Nashik Accident : निफाडच्या शिरवाडे गावावर दुःखाचा डोंगर, तीन मित्रांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू, बसचालक फरार
Nashik Accident : निफाड (Niphad) तालुक्यात बस आणि मोटरसायकल अपघातात तीन शिवसैनिकांचा (Shivsanik) मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
Nashik Accident : निफाड (Niphad) तालुक्यातून अपघाताची भीषण (Major Accident) घटना समोर आली आहे. शिरवाडे (वणी) फाटा (Shirwade Fata) येथे बस आणि मोटरसायकल अपघातात तीन शिवसैनिकांचा (Shivsanik) मृत्यू झाल्याची घटना सोमवार 26 जून रोजी रात्री 11 वाजेच्या दरम्यान घडली आहे. या घटनेमुळे आज शिरवाडे वणी गाव आणि शिरवाडे फाटा बंद ठेवणार असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे. त्यांच्या पार्थिवावर आज शिरवाडे (वणी) येथे अंतिम संस्कार करण्यात येणार आहे.
नाशिकसह (Nashik) जिल्ह्यात अपघाताच्या (Accident) घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असून समृद्धी महामार्गासह (Samurdhi Highway) इतर महत्वाच्या मार्गावर अपघात होत आहेत. निफाड तालुक्यात अपघाताची धक्कादायक घटना समोर आली आहे. तालुक्यातील पिपंळगाव पोलीस स्टेशन (Pimpalgaon Police) हद्दीत भीषण अपघात झाला आहे. एसटी आणि दुचाकीच्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला असून हे तिघेही शिवसेनेचे पदाधिकारी असल्याचे समोर आले आहे. पिंपळगावहुन येत असताना चांदवडकडून नाशिककडे जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या बसने दुचाकीला धडक दिली. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे.
युवासेना निफाड तालुका उपप्रमुख सुभाष माणिकराव निफाडे, शिवसैनिक महेश चंद्रकांत निफाडे, नितीन भास्करराव निफाडे या तिघांचे अपघातात निधन झाले. मुंबई आग्रा महामार्गावरील शिरवाडे फाट्यावरील रात्री 11 वाजेची घटना असून भरधाव वेगात एसटी बसने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीवरील तिघेही काही अंतर फरफटत गेले. रात्रीची वेळ असल्याने वेळेवर मदत मिळू शकली नाही. यातच त्यांचा मृत्यू झाला आहे. बसवरील चालक मद्यधुंद अवस्थेत असल्यामुळे तो गाडी चालवण्याच्या परिस्थितीत नसल्यामुळे चांदवडपासून वाहकाकडे गाडी चालवण्यास दिली होती, असा आरोप स्थानिकांकडून करण्यात आला आहे. त्यामुळे बस चालक आणि वाहकावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली असून अपघातानंतर बस चालक आणि वाहक फरार झाल्याचे सांगण्यात येत आहे.
निफाडे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर
दरम्यान या घटनेने शिरवाडे गावावर शोककळा पसरली असून घरातील कर्ते पुरुष गेल्याने कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तिघांवर एकाच वेळी शिरवाडे येथे शोकाकुल वातावरणात सकाळी दहा वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. नितीन निफाडे यांच्या पश्चात पत्नी, आई, वडील, दोन मुले, भाऊ भाऊजई, दोन मुली असा परिवार आहे. तर महेश निफाडे यांच्या पश्चात पत्नी, आई, भाऊ, भाऊजई, दोन मुली असा परिवार आहे. त्याचबरोबर सुभाष निफाडे यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, भाऊ, भाऊजई असा परिवार आहे. या मार्गावर वाहनांची वर्दळ अधिक असून अनेक ठिकाणी स्पीड ब्रेकर लावण्यात आले आहेत. स्पीड ब्रेकरवर वाहनांची गती कमी होत नसल्यामुळे अपघातांच्या प्रमाणात वाढ होत आहे. अनेक वेळा टोल कंपनीकडे मागणी केली असताना देखील उपाययोजना होत नसल्यामुळे नागरिकांमध्ये संताप आहे.