Maharashtra News Updates 20 February 2023 : एमपीएससीच्या विरोधात पुण्यात विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 20 Feb 2023 10:45 PM
Pune MPSC: एमपीएससीच्या विरोधात पुण्यात विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने अद्याप मुख्य परीक्षेच्या स्वरुपाविषयी अंतिम निर्णय घेतला नसल्याने पुण्यात एमपीएससीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केलं आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी आदेश देऊनही एमपीएससीने अद्याप निर्णय घेतला नसल्याचं या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. एमपीएससीने मुख्य परीक्षेच्या स्वरुपात केलेला बदल हा 2025 पासून लागू केला जाईल असं आश्वासन राज्य सरकारने दिलं होतं. 

लष्कराच्या जीपला ट्रकने ठोकरले

बेळगावातील आंबेडकर रोडवर सदैव वाहनांची वर्दळ असते. दुपारच्या वेळी उसाची वाहतूक करणाऱ्या ट्रकने लष्कराच्या जिपला ठोकरले.ट्रकने ठोकरल्याने जीप रस्त्यात फिरून ट्रक समोर थांबली.अपघातामुळे रस्त्यावर वाहतुकीची कोंडी झाली होती.जीपला ठोकरल्या नंतर ट्रक चालकाने ट्रक तेथेच सोडून पलायन केले.अपघाताचे वृत्त कळताच लष्कराचे अधिकारी देखील घटनास्थळी दाखल झाले.वाहतूक पोलिसांनी देखील अपघात झालेल्या ठिकाणी येऊन पंचनामा करून वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.

नागपुरात भर रस्त्यात नऊ लाख रुपयांची लूट

नागपुरातील लकडगंज पोलीस स्टेशन अंतर्गत छापूनगर चौकावरील ॲक्सिस बँकेतून आज दुपारी तीन वाजताच्या सुमारास एका खाजगी कंपनीचा कर्मचारी 9 लाख रुपये विड्रॉल करून आपल्या कंपनीच्या कार्यालयाकडे जात होता... त्याच वेळी पाठीमागून दुचाकी वर आलेल्या दोन लुटारूंनी नऊ लाख रुपये भरलेली बॅग हिसकावून नेली... पल्सरवर आलेले दोन्ही लुटारू घटनेनंतर लगेच फरार झाले.. दोघे लूट करून पळून जाताना शहरातील अनेक मुख्य रस्त्यांवतील सीसीटीव्ही मध्ये चित्रित झाले आहेत.. त्या आधारे पोलीस दोघांचा शोध घेत असून अद्याप कोणालाही ताब्यात घेण्यात आलेले नाही...

बारामतीत माळरानावर आग लागली

बारामतीत तालुक्यातील एमआयडीसी शेजारी असणाऱ्या गाडीखेल येथे माळरानावर आग लागली आहे. वन विभागाच्या हद्दीत देखील आग लागली होती ती विझवण्यात आल्याचे वन विभागच्या अधिकाऱ्यांचे म्हणने आहे.. तर वन विभागाच्या हद्दीत ही आग लागून खाजगी क्षेत्रात आल्याने ग्रामस्थांना नुकसान होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. माळरानावरील आग ही 2 किलोमीटर पर्यंत पसरली असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही.  ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाची गरज असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. बारामती नगर परिषदेची अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी रवाना झाली आहे.

गडचिरोली पोलिसांकडून दोन जहाल नक्षलवाद्यांना हैदराबाद येथून अटक

 2006 पासून फरार असलेल्या दोन जहाल नक्षलवाद्यास गडचिरोली पोलिसांनी हैदराबाद येथून सोमवारी अटक केली. अटक करण्यात आलेल्या दोन नक्षलवाद्यांमध्ये एक महिला आणि एका पुरुषांचा समावेश आहे. दोघांवरही शासनाने दहा लाखांचे बक्षीस ठेवले होते. टुगे उर्फ मधुकर चिन्हना कोडापे (42) जि. गडचिरोली आणि श्यामला उर्फ जामणी मंगलु पूनम (35) छत्तीसगड असे अटक करण्यात आलेल्या  नक्षलवाद्यांचे नाव आहे. मधुकर हा 2002 मध्ये अहेरी नक्षल दलम मध्ये सहभागी झाला. जीमलगट्टा, अहेरी, सिरोंचा दलम मध्ये कमांडर पदावर कार्यरत राहून तो फरार होता. त्याच्यावर आठ चकमकी, दोन दरोडा, चार जाळपोळ, एक खून असे 25 गुन्हे दाखल होते. त्याच्यावर शासनाने आठ लाख रुपये बक्षीस जाहीर केले होते. तर जामणी ही अहेरी दलम मध्ये सदस्य पदावर कार्यरत होती. तिच्यावर आज पर्यंत एकूण पाच चकमकी, एक जाडपोळ, एक दरोडा असे नऊ गुन्हे दाखल आहेत. तिच्यावर शासनाने दोन लाख रुपये बक्षीस जाहीर केले होते. गेल्या वर्षभरापासून गडचिरोली पोलीस या दोघांवर पळत ठेवून होते. दोघेही आपली ओळख लपवून हैदराबाद येथे राहत होते. याबाबत गडचिरोली पोलिसांना गुप्त माहिती मिळताच आज सोमवारी दोघांनाही हैदराबाद येथून अटक केली.

