(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Omicron Cases : बुधवारी राज्यात 214 ओमायक्रॉनच्या रुग्णांची नोंद, सर्वाधिक रुग्ण पुणे शहरात
Maharashtra Omicron Cases : मंगळवारी राज्यात एकाही ओमायक्रॉनबाधिताची नोंद झाली नव्हती. त्या तुलनेत आज 214 ओमायक्रॉनबाधितांची नोंद करण्यात आली आहे.
मुंबई : राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्या गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत काहीशी कमी झाली असली तरी ओमायक्रॉनच्या रुग्णसंख्येत सातत्याने चढ-उतार सुरु आहेत. राज्यात बुधवारी 214 ओमायक्रॉनच्या रुग्णसंख्येची नोंद करण्यात आली आहे. राज्यात आतापर्यंत ओमायक्रॉनच्या 2074 रुग्णांची नोंद करण्यात आली असून त्यापैकी 1091 रुग्ण हे बरे होऊन घरी परतले आहेत. महत्वाचं म्हणजे मंगळवारी राज्यात एकाही ओमायक्रॉन रुग्णाची नोंद करण्यात आली नव्हती.
राज्यात आज सापडलेल्या ओमायक्रॉनच्या रुग्णांपैकी सर्वाधिक जास्त म्हणजे 158 रुग्ण हे पुण्यात सापडले आहेत. त्यानंतर मुंबईत 31, पुणे ग्रामीणमध्ये 10 रुग्ण सापडले आहेत.
राज्याची स्थिती
गेल्या 24 तासात राज्यात कोरोनाच्या 43 हजार 697 नव्या रुग्णांची भर झाली असून 49 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या 24 तासात 46, 591 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. मंगळवारी राज्यात कोरोनाच्या 39 हजार 207 रुग्णांची नोंद झाली होती. म्हणजे आज चार हजार रुग्णांची वाढ झाली आहे. राज्यात आज 49 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 1.93 टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत 69 लाख 15 हजार 407 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.04टक्के आहे. सध्या राज्यात 23 लाख 93 हजार 704 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 3200 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आजपर्यंत 7 कोटी 25 लाख 31 हजार 814 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.
मुंबईत सहा हजार कोरोना रुग्णांची नोंद
मुंबईत बुधवारी 6 हजार 32 नवे रुग्ण आढळले असून 12 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या 16 हजार 488 झाली आहे. तर नव्या बाधितांच्या तुलनेत जवळपास तिप्पट रुग्ण म्हणजेच 18 हजार 241 जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे सध्या मुंबईचा रिकव्हरी रेट वाढला असून 95 टक्के इतका आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- Maharashtra Corona Update : राज्यात बुधवारी बाधित रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या अधिक
- Mumbai Corona Update : मुंबईतील रुग्णसंख्या स्थिरावली, आजही नवे 6 हजार 32 कोरोनाबाधित
- Coronavirus Mumbai : 'मुंबईतील कोरोनाची परिस्थिती आता आमच्या नियंत्रणात', मुंबईकरांनी चिंता करण्याचं कारण नाही, बीएमसीचा हायकोर्टात दावा