Nashik Accident : अवैध वाहतुक जीवावर बेतली! पेठवरून प्रवाशांना घेऊन निघालेली क्रुझर दरीत कोसळली!
Nashik Accident : पेठ (Peth) तालुक्यातील चिखली येथील प्रवासी वाहतूक करणारी जीप दरीत कोसळल्याने दोन जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
Nashik Accident : काही दिवसांपूर्वी नाशिकच्या (Nashik) गिरणारे परिसरात (Giranare) मजुरांच्या होत असलेल्या अवैध वाहतुकीसंदर्भात माझाने बातमी समोर आणली होती. मात्र अवैध वाहतुकीत जीवाला धोका असतानाही नाशिकच्या ग्रामीण भागात आजही मोठया प्रमाणावर अवैध वाहतूक होत असल्याचे चित्र आहे. हीच अवैध वाहतूक आज दोन मजुरांच्या जीवावर बेतली आहे. पेठ (Peth) तालुक्यातील चिखली येथील प्रवासी वाहतूक करणारी जीप दरीत कोसळल्याने दोन जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यातील पळशी व चिखली रस्त्यावरील घाटात हा भीषण अपघात (Major Accident) झाला. मजुरांनी तुडुंब भरलेली ही क्रुझर या रस्त्यावरून जात असताना अवघड वळणावर ब्रेक फेल झाल्याने लगतच्या दरीत कोसळली. या अपघातात दोन जण ठार तर 25 प्रवासी जखमी झाले आहेत. तर दोन जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.
दरम्यान पेठ तालुक्यातील पळशी येथील कृष्णा गाडर यांच्या मालकीची क्रुझर ही पेठ - पळशी - चिखली या रस्त्यावर खाजगी प्रवासी वाहतुक करत होती. सदरचे वाहन पेठ येथे बाजार व दिवाळी सणानिमीत्त होणाऱ्या खरेदी निमित्ताने पेठ येथे आलेले प्रवाशी घेऊन परतीला गावाकडे जात असताना पळशी - चिखली रस्यावरील तिव्र वळणावर ब्रेक फेल झाल्याने गाडी लगतच्या दरीत कोसळली. वाहनातून प्रवास करणारे धनराज लक्ष्मण पाडवी व रामदास गायकवाडहे मयत झाले असून 25 प्रवाशी जखमी झाले आहे. जखमींना उपचारासाठी पेठच्या ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले असून गंभीर जखमींना नाशिक येथे हलविण्यात आले आहे. सोमवारी सायंकाळी ही घटना घडली अपघातात धनराज लक्ष्मण पाडवी व रामदास गायकवाड यांचा मृत्यू झाला आहे. हरीश काशिनाथ ठेपणे यांच्या फिर्यादीवरून पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पेठ येथून प्रवासी घेऊन जात असलेल्या जीपचे ब्रेक नादुरुस्त झाल्यामुळे जीप दरीत उलटली. या अपघातामध्ये चालक पुंडलिक कृष्णा गाडर यांच्यासह देविदास गाडर, मुरलीधर दोडके, लक्ष्मण पाडवी, गोकुळ झांजर, लक्ष्मण तुंबडे, वसंत चौधरी, रेखा करवंदे, मोहन जांजर, वामन गायकवाड, मयूर भवर लक्ष्मीबाई पवार, जिजा गाडर, साळीबाई इजल, मनी मानभाव, वृषाली तुंबडे, अंजनी भुसारे, कमळीबाई ठेपणे, जयराम गाडर, येवाजी भवर, हरी ठेपणे हे सर्व जखमी झाले असून ते चिखली येथील राहणार होते. तर पवना ब्राह्मणे व कुसुम ब्राह्मणे, शिवराम दरोडे, मोतीराम भोये हे देखील जखमी झाले आहेत.
अवैध वाहतूक नित्याची
नाशिक जिल्ह्यातील पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर आदी तालुक्यात खासगी वाहतूक मोठ्या प्रमाणावर होते. रोजंदारीसाठी या तालुक्यातील मजूर हे बाहेरगावी येत असतात. त्यामुळे अनेकदा या प्रवासासाठी जीप वाहनाचा वाहतुकीसाठी वापर केला जातो. यामध्ये जवळपास चाळीसहून अधिक प्रवासी बसविले जातात. विशेष म्हणजे अनेक वाहने ही मुदतीबाह्य असतानदेखील रस्त्यावर चालवली जातात. यातूनच पुढे अपघाताला सामोरे जावे लागते. अशा अवैध प्रवासी वाहतुकीने कहर केला असून या सगळ्यांवर पोलिसांचा देखील वचक नसल्याचे दिसुन येते. जणूकाही वाहतूक पोलिसांकडून खासगी वाहतूकदारांना कोणताही धोका कधीच होऊ शकणार नाही. त्यामुळे प्रमाणापेक्षा अधिक, काहीवेळा तर थेट वाहनाला मागे लटकून किंवा वर टपावर बसवून प्रवाशांची वाहतूक होताना दिसते.