Maharashtra News : नेत्यांची मतांसाठी, जनतेची पाण्यासाठी वणवण; घोटभर पाण्यासाठी जनतेच्या जिवाशी खेळ
पाण्यासाठीचा जीवघेणा संघर्ष सुरूच आहे पण पाणी काही मिळत नाही. राज्यसभा निवडणुकीच्या घोडेबाजाराच्या भीतीनं मुंबईतल्या पंचतारांकित हॉटेल्समध्ये बसलेले मूलभूत समस्यांकडे कधी लक्ष देणार हा प्रश्न आहे
नाशिक : राज्यात सत्ताधारी, विरोधक आणि मतदारराजा अशी तिघांचीही वणवण सुरू आहे. पण इथं तिघांच्या गरजा वेगळ्या आहेत. राजकारण्यांची मतांसाठी आणि जनतेची घोटभर पाण्यासाठी वणवण सुरू आहे. मतं फुटू नयेत म्हणून आमदारांना सुरक्षित ठेवण्यात व्यस्त असलेल्या नेत्यांना त्यांचे मतदार घोटभर पाण्यासाठी जीवाशी झुंजतायत हे माहिती नसावं.
नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात असलेल्या आदिवासी पड्यावरील नागरिकांची पाण्यासाठीची वणवण काही केल्या थांबत नाही. इगतपुरी तालुक्यातील खैरेवाडी गावात पाण्याचे प्रचंड दुर्भिक्ष आहे. तीन साडेतीन किलोमीटर अंतरावर विहिरीत खाली 30 ते 35 फूट खाली उतरुनही गाळ मिश्रित पाणी पिण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे. तर दुसरीकडे पेठ तालुक्यातल्या बोरीची बारी गावातल ही ताई पाणी आणण्यासाठी गेली आणि थेट विहिरीत कोसळली. पाण्याचा टँकर पुरत नाही तर पाण्याशिवाय पान हलत नाही, अशी अनेक जिल्ह्यातील पाण्याची परिस्थती आहे. पाण्यासाठीचा जीवघेणा संघर्ष सुरूच आहे पण पाणी काही मिळत नाही. राज्यसभा निवडणुकीच्या घोडेबाजाराच्या भीतीनं मुंबईतल्या पंचतारांकित हॉटेल्समध्ये बसलेले मूलभूत समस्यांकडे कधी लक्ष देणार हा प्रश्न आहे
सर्वसामान्य जनता आणि लोकप्रतिनिधी यांची लाइफस्टाइल दाखविणाऱ्या घटना सध्या महाराष्ट्रात घडत आहेत. एकीकडे राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदारांची बडदास्त ठेवली जातेय. तर दुसरीकडे सर्वसामान्य जनता घोटभर पाण्यासाठी जीवाची बाजी लावत आहेत. मुंबईत एका आमदाराच्या एका खोलीचं रोजचं भाडं किमान 10 हजारांच्या घरात आहे. एकूण 285 आमदार आहेत. रोजचा खर्च हा 28 लाख 50 हजारांचा आहे. म्हणजे किमान तीन दिवसांचा राहण्याचा खर्च 1 कोटी 14 लाख आहे. पाण्याच्या एका टँकरचा सरासरी खर्च हा एक हजार रुपये पकडला तर 11 हजार 400 टँकर येतील. समजा पाऊस लांबला तर पुढचा महिनाभर रोज 380 टँकर पुरवता येतील...
पण या स्वप्नरंजनात रमण्यात काही अर्थ नाही. माणसं तहानलेलीच राहतील कारण या आकडेवारीपेक्षा सध्या सरकार बहुमताचे आकडे गाठण्यात मश्गुल आहे. बाकी कोणी नाही पणज्या भागात पाणी टंचाई आहे. ज्या भागातली महिला पाणी ओढताना विहिरीत कोसळली किमान तिथल्या आमदारांनी तरी फाईव्ह स्टार हॉटेलमधल्या
100 रुपये लिटरच्या पाण्याने आपली तहान भागवताना आपल्या मतदारसंघातल्या तहानलेल्या लोकांची आठवण काढावी...