Maharashtra Political Crisis : मोठी बातमी! बंडखोर आमदारांनी मविआ सरकारचा पाठिंबा काढला, याचिकेत दावा
Maharashtra Political Crisis Supreme Court: शिवसेनेच्या 38 बंडखोर आमदारांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढला असल्याचे याचिकेत म्हटले आहे.
Maharashtra Political Crisis : राज्यातील सत्तासंघर्ष सुप्रीम कोर्टात पोहचला आहे. बंडखोर आमदारांचे नेते एकनाथ शिंदे आणि भरत गोगावले यांनी दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. मात्र, त्याआधीच मोठी बातमी समोर आली आहे. बंडखोर 38 आमदारांनी दाखल केलेल्या याचिकेत सरकारचा पाठिंबा काढला असल्याचा दावा केला आहे. महाविकास आघाडीकडून विधानसभा उपाध्यक्षांचा दुरुपयोग सुरू असल्याचा दावा शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी केला आहे.
महाराष्ट्रातल्या सत्ताकारणाचा खेळ अखेर अपेक्षेप्रमाणे सर्वोच्च न्यायालयात पोहचला. एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर आता अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. शिवसेनेकडून होत असलेल्या अपात्रतेच्या कारवाई विरोधात शिंदे गट सर्वोच्च न्यायालयात गेला आहे. बंडखोर आमदारांवर होत असलेल्या अपात्रतेच्या कारवाईला स्थगिती देण्याची मागणी शिंदे गटाकडून करण्यात आली आहे. तसेच अजय चौधरींच्या गटनेते पदाला शिंदे गटाचा आक्षेप असल्याची याचिका देखील दाखल करण्यात आली आहे.
बंडखोर आमदारांनी दाखल केलेल्या याचिकेत विधानसभा उपाध्यक्षांनी सुरू केलेली अपात्रतेची कारवाई थांबवण्याचे आदेश देण्याची मागणी केली आहे. महाविकास आघाडीचा 38 आमदारांनी पाठिंबा काढला आहे. त्यामुळे सरकारने बहुमत गमावले आहे. त्यानंतरही विधानसभा उपाध्यक्ष कार्यालयाचा दुरुपयोग राज्य सरकारने सुरू केला असल्याचे बंडखोर आमदारांनी याचिकेत म्हटले आहे.
विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी शिवसेनेच्या 16 बंडखोर आमदारांना अपात्रतेची नोटीस बजावली आहे. या आमदारांना 27 जून रोजी सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत उत्तर द्यावे लागणार आहे. अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. आमदार अपात्र ठरल्यास शिंदे गटाला मोठा धक्का बसणार आहे. मात्र, त्यापूर्वी आता सुप्रीम कोर्ट आज सुनावणीत काय निर्देश देणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, शिवसेना नेते संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांवर पुन्हा हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्राची माती ही गुवाहाटीला गेलेल्या आमदारांना माफ करणार नाही, असं संजय राऊत म्हणाले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची फोनवरुन चर्चा झाल्याच्या बातम्यांनी जोर धरला आहे. याबाबत बोलताना फक्त मनसेच नाही, तर एमआयएममध्येही ते जाऊ शकतात, असा टोलाही राऊतांनी लगावला आहे. रोड टेस्ट आणि फ्लोअर टेस्टमध्ये आम्हीच विजयी होणार, असा विश्वासही संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.
उदय सामंत शिंदे गटात सामील झाले. हा मोठा धक्का आहे का? याबाबत राऊतांना विचारलं असता ते म्हणाले की, "हा धक्का नाही. उदय सामंत सर्वांचे जवळचे होते. दीपक केसरकर आमचे जवळचे आहेत. तिथे असलेला प्रत्येक व्यक्ती आमच्या जवळचा आहे. एकनाथ शिंदे आमच्या सर्वात जवळचे आहेत असेही त्यांनी म्हटले.