Eknath Shinde : महाराष्ट्रातल्या राजकीय भूकंपाचे केंद्र सुरतमध्ये; शिंदे आणि गुजरातच्या भाजप नेत्यामध्ये खलबतं
Eknath Shinde : महाराष्ट्रातील राजकीय भूकंपाचे केंद्र सूरत ठरण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे नाराज नेते एकनाथ शिंदे आणि गुजरातच्या ज्येष्ठ भाजप नेत्यांमध्ये रात्री उशिरा बैठक झाली असल्याचे समोर आले आहे.
Eknath Shinde : संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष विधान परिषदेच्या निवडणूक निकालाकडे असताना दुसरीकडे राज्यातील राजकीय भूकंपाची तयारी सुरू होती, अशी चर्चा जोर पकडू लागली आहे. राज्यातील या संभाव्य राजकीय भूकंपाचे केंद्र गुजरातमधील सूरत असल्याचे समोर आले आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि 11 आमदार सध्या सूरतमध्ये असून त्यांची भाजप नेत्यांसोबत चर्चा झाली असल्याची माहिती समोर आली आहे.
शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे एकनाथ शिंदे हे सोमवारी रात्रीच गुजरातमध्ये दाखल झाले असल्याची माहिती समोर आली आहे. एकनाथ शिंदे आणि 11 आमदार हे सूरतमधील मेरिडियन हॉटेलमध्ये असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी या हॉटेलबाहेरील बंदोबस्तात मोठी वाढ केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि गुजरात भाजपचा एक मोठा नेता यांच्यात रात्री उशिरा बैठक झाली.या बैठकीनंतर हा भाजप नेता अहमदाबादच्या दिशेने रवाना झाला असल्याची माहिती समोर आली आहे. ही बैठक गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी.आर.पाटील यांच्यासोबत ही भेट झाली असल्याची चर्चा जोर पकडू लागली आहे.
शिवसेनेतील धुसफूस बाहेर
विधान परिषद निवडणुकीनंतर शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस बाहेर येत आहे. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे नाराज असल्याचे वृत्त होते. त्यातच आता त्यांचे समर्थक समजले जाणारे 13 आमदार नॉट रिचेबल असल्याची माहिती समोर आली होती. मध्यरात्री शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या आमदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीत 13 आमदार अनुपस्थित होते. त्यानंतर शिवसेनेच्या गोटातील चिंता आणखी वाढली आहे.
शिंदे घेणार टोकाची भूमिका?
गेले काही वर्ष नाराज असलेले शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे आणि त्याच्या गटाचे आमदार यांनी टोकाचं पाऊल उचललं आहे अशी माहिती समोर येत आहे. एकनाथ शिंदे यांचा नाराज गट काल सायंकाळपासूनच नॉट रिचेबल असल्याची माहिती आहे. रात्रीच्या सुमारास 'एबीपी माझा'च्या प्रतिनिधींनी देखील काही आमदारांना फोन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनाही फोन नॉटरिचेबल लागला होता. शिवसेनेतली धुसफूस लक्षात येताच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील 'वर्षा' या निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी चर्चा केली.
आज वर्षा बंगल्यावर शिवसेना आमदारांची बैठक
मध्यरात्री वर्षा बंगल्यावर झालेल्या बैठकीनंतर शिवसेना आमदारांची आज पुन्हा बैठक बोलवण्यात आली आहे. आज दुपारी 12 वाजता ही बैठक बोलवण्यात आली आहे. या बैठकीत किती आमदार उपस्थित राहतात यावर महाविकास आघाडीचं भविष्य अवलंबून आहे. शिवसेनेतली धुसफूस लक्षात येताच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील वर्षा या निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी चर्चा केली.