कपिल सिब्बलांचा झंझावाती युक्तिवाद, राहुल नार्वेकर बॅकफूटवर, सुप्रीम कोर्टात 15 मिनिटांत काय काय घडलं?
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाबाबत (Maharashtra political crisis) शिवसेना (Shiv Sena) ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली.
नवी दिल्ली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाविरोधात आमदार अपात्रतेबाबत (shiv sena MLA disqualification case) विधानसभा अध्यक्षांनी तातडीने निर्णय घ्यावा, उशीर करु नये. कोर्टाच्या निर्णयाचा आदर करा, असे खडे बोल सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांना सुनावले. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाबाबत (Maharashtra political crisis) शिवसेना (Shiv Sena) ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल (Kapil Sibal ) यांनी बाजू मांडताना राहुल नार्वेकर वेळकाढूपणा करत असल्याचा युक्तीवाद केला. त्याला अध्यक्षांच्या बाजूने महाधिवक्ते तुषार मेहता (Tushar Mehta) यांनी युक्तीवाद करुन उत्तर दिले.
सुप्रीम कोर्टाने आजच्या युक्तीवादानंतर राहुल नार्वेकरांना खडे बोल सुनावले. वेळकाढूपणा चालणार नाही. कोणत्याही प्रकरणात अनिश्चितता असू शकत नाही. जवळपास 4 महिने झाले, तुम्ही कोणतीच कारवाई का केली नाही? असे सवाल सुप्रीम कोर्टाने राहुल नार्वेकरांना विचारले.
सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं? (Supreme Court on Shiv Sena Case )
आज सुप्रीम कोर्टात 15 मिनिटे खडाजंगी झाली. कपिल सिब्बल यांनी ठाकरे गटाकडून जोरदार युक्तीवाद केला. सुप्रीम कोर्टाने तीन महिन्यापूर्वी स्पष्ट निर्देष देऊनही अध्यक्ष राहुल नार्वेकर हे वेळकाढूपणा करत आहेत. आमदार अपात्रतेबाबत कोणतीही कारवाई करत नाहीत, असा युक्तीवाद सिब्बल यांनी केला.
कपिल सिब्बल यांचा युक्तीवाद (Kapil Sibal argument on Shiv Sena)
आमदार अपात्रतेचा हा खूप गंभीर विषय आहे. पाच अपात्रता याचिका दाखल केल्या आहेत. 2022 मध्ये 12 जुलै 2022 पर्यंत उत्तर द्यायचं होतं पण काहीच घडलं नाही. या तारखेपर्यंत नोटीसही जारी झालेली नाही. कोर्टने बजावलं होतं की योग्य कालावधीत निर्णय द्यावा. मात्र कोर्टाच्या निकालानंतर तीन वेळा अर्ज केला. 15, 23 मे आणि 2 जून त्यावर काहीच प्रतिसाद नाही. 18 सप्टेंबरला जेव्हा कोर्टाची तारीख आली त्याच्या आधी चार दिवस फक्त दिखावा म्हणून विधानसभा अध्यक्षांनी सुनावणी ठेवली. 2022 च्या प्रकरणात म्हणतात की आत्ता आम्हाला कागदपत्र मिळाले नाही. अध्यक्षांना या केस मध्ये ट्रिब्युनल अर्थात लवाद म्हणून काम करायचं आहे. सभागृहाचे अध्यक्ष म्हणून नाही, असा युक्तीवाद कपिल सिब्बल यांनी केला.
राहुल नार्वेकरांना सुनावणी घ्यावीच लागेल (What will Rahul Narvekar do?)
दरम्यान, आजच्या सुनावणीत काय काय झालं याची माहिती सुप्रीम कोर्टाचे वकील अॅड सिद्धार्थ शिंदे (Siddharth Shinde) यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली.
सिद्धार्थ शिंदे म्हणाले, "कोर्टात आज 15 मिनिटे खडाजंगी झाली. सिब्बल यांनी युक्तीवाद मांडताना अनेक दाखले दिले. "आमदार अपात्रेबाबत राहुल नार्वेकरांनी पहिली सुनावणी जवळपास 3 महिन्यांनी म्हणजे 14 सप्टेंबरला घेतली. यानंतर पुढे कशी सुनावणी होईल याबाबत काहीच सांगितलं नाही. त्यामुळे नार्वेकर हे वेळकाढूपणा करत आहेत" असं सिब्बल म्हणाले. यावर कोर्टाने सांगितलं पुढची सुनावणीची तारीख द्यावी लागेल. राहुल नार्वेकरांना 1 आठवड्यात सुनावणी घ्यावीच लागेल. त्यानंतर याप्रकरणात नार्वेकरांना आपली बाजू मांडण्यासाठी दोन आठवड्यांचा अवधी दिला. त्यामुळे आमदार प्रकरणाची सुनावणी ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे.
अनिल देसाई काय म्हणाले? (Anil Desai reaction on Shiv Sena)
दरम्यान, याप्रकरणी ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांनी दिल्लीत आपली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले "सुप्रीम कोर्टात दोन्ही बाजूने युक्तीवाद झाला. कोर्ट नार्वेकरांना म्हणाले, आम्ही निश्चित वेळ ठरवून दिला नसला, तरी तुम्ही 4 महिने उलटून गेले तरी काही केलं नाही. अध्यक्षांनी लवाद म्हणून काम करायला हवं. जे कागदपत्र आहेत त्याबाबत आठवड्यात सुनावणी घेऊन या. आम्ही दोन आठवड्यांनी पुन्हा सुनावणी घेऊ, असं सुप्रीम कोर्ट विधानसभा अध्यक्षांना सांगितलं".
अध्यक्षांविरोधात ठाकरे गटाची याचिका, आत्तापर्यंत काय काय घडलं?
- 11 मे रोजी सत्ता संघर्षाचा निकाल आला
- अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्ष यांच्याकडे कोर्टाने सोपावला
- शिवसेना ठाकरे गटाने 15 मे 22 मे आणि तीन जून अध्यक्षांना विनंती केली तातडीने सुनावणीसाठी
- पण दाद न मिळाल्यामुळे चार जुलै रोजी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली
- या याचिकेवर 22 जुलैला सुनावणी होणार होती त्याच्या आधी एक आठवडा अध्यक्षांनी पहिली नोटीस काढली
- 22 जुलै च्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने अध्यक्षांना ठाकरे गटाच्या आरोपांबाबत उत्तर देण्यास सांगितलं
- पुढची सुनावणी दोन आठवड्यानंतर होणे अपेक्षित होतं पण तारीख पुढे गेली आणि आज 18 सप्टेंबरला सुनावणी झाली
- 18 सप्टेंबर च्या सुनावणी आधी 14 सप्टेंबर रोजी अध्यक्षांनी अपात्रतेबाबत सुनावणी घेतली