व्हिपचे उल्लंघन केल्याप्रकरणी आदित्य ठाकरे वगळता इतर 14 आमदारांवर कारवाई करा, भरत गोगावले यांचे विधानसभा अध्यक्षांना पत्र
Shivsena Vs Eknath Shinde : एकनाथ शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी शिवसेनेच्या 14 आमदारांच्या विरोधात विधानसभा अध्यक्षांकडे तक्रार केली आहे.
मुंबई: व्हिपचे उल्लंघन केल्याप्रकरणी मुख्यमंत्री शिंदे गटाचे भरत गोगावले यांनी शिवसेनेच्या 14 आमदारांची विधानसभा अध्यक्षांकडे तक्रार केली आहे. यामध्ये आदित्य ठाकरे यांचे नाव वगळून इतर 14 जणांची तक्रार करण्यात आली आहे. आज झालेल्या बहुमत चाचणीच्या वेळी या आमदारांनी व्हिपचे पालन केलं नसल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला.
शिवसेनेच्या 15 आमदारांनी आज झालेल्या बहुमताच्या चाचणीच्या वेळी एकनाथ शिंदे गटाच्या बाजूने मतदान केलं नाही. या 15 आमदारांमध्ये आदित्य ठाकरे यांचाही समावेश आहे. पण गोगावले यांनी केलेल्या तक्रारीमध्ये त्यांचे नाव वगळण्यात आलं आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर असलेल्या प्रेमापोटी आदित्य ठाकरे यांचे नाव वगळण्यात आल्याचं गोगावले यांनी सांगितलं.
शिवसेनेच्या या 14 आमदारांना आता व्हीपचे पालन न केल्याने नोटीस देण्यात आली आहे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातील लढाई आता कायदेशीर मार्गावर पोहोचली आहे. आज झालेल्या बहुमत चाचणीमध्ये एकनाथ शिंदे सरकार पास झाले.
दरम्यान, अजय चौधरी यांची गटनेतापदाची निवड रद्द केल्याच्या विरोधात शिवसेना आजच सुप्रीम कोर्टात धाव घेणार आहे. अजय चौधरी यांच्या गटनेतेपदाची निवड रद्द करण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांना नाही असे शिवसेनेने म्हटले आहे.
रविवारी विधानसभेच्या विशेष अधिवेशन सत्रात विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक पार पडली. यावेळी शिवसेनेच्या व्हिप विरोधात 39 आमदारांनी मतदान केले असल्याचे निदर्शनास आणले. त्यानंतर आधीच्या पिठासीन अधिकाऱ्यांनी व्हीपच्या विरोधात 39 मतदारांनी मतदान केल्याचं सभागृहात रेकॉर्डवर आणलं होते. विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर आसनावर आले. त्यावेळी त्यांच्यासमोर कुठलाही नवीन व्हीप नव्हता. मात्र, तरीही त्यांनी पुन्हा त्याच व्हीपच्या आधारे कारवाई करणे हे असंवैधानिक असल्याचा मुद्दा शिवसेनेने उपस्थित केला आहे. या मुद्याच्या आधारे शिवसेना सु्प्रीम कोर्टात याचिका दाखल करणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
