(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik Crime : 'गलेलठ्ठ पगार, मग हा मार्ग का?' नाशिकमध्ये एकाच दिवशी लाचखोरीच्या तीन घटना
Nashik Crime : नाशिकमध्ये (Nashik) एकाच दिवशी लाच (Bribe) घेतल्याच्या तीन घटना उघडकीस आल्या आहेत.
Nashik Crime : नाशिकमध्ये (Nashik) एकाच दिवशी लाच (Bribe) घेतल्याच्या तीन घटना उघडकीस आल्या असून पुन्हा एकदा नाशिकसह जिल्ह्यात लाच प्रकरणांनी (Bribe Cases) डोके वर काढले आहे. नाशिक शहरातील पाथर्डी परिसरातील मंडळ अधिकारी, सिन्नरच्या (Sinnar) आयटीआय संस्थेचा प्राचार्य आणि सुरगाणा (Surgana) तालुक्यातील उमेदचा (Umed) अधिकारी असे तिघेजण लाचलुचपत प्रतिबंधक पथकाच्या जाळ्यात सापडले आहेत. त्यामुळे नाशिक जिल्हा लाच प्रकरणात अव्वल स्थानी जातो कि काय असा प्रश्न सध्या उपस्थित होतो आहे.
दरम्यान काही दिवसांपासून लाच प्रकरणे उघडकीस येण्याचे प्रमाण कमी झाले होते. अशातच आज एसीबीने जिल्ह्यात तीन ठिकाणी सापळा रचून तिघांना अटक केली आहे. यामध्ये पाथर्डी परिसरातील मंडळ अधिकारी आणि खासगी एजंटला 50 हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. तर सिन्नरमध्ये आयटीआय प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्यास तीस हजार रुपयांची लाच घेताना पकडले आहे. तर सुरगाणा तालुक्यातील उमेदच्या एका प्रभाग समन्वयक यास 12 हजार रुपयांच्या लाच प्रकरणी ताब्यात घेण्यात आले आहे.
पहिली घटनेत नाशिक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने नाशिक शहरात मोठी कारवाई केली असून या कारवाई पाथर्डी परिसरातील मंडळ अधिकारी आणि खासगी एजंटला 50 हजरांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. नाशिक एसीबीने दिलेल्या माहितीनुसार पाथर्डी परिसराचे मंडळ अधिकारी पुरुषोत्तम दत्तात्रय पराडकर आणि खाजगी महिला एजंट केतकी किरण चाटोरकर या दोघांना पन्नास हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहेत. एका अर्जदाराच्या बाजूने निकाल देण्यासाठी पराडकर आणि चाटोरकर यांनी तब्बल एक लाख रुपयांची मागणी केली. या प्रकरणी एसीबीकडे तक्रार करण्यात आल्यानंतर एसीबीने सापळा रचला. त्यावेळी एक लाख रुपयांच्या लाचेपोटी पहिल्या हप्त्यात पन्नास हजार रुपयांची घेण्यात आली.
दुसऱ्या घटनेत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था सिन्नरच्या इमारतीचे ब्रिक बॅट कोबा व वॉटरप्रूफिंगच्या कामाचे 11 लाख 51 हजार 218 रुपये मंजूर करण्याच्या मोबदल्यात तीस हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या प्राचार्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली. प्राचार्य निलेश बबन ठाकूर असे लाचखोर प्राचार्याचे नाव आहे. नाशिक शहरातील तक्रारदाराने शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था सिन्नरच्या इमारतीचे ब्रिक बॅट कोबा व वॉटरप्रूफचे काम ही निविदेद्वारे घेतले होते. या कामाची रक्कम अकरा लाख 51 हजार 228 मंजूर केल्याच्या मोबदल्यात ठाकूर यांनी 21 ऑक्टोबर 2022 रोजी तक्रारदाराकडे तीन टक्क्यांप्रमाणे तीस हजार रुपये मागितले होते. या प्रकरणी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शहानिशा करून सापळा रचून बुधवारी तक्रादाराकडून 30 हजार रुपयांची लाच स्वीकारताना पथकाने ठाकूर यास अटक केली.
तिसरी घटना नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यात घडली आहे. उमेद अभियानांतर्गत केलेल्या मागील सहा महिन्यांचे कामाचे मानधन 27 हजार रुपये मिळवून देण्याच्या मोबदल्यात हट्टी येथील प्रभाग समन्वयक विलास मोतीराम खटके यांनी तक्रादाराकडे 12 हजार रुपये लाचेची मागणी केली. तडजोडी अंत्य दहा हजारांची मागणी केल्याने प्राप्त तक्रारीवरून लासलुचपत विभागाने सापळा रचून कारवाई केली. त्यात विलास खटके यांनी लाचेची मागणी केली तर तालुका अभियान व्यवस्थापक प्रमोद बाळासाहेब पाटोळे यांनी प्रोत्साहन दिले. तर खटके यांच्या सांगण्यानुसार खासगी व्यक्ती यादव मोतीराम गांगुर्डे यांनी दहा हजार रुपयांची लाच पंचायत समिती कार्यालयासमोर स्वीकारताना पकडण्यात आले.