पक्षाची चोरी झाली हे कधी ऐकलं होतं का? - जयंत पाटील

आजवर अनेक चोरा झाल्या, पण पक्षाची चोरी झाली हे कधी ऐकलं होतं का? अख्खा पक्षच चोरला, असे जयंत पाटील म्हणाले. शिवसेना आणि धनुष्यबाण हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना दिला. हे सामान्य जनतेला पटणार नाही. हा मुद्दा मतदारांना जाऊन सांगा, असेही ते म्हणाले. 

अंबरनाथ ITI मध्ये विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

अंबरनाथमध्ये एका विद्यार्थ्याने ITI वर्कशॉपमध्ये आत्महत्येचा प्रयत्न केलाय. मुंग्या मारायची पावडर खात या विद्यार्थ्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. अंबरनाथ आयटीआयमध्ये हा १७ वर्षीय विद्यार्थी शिकत असून आज सकाळी तो वर्कशॉपमध्ये गेला. तिथे त्याने मुंग्या मारायची पावडर खात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही बाब इतर विद्यार्थ्यांच्या लक्षात येताच त्यांनी या विद्यार्थ्याला तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल केलं. तिथे डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार सुरू करत त्याची प्रकृती स्थिर केली. त्याची प्रकृती सध्या धोक्याबाहेर असल्याची माहिती शासकीय मध्यवर्ती रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत उबाळे यांनी दिली आहे.

माझा विनायक मेटे करण्याचा डाव - अशोक चव्हाण यांचा खळबळजनक दावा

माझ्या लेटर पॅडचा दुरुपयोग होत असून माझ्यावर पाळत ठेवल्या जातेय. माझा विनायक मेटे करण्याचा काही लोकांचा डाव असल्याचा गंभीर दावा अशोक चव्हाण यांनी केलाय. आज सांयकाळी नांदेड जिल्ह्यातील कारेगांव इथे चव्हाण यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. या सत्कार सोहळ्यात उत्तर देताना चव्हाण यांनी आपला घातपात घडवण्याची भीती पुन्हा एकदा व्यक्त केलीय. या पूर्वी आज दुपारीच अशोक चव्हाण यांनी नांदेडमध्ये पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन याच स्वरूपाची तक्रार केली होती. 

कोरोना काळात सरकार पाडण्यासाठी कट रचले - भास्कर जाधव

भाजपच्या नेत्यांनी कोरोनाच्या काळात सरकार पाडण्यासाठी कट रचले. उद्धव ठाकरे जगतील का नाही अशी परिस्थिती होती. ऐंशी तास त्यांच्या शरीरावर माशी बसली का नाही, हे ही कळत नव्हती. अशी बिकट अवस्था त्यांची होती. त्यातून ते कसेबसे बचावले, मात्र ते सावरुच नये यासाठी गद्दारी करण्यात आली. आता मूळ शिवसेना पक्ष संपविण्याचं काम सुरुये. ज्या पक्षाला कायदेशीर मान्यता नाही, अशांना शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह देऊन लोकशाहीचा गळा घोटण्यात आला. त्यामुळं ज्यांना वाटतंय डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेने देश चालावा त्यांनी विचार करायला हवं. या पोटनिवडणुकीत मतदान करताना तुम्ही विचार करा, असे भास्कर जाधव म्हणाले.

बुलढाणा : दहावी, बारावीच्या परीक्षा केंद्राजवळ जमावबंदी आदेश

दहावी, बारावीच्या परीक्षा सुयोग्य वातावरणात पार पाडण्यासाठी विविध उपायोजना करण्यात येत आहे. परीक्षेतील गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी कॉपीमुक्त अभियान राबविण्यासोबतच आता बुलढाणा जिल्हाधिकारी यांनी परीक्षा केंद्राच्या परिसरात जमावबंदी आदेश लागू केला आहे. यासाठी फौजदारी प्रक्रीया संहीता 1973 चे कलम 144 लागू करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड यांनी जिल्ह्यातील परिक्षेदरम्यान होणारे गैरव्यवहार टाळण्यासाठी सर्व परीक्षा केंद्राच्या परिसरामध्ये परीक्षा कालावधीत परिक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरात संगणक सेंटर, झेरॉक्स सेंटर, मोबाईल सेंटर परीक्षा सुरू होण्यापूर्वी एक तास आधीपासून परीक्षा संपेपर्यंत बंद ठेवण्यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 लागू केले आहे.

