Banjara Community: राज्याच्या राजकारणात नवं वळण! 'बंजारा' समाजाचा नवा स्वतंत्र राजकीय पक्ष; 9 एप्रिल रोजी नांदेडमध्ये होणार स्थापना
Maharashtra Politics Banjara Community: राज्याच्या राजकारणात आता 'बंजारा' समाजाचा नवा स्वतंत्र राजकीय पक्ष उतरणार आहे. या राजकीय पक्षामुळे राज्याची राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.
Maharashtra Politics Banjara Community: सध्याच्या परिस्थितीत राज्य आणि देशाच्या दृष्टीने बंजारा राजकारणाशी संबंधित एक महत्वाची घडामोड येत्या 9 एप्रिलला होऊ घातलीये. बंजारा समाज आणि राजकारण याला 'केंद्रस्थानी' मानून 'बंजारा बेस' असलेला एक नवा राजकीय पक्ष जन्माला येतोये. 'समनक' जनता पक्ष' असं या नव्या पक्षाचं नाव असणारेय. 9 एप्रिलला नांदेड जिल्ह्यातील माहूर येथे एका मोठ्या कार्यक्रमात या पक्षाच्या स्थापनेची घोषणा होणारेय. यावेळी एक जाहीर सभाही होणारेय. 'समनक' या शब्दातून बंजारा समाजाला राजकारणात समान वाटा देण्याचा 'पॉलिटिकल अजेंडा' या पक्षाच्या माध्यमातून राबविला जाणारे.
बंजारा समाजासाठी काम करीत असलेल्या 'गोरसेना' या संघटनेचंच या नव्या राजकीय पक्षात रूपांतर होतंय. या संघटनेचे संदेश चव्हाण यांच्या नेतृत्वात नवा पक्ष आकाराला येणारेय. संघटनेचे नांदेडमधील दिवंगत नेते कांशीराम नायक यांनी सर्वात आधी ही संकल्पना मांडली होतीय. त्यानंतर गेल्या दोन वर्षांपासून या पक्ष स्थापनेसाठी अतिशय गोपनीयपणे काम सुरू होतंय. यासाठी संदेश चव्हाण यांनी राज्य आणि देशातील हजारो बंजारा तांड्यांवर बैठकी घेतल्यात.
या पक्षाचं राजकारण 'बंजारा फोकस' असलं तरी देशभरातील मागासवर्गीय आणि भटक्या लोकांचा राजकीय दबावगट या माध्यमातून तयार करण्याचा या लोकांचा मानस आहेय. मात्र, राजकारणात असलेल्या बंजारा नेत्यांना 'पॉलिटिकल बॅकअप' देण्यासाठी नवा पक्ष काम करणारेय. बसपाचं 'कॅडर' तयार करणार्या 'बामसेफ'च्या धर्तीवर या पक्षाची रचना असणारेय अशी माहिती सूत्रांनी दिलीये.
या पक्ष स्थापनेला 'बॅकअप' देण्यामागे पडद्यामागची भूमिका संजय राठोड यांनी निभावण्याचा अतिशय विश्वसनीय माहिती आहेय. या प्रक्रियेत भाजपचे विधान परिषद आमदार निलय नाईक आणि यवतमाळ जिल्ह्यातील पुसदचे राष्ट्रवादीचे आमदार इंद्रनील नाईक यांचीही मोठी भूमिका यात आहेय. स्थापनेनंतर बंजारा मतदार निर्णायक असलेल्या तेलंगाना आणि कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीत सक्रीय भूमिका वळविण्याचा या नव्या पक्षाचा मानस आहेय. विशेष म्हणजे 10 डिसेंबर 2022 रोजीच पक्षाची निवडणुक आयोगाकडे नोंदणी करण्यात आलीय. या पक्षाची नोंद निवडणुक आयोगाकडे झालीये.
गेल्या दोन वर्षांत राज्यात संजय राठोड यांच्यानिमित्तानं बंजारा राजकारण राज्यात चर्चेला आलं होतंय. त्यात या नव्या घडामोडीनं बंजारा राजकारण एका नव्या निर्णायक वळणावर आल्याचं बोललं जातंय.
काय आहेय 'समनक'चा अर्थ?
