(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Today's Top News : आज दिवसभरात घडणाऱ्या महत्त्वाच्या बातम्या
National News : एबीपी माझाच्या प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत असतो.
मुंबई : राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामध्ये आज राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींपासून ते खेळ आणि मनोरंजनाच्या बाबतीत अपडेट्स देण्याचा प्रयत्न असतो. आपल्या प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत.
अॕड.गुणरत्न सदावर्ते यांची पोलीस कोठडी आज संपणार
अॕड. गुणरत्न सदावर्ते यांची पोलीस कोठडी आज संपत आहे. सदावर्ते यांच्या पोलीस कोठडीत वाढ होणार की त्यांना न्यायालयीन कोठडी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. जर न्यायालयीन कोठडी मिळाली तर त्यांच्या जामीनाची प्रक्रिया पूर्ण होणार की इतर जिल्ह्यातील गुन्ह्यांमध्ये त्यांना वर्ग केलं जाणार हे आज समणार आहे. दुपारी दोन नंतर त्यांना न्यायालयात घेऊन जाण्यासाठी सातारा पोलीस लॉकअपमधून बाहेर काढतील.
किरीट सोमय्या आज आर्थिक गुन्हे विभागात चौकशीसाठी हजर राहणार
भाजप नेते किरीट सोमय्या आज आर्थिक गुन्हे विभागात चौकशीसाठी हजर राहणार आहेत. विक्रांत घोटाळ्याबाबत सलग चार दिवस त्यांची चौकशी होणार आहे. याबरोबरच किरीट सोमय्या मुंबई मनपा कोरोना केस संदर्भात आझाद मैदान पोलीस ठाण्यात जाणार आहेत.
कुलगुरुंच्या निवडीसाठी शोध समिती सदस्य नेमणूक करण्यासाठी बैठक
कुलगुरूंच्या निवड प्रक्रियेच्या पेचात आजपासून मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरू निवड प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. मुंबई विद्यापीठांचे कुलगुरू सुहास पेडणेकर यांचा 9 सप्टेंबर रोजी कार्यकाळ पूर्ण होत आहे.
महाराष्ट्र विद्यापीठ कायदा 2016 सुधारणा विधेयक विधिमंडळात मंजूर झाल्यानंतर त्यावर राज्यपालांची स्वाक्षरी झालेली नाही. त्यामुळे कुलगुरूंची निवड नेमकी कशी करायची? असा पेचप्रसंग निर्माण झाला असतानाच आज कुलगुरुंच्या निवडीसाठी शोध समिती सदस्य नेमणूक करण्यासाठी विद्यापीठात बैठकीचे आयोजन राज्यपालांच्या सूचनेनंतर करण्यात आले आहे.
काँग्रेसच्या मच्छिमार संघटनांचे चार वाजता आंदोलन
राजभवनच्या रस्त्यावर काँग्रेसच्या मच्छिमार संघटनांचे चार वाजता आंदोलन होणार आहे. केंद्र सरकारच्या मच्छिमारांच्या विरोधातील निर्णय, सिआरझेड कायदा यांविरोधात हे आंदोलन केले जाईल. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि अस्लम शेखही या आंदोलनात सहभागी होण्याची शक्यता आहे.
