Maharashtra Political Crisis : करेक्ट कार्यक्रम! ...तर, भाजप अशी करणार ठाकरे सरकारची शिकार?
Maharashtra Political Crisis : भाजपकडून राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी पडद्यामागून हालचाली सुरू आहेत.
Maharashtra Political Crisis : महाराष्ट्रात सध्या मोठ्या राजकीय घडामोडी सुरू आहेत. शिवसेनेत अभूतपूर्व बंडखोरी झाली आहे. तर, दुसरीकडे भाजपकडून सत्ता स्थापन करण्यासाठीच्या हालचाली सुरू आहेत. राज्यातील राजकारणाचा वाद थेट सुप्रीम कोर्टात पोहचला आहे. सुप्रीम कोर्टाने सोमवारी झालेल्या सुनावणीनंतर महत्त्वाचे निर्देश देत आता पुढील सुनावणी 11 जुलै रोजी ठेवली आहे. मात्र, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाआधीच भाजपकडून ठाकरे सरकारची शिकार होणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
भाजपकडून आपल्या राजकीय हालचालींवर मौन बाळगले जात आहे. मात्र, भाजपने ठाकरे सरकारविरोधात पावले उचलण्यास सुरुवात केली असल्याची चर्चा आहे. या सगळ्यात आता राजभवन अधिक सक्रिय होणार असल्याचे म्हटले जात आहे. शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना अपात्रतेच्या कारवाईपासून वाचवणे हीदेखील भाजपची प्राथमिकता असल्याचे म्हटले जात आहे. शिवसेनेच्या 16 आमदारांना अपात्रेच्या कारवाईची नोटीस बजावण्यात आली आहे.
भाजप काय सुरू शकते?
सध्या सुरू असलेल्या राजकीय घडामोडींबाबत विविध चर्चा सुरू आहे. या चर्चांनुसार, भाजप लहान पक्षांचा मोठ्या खुबीने वापर करणार असल्याचे म्हटले जात आहे. यामध्ये विधानसभा उपाध्यक्षांविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात येणार. त्यानंतर राज्यपाल आपल्या अधिकारांचा वापर करून अंतरिम विधानसभा अध्यक्षांची नेमणूक करतील. हे अंतरिम अध्यक्ष भाजपचे आमदार असण्याची दाट शक्यता आहे. अंतरिम अध्यक्षपदासाठी विधानसभेतील ज्येष्ठतेचा कार्यकाळ लक्षात घेतला जाईल.
विधानसभेच्या अंतरिम अध्यक्षांच्या निवडीनंतर राज्यपाल ठाकरे सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश देण्याची शक्यता आहे. ठाकरे सरकारने बहुमत सिद्ध न केल्यास सरकार पायउतार होईल. त्यानंतर राज्यपाल भाजपला सत्ता स्थापन करण्याचे निमंत्रण देतील.
दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजप आणि एकनाथ शिंदे गटामध्ये संभाव्य मंत्रिमंडळाबाबत चर्चा झाली आहे. यामध्ये भाजपच्या कोट्यात 18 कॅबिनेट आणि 10 राज्यमंत्री पदासह 28 मंत्री असणार आहे. तर, शिंदे गटाला 6 कॅबिनेट आणि सहा राज्यमंत्री पद देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.