Sanjay Raut : अजितदादांमध्ये मुख्यमंत्री होण्याची क्षमता, त्यांना माझ्या शुभेच्छा : संजय राऊत
Sanjay Raut : अजितदादांमध्ये मुख्यमंत्री होण्याची क्षमता आहे. त्यांना माझ्या शुभेच्छा असल्याचे वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला.
Sanjay Raut : मुख्यमंत्री होणं कोणाला आवडणार नाही. अजितदादांमध्ये मुख्यमंत्री होण्याची क्षमता आहे. त्यांना माझ्या शुभेच्छा असल्याचे वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला. अजितदादा हे अनेक वर्ष मंत्री आहेत. एखाद्याच्या भाग्यात असेल तर ते मुख्यमंत्री होतील असंही राऊत म्हणाले. अनेकजण लायकी नसताना मुख्यमंत्री होतात असेही राऊत म्हणाले.
2024 साली आम्ही सत्तेत येऊ
सर्वांत जास्त वेळा उपमुख्यमंत्री होण्याचा विक्रम अजित पवारांनी केला आहे. त्यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता असल्याचे संजय राऊत म्हणाले. महाविकास आघाडी मजबूत आहे. आता सध्या आम्ही विरोधी पक्षात आहोत. सध्या मुख्यमंत्री पदाचा विषय नाही असेही राऊत म्हणाले. 2024 साली आम्ही परत सत्तेत येऊ, त्यावेळी पाहू असेही संजय राऊत म्हणाले. वज्रमूठ सभा ही तीन पक्ष एकत्र घेऊन करत आहेत. तीन पक्षांचा निर्णय असतो की सभा कोठे घ्यायची? सभेत कोणी बोलायचे? हा तिघांचा निर्णय असतो. त्यामुळं कोणतेही वाद नसल्याचे संजय राऊत म्हणाले.
जळगाव शिवसेनेचं
उद्या (23 एप्रिल) उद्धव ठाकरेंची जळगाव जिल्ह्यातील पाचोऱ्यात जाहीर सभा होणार आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर आढावा घेण्यासाठी खासदार संजय राऊत हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. आज त्यांनी जळगावमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिवसेनेच्या शिंदे गटावरही टीका केली. जळगाव आमचं आहे, शिवसेनेचं आहे. उद्या दुपारी उद्धव ठाकरे यांचे जळगावला आगमन होईल. तेथून ते पाचोऱ्याला जातील. उद्याची सभा मोठी होईल असा विश्वास राऊतांनी व्यक्त केला. या सभेची पूर्ण तयारी झाल्याचे अजित पवार म्हणाले.
आमच्या पत्रकार परिषदेची विरोधकांना भीती आणि पोटशूळ
आमच्या पत्रकार परिषदेची विरोधकांना भीती आणि पोटशूळ आहे. आम्ही जे सत्य बोलत आहोत ते ऐकण्याची आणि सहन करण्याची तुमची हिंमत नसल्याचे संजय राऊत म्हणाले. आम्ही जंगलात उघड फिरणारे वाघाची ऐलाद असल्याचे राऊत म्हणाले. तुम्ही सगळे गुलाम आहेत असे म्हणत राऊतांनी मनसेवर टीका केली. आम्ही संघर्ष करणार असल्याचे राऊत म्हणाले. काही जण लबाडी करुन सत्ता मिळवतात. पक्ष कोणाचा हे आमदार संख्येवरुन ठरवणं चुकीचं असं म्हणत संजय राऊतांनी निवडणूक आयोगावरही टीका केली. शिवसेनेनं सामान्य माणसाला मंत्री केलं, आमदार केलं. शिवसेनेची ताकद आजही कायम आहे. पळून गेलेल्यांना जनता मतपेटीतून उत्तर देईल असेही राऊत म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या:
Ajit Pawar : 2024 ला नाही, मी आताच 'मुख्यमंत्री' होणार; अजित पवार यांचं सूचक वक्तव्य