(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik News : नाशिकच्या ग्रामीण भागात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट, अशी करता येईल तक्रार
Nashik News : नाशिक (Nashik) जिल्ह्यात बोगस डॉक्टरांचा शोध घेण्याच्या सूचना आरोग्य विभागाने दिल्या आहेत.
Nashik News : नाशिक (Nashik) जिल्ह्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर बोगस डॉक्टरांचा (Fake Doctors) सुळसुळाट वाढला असून कोरोनानंतर (Corona) हे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. गेली दोन वर्ष कोरोनामुळे जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा गुंतलेली असताना त्याचा फायदा बोगस डॉक्टरांनी घेतला आहे. विशेषतः आदिवासी जनतेचा अज्ञानाचा फायदा घेत या बोगस डॉक्टरांनी आपले खिसे भरून घेतले आहेत. आता मात्र पुन्हा एकदा आरोग्य विभागाने सर्व तालुक्यांच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना (Medical Officers) पत्र पाठवून बोगस डॉक्टरांचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या आहेत
गेल्या अनेक वर्षांपासून बोगस डॉक्टरांचा समस्या ग्रामीण भागात पाहायला मिळते आहे. ग्रामीण भागात स्थानिक लोकांना हाताशी धरून काही फेक डिग्री धारक डॉक्टर दवाखाना उभा करतात. अशा ठिकाणी स्थानिक लोकांना जवळपास उपचार मिळत असल्याने लांबचा पल्ला न गाठता स्थानिक डॉक्टरांकडे नागरिक उपचार घेतात. परिणामी अशा डॉक्टरांचे फावते. नाशिक जिल्ह्यात (Nashik District) सेवा न पोहोचलेल्या आदिवासी व दुर्गम भागात प्रामुख्याने या बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट पाहायला मिळतो. फेक डिग्रीच्या नावाखाली तात्पुरता दवाखाना सुरू करून स्वस्तात उपचार करण्याचे आमिष ग्रामस्थांना दाखवले जाते. सर्दी, खोकला, ताप आदी आजारांवर औषधी दुकानात मिळणारे गोळ्या औषधांचा वापर करून या डॉक्टरांकडून रुग्णांवर उपचार केला जातो. त्यात रोगाचे निदान होत नसल्याने अनेकांना आपला हकनाक जीव गमवावा लागल्याची उदाहरणे आहेत. शिवाय या बोगस डॉक्टरांकडून निदान न झाल्यास पुढे दुसऱ्या डॉक्टरांकडे रुग्णाला पाठवून देतात.
साधारणता ग्रामीण भागातच बोगस डॉक्टर कार्यरत असून आजार गंभीर झाल्यावर आरोग्य केंद्र उपचार घेण्यासाठी रुग्णालयावर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीतून बोगस डॉक्टर निष्पन्न झाले आहेत. नाशिक जिल्ह्यात अशा प्रकारे 12 बोगस डॉक्टर दोन वर्षात सापडले आहेत. बोगस डॉक्टरांच्या शोधासाठी तालुका पातळीवर समित्या गठीत करण्यात आल्या असून त्याचे प्रमुख तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना करण्यात आले आहे या समितीत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी तहसीलदार गावातील सरपंच, आरोग्यसेविका, ग्रामसेवकांचा समावेश आहे. मुळातच अशा डॉक्टरांना गावातीलच पुढाऱ्यांचा पाठिंबा असल्याने बोगस डॉक्टर कारवाईला जुमानत नाहीत. अशाप्रकारे नागरिकांची फसवणूक करून झोळी भरण्याचे काम ते करत असतात. मात्र या सगळ्यांना लगाम लावण्यासाठी जिल्हा आरोग्य प्रशासनाने कठोर पाऊले उचलणे आवश्यक आहे.
बोगस डॉक्टरांविरुद्ध तक्रारी
दरम्यान अनेक नागरिकांना धाडस करून बोगस डॉक्टरांविरुद्ध तक्रार दाखल केल्या आहेत. बोगस डॉक्टरांविरुद्ध आरोग्य विभागाकडे तक्रार दाखल झाल्यानंतर या तक्रारीची शहानिशा करण्यासाठी बोगस डॉक्टरांना नोटीस बजावण्यात आल्या. मात्र चौकशी सुरू होण्यापूर्वीच या डॉक्टरांनी पळ काढल्याची माहिती समोर आली आहे. नाशिक जिल्ह्यात बोगस डॉक्टरांविरुद्ध तक्रार प्राप्त झाले. त्याची तात्काळ खात्री केली जाते. कोरोनामुळे आरोग्य विभाग जास्त असल्यामुळे मध्यंतरी थांबलेली कारवाई आता पुन्हा सुरू करण्यात आली आहे. तशा सूचना तालुका पातळीवर देण्यात आल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर कपिल आहेर यांनी सांगितले.