'बंजारा' भाषेत 'समनक'चा अर्थ 'समान वाटा' असा होतो. जुन्या काळात बंजारा समाज जेंव्हा राना-वनात भटकत होताय तेंव्हा ते समुहाने कंद-मुळं जमा करायचेय. सर्व कंद-मुळे जमा झाल्यानंतर सर्वजण समुहात ते समान वाटून घ्यायचे. 'समनक जनता पक्षा'च्या स्थापनेचं हेच राजकीय सुत्रं असणारेय.
पक्ष स्थापनेसाठी नेमकं माहूरचीच निवड का?
9 एप्रिलला नांदेड जिल्ह्यातील माहूर येथे 'समनक जनता पक्षा'ची स्थापना होणारेय. या पक्षाची स्थापना नेमकं माहूरला का होत आहे?, असा प्रश्न अनेकांना पडला आहेय. माहूर हे मातृदेवतेच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी एक ठिकाण आहेय. बंजारा समाज हा आधीपासूनच मातृपूजक आहे. पोहरादेवीची जगदंबामाता हे समाजाचं दैवत आहेय. त्याच देवतेचं ठिकाण शक्तीपीठ असलेल्या माहूरची निवड यासाठी करण्यात आलीय. माहूर हे मराठवाड्यातील किनवट मतदारसंघात येतं. किनवट मतदारसंघ बंजारा समाजाच्या राजकीय ताकदीचं केंद्र राहिलं आहे. येथून समाजाचे प्रदीप नाईक हे राष्ट्रवादीच्या तिकीटावर तीनवेळा या मतदारसंघाचे आमदार राहिलेय. समाजाची मोठी ताकद असलेला यवतमाळ, हिंगोली, परभणी, नांदेड हे जिल्हे अन तेलंगाना हे राज्य येथून जवळ आहेत. त्यामूळेच जाणीवपुर्वक माहूरची निवड या पक्षाच्या स्थापनेसाठी करण्यात आलीय.
यात पोहरादेवी 'धर्मपीठा'ची भूमिका काय असेल?
या पक्षाच्या स्थापनेत पोहरादेवीच्या बंजारा 'धर्मपीठा'ची भूमिका काय असेल?, असा प्रश्न सर्वांना पडला असेल. अलिकडे संजय राठोड यांच्याशी संबंधित प्रत्येक गोष्टीत बंजारा धर्मपीठ ताकदीनं त्यांच्या पाठीमागे उभं राहिलं. मग ते संजय राठोड यांच्यासाठी अडचणीचं ठरलेलं पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरण असो. की त्यांचं ठाकरे गटातून शिंदे गटात जाणं. धर्मपीठ समाज म्हणून ताकदीनं संजय राठोड यांच्या पाठीमागे उभं राहिलं. या नव्या पक्षासंदर्भात धर्मपीठाचं धोरण हे आशिर्वादाचंच असेल. 'धर्मपीठा'ची राजकीय भूमिका या नव्या पक्षाच्या माध्यमातून प्रत्यक्षात राबवली जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
विविध पक्षात असलेल्या बंजारा नेत्यांसंदर्भात पक्षाची काय असेल भूमिका?
सध्या देश आणि राज्यभरात बंजारा समाजातील नेते विविध पक्षात आहेत. यातील प्रभावी नेत्यांना पक्षाची कायम मदतीची भूमिका असेल. ज्या मतदारसंघात ज्या पक्षाचा समाजाचा उमेदवार प्रभावी असेल त्याला पक्ष मदत करेल. जिथे पक्षाचा स्वत:चा उमेदवार तगडा असेल पक्ष त्याला मैदानात उतरवेल. जिथे समाजाचा उमेदवार नाही तिथे पक्षाच्या माध्यमातून समाजाची ताकद कुणामागे उभी करायची याचा निर्णय पक्ष घेणार आहेय.
सध्या राज्याच्या विधीमंडळात (विधानसभा आणि विधानपरिषद) असलेले बंजारा समाजाचे लोकप्रतिनिधी :
विधानसभा :
1) संजय राठोड : दिग्रस, जि. यवतमाळ : शिंदे गट
2) इंद्रनील नाईक : पुसद, जि. यवतमाळ : राष्ट्रवादी
3) तुषार राठोड : मुखेड, नांदेड : भाजप
विधान परिषद :
1) निलय नाईक : यवतमाळ : भाजप
2) राजेश राठोड : जालना : काँग्रेस
राज्यातील बंजारा व्होटबँक असलेले लोकसभा मतदारसंघ :
यवतमाळ-वाशिम, अकोला, जालना, परभणी, नांदेड, हिंगोली, बीड, औरंगाबाद, सोलापूर, माढा, ठाणे