Sanjay Shirsat: अजित पवारांच्या मनात काय? येत्या चार दिवसांत कळेल; संजय शिरसाट यांचा मोठा दावा
Sanjay Shirsat On Ajit Pawar: शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी मुंबईत आज होणाऱ्या वज्रमुठ सभेवर प्रतिक्रिया देताना अजित पवारांबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.
Sanjay Shirsat On Ajit Pawar: गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे नेते तथा विरोधी पक्षनेते अजित पवारांबद्दल (Ajit Pawar) वेगवेगळ्या चर्चा सुरु आहेत. तर अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा देखील सुरु आहेत. दरम्यान याचवेळी शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी मुंबईत आज होणाऱ्या वज्रमुठ सभेवर प्रतिक्रिया देताना अजित पवारांबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. अजित पवार या सभांमध्ये मनापासून उपस्थित राहत नसून, त्यांचे मन कुठे आहे हे येणाऱ्या चार दिवसांत कळेल असं शिरसाट म्हणाले आहेत. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्यावरून अजित पवार भाजपसोबत जाणार का? या चर्चेला पुन्हा उधाण आले आहे.
काय म्हणाले शिरसाट...?
मुंबईत आज होणाऱ्या वज्रमूठ सभेवर प्रतिक्रिया देताना शिरसाट म्हणाले की, या सभेत अजित पवार यांना आज सगळ्यात जास्त त्रास होत असेल. त्यांना सभेत खुर्ची आहे की, नाही माहित नाही. तसेच अजित पवार सभेत आले तर काय बोलणार माहीत नाही. पण या सभेत अजित पवार शरीराने असतील मात्र मनापासून सभेत नसणार आहे. ते मनातून कुठे असतील याबाबत 4 दिवसांत कळेल आणि सगळ्यांना दिसेल. अजित दादा सगळे विषय हसून खेळून टोलवत आहे. याचाच अर्थ त्यांच्या मनात काहीतरी आहे आणि ते निर्णय शंभर टक्के घेतील.
वज्रमूठ सभेवरून टीका...
दरम्यान, आज मुंबईत होणाऱ्या वज्रमूठ सभेवरून देखील शिरसाट यांनी महाविकास आघाडीसह ठाकरे गटावर निशाणा साधला आहे. यावेळी बोलताना शिरसाट म्हणाले की, "यापूर्वी सुद्धा त्या मैदानावर बाळासाहेबांनी सभा घेतल्या आहे. त्या सभांसोबत आजच्या सभेची बरोबरी करता येणार नाही. तर तीन पक्ष एकत्र येऊन गर्दी करतायत आणि आम्ही सोबत आहोत हे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न करतायत. पण सभेमुळे महाराष्ट्र कुणाच्या मागे आहे ते कळत नाही. सभेमुळे वातावरण बदलते हा समज चुकीचा आहे. शिवसेनाप्रमुख मला म्हणायचे, गर्दी होते मग मतदान का मिळत नाही? त्यामुळं फार लक्ष द्यायची गरज नाही," असे शिरसाट म्हणाले.
17 सप्टेंबरला संभाजीनगरमध्ये कॅबिनेट बैठक होईलच
तर गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यात मंत्रीमंडळाची बैठक आयोजित करण्याची मागणी सातत्याने होत असल्याच्या प्रश्नाला उत्तर देताना शिरसाट म्हणाले की, मराठवाडा मुक्ती संग्रामदिनी मंत्रिमंडळाची बैठक छत्रपती संभाजीनगरात व्हायला हवी या मताचा मी आहे. यातून मराठवाड्यावरील अन्याय दूर होतो. त्यामुळे ही बैठक व्हायला हवी यासाठी मी प्रयत्न करेल. यावेळी 17 सप्टेंबरला संभाजीनगरमध्ये कॅबिनेट बैठक होईलच, असा दावा देखील शिरसाट यांनी केला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
पैठण बाजार समितीसाठी झालेल्या निवडणुकीचे आज निकाल; मंत्री भुमरेंची प्रतिष्ठा पणाला