700 वर्षीची परंपरा असणाऱ्या बागड यात्रेला सुरवात
अहमदनगर जिल्ह्यातील राहाता शहराचे ग्रामदैवत वीरभद्र महाराजांवर लाखो भाविकांची अपार श्रद्धा आहे. चैत्र पौर्णिमेला हनुमान जयंतीच्या दिवशी विरभद्र महाराज आणि मायंबा महाराजांची दोन दिवसीय यात्रा भरते. देवाला नवस केलेले हजारो भाविक लाकडापासून बनवलेल्या गळवंती रथावर गळी लागतात. कोरोना संकटामुळे दोन वर्षे यात्रोत्सव रद्द करण्यात आला होता. मात्र यावर्षी शासनाने परवानगी दिल्याने मोठ्या जल्लोषात राहाता येथील विरभद्र महाराज आणि मायंबा यात्रेला सुरुवात झाली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरात दौऱ्यावर
पंतप्रधान नरेंद्र मोदी 18 एप्रिलपासून गुजरातच्या दौऱ्यावर जाणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी 20 तारखेपर्यंत गुजरात दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात पंतप्रधान बनासकाठामध्ये तीन लाख महिलांना संबोधित करणार आहेत. पंतप्रधान 18 एप्रिलला सायंकाळी साडपाच वाजता गुजरातमध्ये पोहोचतील. त्यानंतर ते सायंकाळी 6 ते 7 च्या दरम्यान कमांड आणि कंट्रोल सेंटरला भेट देतील. 19 एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदी बनासकाठामधील गांधीनगर हेलिपॅड ते बनासदेरी या वेगळ्या प्रकल्पांच्या कामांची पाहणी करतील. तसेच तिथे ते महिला, शेतकऱ्यांशी देखील संवाद साधणार आहेत. गुजरातमध्ये या वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणुका होणार आहेत, त्यामुळे पंतप्रधान मोदींचा हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
डब्ल्यूएचओ प्रमुख उद्या गुजरातला येणार
कोरोना व्हायरस महामारीच्या सुरुवातीला चीनवरून वादाच्या भोवऱ्यात सापडलेले डब्ल्यूएचओचे प्रमुख डॉ. टेड्रोस अधनोम घेब्रेसियस उद्यापासून तीन दिवस गुजरातच्या दौऱ्यावर आहेत. भारतामध्ये झालेल्या कोरोना बळींच्या चुकीच्या मोजणी पद्धतीवरून वाद उद्भवलेला असतानाच ते भारत दोऱ्यावर येत आहेत.
ऑटो, कॅब चालकांचा संप
सीएनजी दरवाढ झाल्यामुळे दिल्लीतील ऑटो, कॅब चालक आजपासून दोन दिवस संपावर जाणार आहेत.
लखीमपूर खेरी प्रकरणातील आरोपी आशिष मिश्राच्या जामीनावर सुनावणी
लखीमपूर खेरी प्रकरणातील आरोपी आशिष मिश्राचा जामीनावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. 10 फेब्रुवारी रोजी अलाहाबाद उच्च न्यायालयाने आशिषला जामीन मंजूर केला होता. आंदोलनादरम्यान आशिष मिश्रा याच्या कारखाली चिरडून मृत्यूमुखी पडलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबीयांनी याविरोधात याचिका दाखल केली आहे.
उत्तर प्रदेशच्या मौलाना मोहम्मद अली जौहर ट्रस्टच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांच्याशी संबंधित असलेल्या या ट्रस्टने विद्यापीठ बांधण्यासाठी अधिग्रहित केलेली जमीन सरकारला परत करण्याच्या अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान दिले आहे.
आर्मी कमांडर्सची परिषद
आजपासून 22 एप्रिलपर्यंत नवी दिल्ली येथे आर्मी कमांडर्सची परिषद होणार आहे. रशिया-युक्रेन युद्धाचा भारताच्या संरक्षण-सुरक्षा व्यवस्थेवर काय परिणाम होईल, यावर लष्कर कमांडर्सच्या परिषदेत चर्चा होणार आहे.
काँग्रेस विधीमंडळ पक्षाची आज बैठक
काँग्रेसमधील असंतोष थोपवण्यासाठी आज काँग्रेस विधीमंडळ पक्षाची बैठक होणार आहे. सर्व आमदारांना बैठकीसाठी बोलवण्यात आले आहे.
श्रेयस अय्यर आणि संजू सॅमसन आमनेसामने
राजस्थान रॉयल्स आणि कोलकता नाईट रायडर्स यांच्यामध्ये मुंबईतील ब्रेबॉन मैदानावर सांयकाळी साडेसात वाजता सामना रंगणार आहे. संजू सॅमसनच्या नेतृत्वातील राजस्थानचा संघ विजयाची लय कामय राखण्यासाठी मैदानात उतरेल. तर श्रेयस अय्यर नेतृत्वातील कोलकाता संघ विजयाच्या पठरीवर परतण्यासाठी जिवाची बाजी लावेल. त्यामुळे सामना रोमांचक होण्याची शक्यता आहे.