Nashik Dada Bhuse : 'संजय राऊतांचा चेहरा काही दिवसांनी टीव्हीवर दिसणे बंद होईल', पालकमंत्री भुसे यांचा टोला
Nashik Dada Bhuse : गेल्या काही दिवसांपासून राऊत यांचे दिसणे कमी झाले आहे. येत्या दिवसात ते पूर्णपणे बंद होईल.
Nashik Dada Bhuse : काही महिन्यांपासून रोजच संजय राऊत (Sanjay Raut) यांचा चेहरा टीव्हीवर दिसतो आहे. राज्यातील जनता त्यांना बघते आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून राऊत यांचे दिसणे कमी झाले आहे. येत्या दिवसात ते पूर्णपणे बंद होईल, असा टोला पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी संजय राऊत यांना लगावला आहे. संभाव्य मंत्रिमंडळ विस्तारात नाशिकच्या काही आमदारांना स्थान मिळेल काय? या प्रश्नावर भुसे यांनी सावध भूमिका घेत हा सर्व निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा असल्याचे सांगून मंत्री मंडळ विस्तारावर भाष्य करण्याचे टाळले.
नाशिक (Nashik) दौऱ्यावर आले असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी संजय राऊत यांच्या विषयी यांच्यावर टीका करताना म्हणाले की संजय राऊत हे काही दिवसांपूर्वी कॅमेरासमोर थुंकले होते. याची आठवण त्यांनी करून दिली. मात्र त्यांच्या कृतीने ग्रामीण भागात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत. एका आजीने अशा थुंकणाऱ्याची तोंडल्यानंतर आजार जडतो असे भाष्य आपल्या जवळ केल्याचे भुसे यांनी सांगितले. तर उद्यावर आलेल्या शिवसेनेचे (Shivsena) 19 जून रोजी 57 व्या स्थापना दिनाच्या निमित्ताने संपूर्ण वर्षभर राज्य सरकारने केलेली कामे, जनहिताचे निर्णय व शासकीय लाभाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम केले जाणार असल्याचे सांगून त्यासाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांना कार्यक्रम आखून देण्यात आल्याचे भुसे म्हणाले.
दादा भुसे पुढे म्हणाले, जिल्हाधिकारी पोलीस आयुक्त व महापालिका आयुक्तांच्या बदल्या व अतिरिक्त कारभारामुळे काहीसा प्रशासकीय कामकाजावर परिणाम होत असला तरी दैनंदिन कामकाज सुरू आहे. नाशिक महापालिका आयुक्त (Nashik NMC) पदासाठी उच्चशिक्षित अधिकाऱ्याची नेमणूक करण्याची बाब महत्त्वाचे असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवकर या संदर्भात निर्णय घेतला असे भुसे यांनी सांगितले. तर आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi) व बकरी ईद (Bakri Eid) एकाच दिवशी येत असून राज्यातील सध्याचे दंगलीचे वातावरण लक्षात घेता हे दोन्ही सण शांततेत व उत्साहात व साजरे व्हावेत, यासाठी पोलीस आयुक्त व पोलीस अधीक्षकांची आपली चर्चा झाली असून योग्य तो बंदोबस्त तसेच सौहार्दाचे वातावरण टिकून राहण्यासाठी प्रयत्न करण्याचे सूचना दिल्याचे सांगितले.
निधी वाटपसंदर्भात कोण काय म्हणाले..
पालकमंत्री भुसे म्हणाले कि, जिल्हा नियोजन निधीचे यापूर्वी वाटप करताना काही तालुक्यांवर अन्याय करण्यात आला होता. त्यामुळे अशा तालुक्यांचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी झुकते माप दिले असले तरी ते गैर नाही. जिल्हा नियोजन समितीचा निधी हा जिल्ह्याच्या विकासासाठी असतो. त्यासाठी प्रत्येक तालुक्याला यापूर्वी निधी देण्यात आला असून त्याचे सर्व रेकॉर्ड उपलब्ध असल्याचे सांगून राष्ट्रवादीचे आमदार आपल्या विरोधात अजिबात नसल्याचं दादा भुसे म्हणाले. निधी वाटपसंदर्भात भुजबळ म्हणाले की, 100 रुपयांची सोय असेल, तर 150 रुपयांचे प्रपोझल तयार करायला सांगतो. काही प्रकरण बाद होतात, पण शंभर ऐवजी एक हजार रुपये मंजूर केले. कुणाही आमदाराला एक पैसा मिळणार नाही. नवीन कुठले काम होणार नाही. चौकशी झाले पाहिजे.. आम्ही यावर कोर्टात जाऊ, असा इशारा छगन भुजबळ यांनी दिला आहे.