महाराष्ट्र सदन प्रकरणी इतरांप्रमाणे मलाही दोषमुक्त करा : दीपक देशपांडे
महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी राज्याचे माजी माहिती आयुक्त तसेच तत्कालीन सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव दीपक देशपांडेंच्या घरावर लाच लुचपत विभागाने धाड टाकून कोट्यवधींची संपत्ती जप्त केली होती.
मुंबई : महाराष्ट्र सदन घोटाळ्यातून इतर आरोपींप्रमाणे दोषमुक्त करण्यात यावं, यामागणीसाठी राज्याचे माजी माहिती आयुक्त दीपक देशपांडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. हायकोर्टानं त्यावर 1 फेब्रुवारी रोजी सुनावणी निश्चित केली असून तोपर्यंत खटल्याला गैरहजर राहण्यास त्यांना दिलेली मुभा कायम ठेवली आहे.
महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी राज्याचे माजी माहिती आयुक्त तसेच तत्कालीन सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव दीपक देशपांडेंच्या घरावर लाच लुचपत विभागाने धाड टाकून कोट्यवधींची संपत्ती जप्त केली होती. तसेच त्यांच्यावर भारतीय दंड संहिता 406, 420, 465, 468 आणि 471 या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपपत्र दाखल केलं असून याप्रकरणातून दोषमुक्त करण्यात यावं, म्हणून दीपक देशपांडे यांनी मुंबई सत्र न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, कनिष्ठ न्यायालयानं त्यांचा अर्ज फेटाळून लावल्यानंतर देशपांडे यांनी त्या निर्णयाविरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. त्यावर बुधवारी न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे यांच्यासमोर प्राथमिक सुनावणी पार पडली.
तेव्हा, या याचिकेवरील सुनावणी पूर्ण होईपर्यंत सत्र न्यायालयातील प्रलंबित खटल्यावरील पुढील कार्यवाहीवर स्थगिती देण्याची मागणी देशपांडे यांच्यावतीनं करण्यात आली आहे. आपल्याविरोधात कट रचणे, खोट्या सह्या करणे, फसवणूक करणे इत्यादी बिनबुडाचे आरोप लावण्यात आले आहेत. मात्र, त्याबाबत कोणतेही ठोस पुरावा सादर करण्यात आला नसल्याचा दावाही देशपांडे यांच्यावतीने या याचिकेतून करण्यात आला आहे. त्यांची बाजू ऐकून घेत ही याचिका सुनावणीसाठी दाखल करून घेत न्यायालयाने सुनावणी 1 फेब्रुवारी रोजी निश्चित केली आहे.
अंजली दमानियांकडून याप्रकरणी हस्तक्षेप अर्ज
दरम्यान, सामाजिक कार्यकर्त्या आणि मूळ तक्रारदार अंजली दमानिया यांनीही देशपांडे यांच्या याचिकेत हस्तक्षेप अर्ज दाखल केला आहे. राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ, त्यांचा मुलगा पंकज, पुतणे समीर आणि इतर पाच जणांना सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्त केलेल्या आदेशाला दमानिया यांनी मुंबई उच्च न्यायालयात नुकतच आव्हानं दिले आहे. त्या याचिकेसोबत देशपांडे यांच्याही याचिकेवर सुनावणी घेण्यात यावी, अशी मागणी दमानिया यांनी आपल्या अर्जातून केली आहे.
- Maharashtra Corona Update : राज्यात बुधवारी बाधित रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या अधिक
- Maharashtra Omicron Cases : बुधवारी राज्यात 214 ओमायक्रॉनच्या रुग्णांची नोंद,
- Rohit Patil Exclusive : सेनापती नसताना मावळ्यांनी गड राखला हे दाखवून दिलं; पाहा काय म्हणाले रोहित पाटील
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha