी पण चर्चा केली. आमच्या नेत्यांवर आमचा आंधळा विश्वास म्हणून मी सही केली, तसेच इतर आमदारांनी पण सही केली. मात्र माझा पाठिंबा गृहीत धरण्यात आल्याचा गौप्यस्फोट केला.
लोकांशी बोलून निर्णय घेणार
सरोज अहिरे पुढे म्हणाल्या कि, एक वर्षांनी निवडणुका म्हणून हा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे. साहेब आणि दादा आमच्यासाठी एकच असून साहेब आमच्या मनात आहेत. सध्या मी मानसिक तणावातून जात असून त्यासाठी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. त्यामुळे सद्यस्थितीत आई आणि बायको यातून निवडणे जसे कठीण असते, तशी ही बाब माझ्यासाठी कठीण आहे. माहितीनुसार लवकरच शरद पवार हे येवला येथे सभा घेणार असून या सभेला माझी तब्येत बरी असल्यास जाणार असल्याचे स्पष्ट केले. त्याचबरोबर मतदारसंघातील अनेक कामांना स्थगिती होती, मात्र मुख्यमंत्र्यांना हात जोडून अनेक कामावरून स्थगिती उठवली. मात्र जनता म्हंटली कामे नको, तर साहेबांबरोबर जाईल आणि विकासकामे म्हंटले तर दादांसोबत जाईल, मात्र अजून निश्चित ठरलेले नाही. लवकरच मतदार संघातील प्रमुख लोकांशी वन टू वन चर्चा करून त्यानंतर माझी भूमिका जाहीर करणार असल्याचे अहिरे म्हणाल्या.