अपर पोलिस महासंचालक ब्रिजेश सिंह यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रधान सचिव म्हणून नियुक्ती

अपर पोलिस महासंचालक ब्रिजेश सिंह यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रधान सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पहिल्यांदाच पोलिस अधिकारी हे मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव म्हणून नियुक्त होत आहेत. फडणवीस सरकारच्या काळात ब्रिजेश सिंह हे माहिती आणि जनसंपर्क विभागाचे महासंचालक होते. 

कसब्यातील जनता भाजपला  धडा शिकवेल : जयंत पाटील

भाजपच्या हातून निवडणूक गेली आहे, त्यामुळे उपमुख्यमंत्री रोज इकडे आहेत. भाजपला  कसब्यातील जनता धडा शिकवेल. उद्धव ठाकरे जिकडे आहेत तिकडे जनता जाईल. पक्ष नाव चिन्ह यापेक्षा त्यांच काम मोठं आहे.  सुप्रीम कोर्टात आयोगा बाबात अंतिम निर्णय होणे बाकी आहे. शिवसेना पक्ष बाळासाहेब यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवला होता. परंतु, तो तिसऱ्याने चोरून नेला आहे, असा टोला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कसब्यात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला. 


 शिवनेरी किल्यावर शिवभक्तांना बंदी घालण्यात आली. सत्ताधाऱ्यांना लोकांची गरज नाही. त्यामुळे शिवनेरीवर सर्वांना प्रवेश हवा. वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीला पाठिबा न देता शिवसेनेला पाठींबा दिला. तो त्याचा स्वतंत्र पक्ष ते स्वतंत्र निर्णय घेऊ शकतात. महाराष्ट्रात 48 जागा जिंकण्याची गरज भाजपला का निर्माण झाली आहे?  देशात भाजपची संख्या कमी झाल्याने महाराष्ट्र 48 जागा मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. परंतु, महाविकास आघाडीतील तीन पक्ष एकत्रित आल्यास भाजप ला केवळ  13 ते 14 जागा मिळतील, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे. 

पुण्यातील लवळे येथील एका कंपनीला भीषण आग

पुण्यातील लवळे येथील एका कंपनीला भीषण आग लागील आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या अद्याप घटनास्थळी पोहोचल्या नसून ही आग कशामुळे लागली याची माहिती अद्याप समोर आली नाही. 

दारुच्या नशेत इमारतीच्या चौथ्या मजल्यावरुन पडून एका 35 वर्षीय इसमाचा मृत्यू, रायगडच्या महाड तालुक्यातील बिरवाडी-काळीज इथली घटना
Raigad News : दारुच्या नशेत इमारतीच्या चौथ्या मजल्यावरुन पडून एका 35 वर्षीय इसमाचा मृत्यू झाल्याची घटना रायगड जिल्ह्याच्या महाड तालुक्यातील बिरवाडी-काळीज इथे घडली. आज सकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडली. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार काळीज येथील साई स्वरुप कॉम्प्लेक्स इथे भाड्याने राहणाऱ्या राजेश अफसरसिंग यादव याचा दारुच्या नशेमध्ये चौथ्या मजल्यावरुन तोल गेला आणि तो खाली कोसळला. यामध्ये राजेश याचा जागीच मृत्यू झाला. त्याचा मृतदेह प्राथमिक आरोग्य केंद्र बिरवाडी येथे शवविच्छेदनाकरिता पाठवण्यात आला आहे. एमआयडीसी पोलिसांनी आकस्मित मृत्युची नोंद केली आहे. या संपूर्ण घटनेचा अधिक तपास महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मारुती आंधळे आणि पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर येडवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक विजय काळंगिरे हे करत आहेत.
Shinde Vs Thackeray : धनुष्यबाणाच्या निकालानंतर आता कोर्टातल्या लढाईचं काय होणार?

Thackeray Vs Shinde : सुप्रीम कोर्टात (Supreme Court) उद्यापासून (21 फेब्रुवारी) पुन्हा शिंदे विरुद्ध ठाकरे लढाई सुरु होणार आहे. तशी लढाई तर आधीपासूनच सुरु होती. पण आता धनुष्यबाण शिंदेंना देत खरी शिवसेना (Shiv Sena) ही शिंदेंची शिवसेना हे केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission) मान्य केल्यानंतर या संघर्षाचा दुसरा टप्पा सुरु होत आहे. निवडणूक आयोगाच्या निकालाचे नेमके काय परिणाम कोर्टात होतात, कोर्ट त्यावर काय म्हणतं हे पाहणं महत्त्वाचं असेल. 


Uddhav Thackeray PC : निवडणूक आयोग बरखास्त करण्याची मागणी, शिंदेंवर आसूड, भाजपचा समाचार; उद्धव ठाकरेंच्या भाषणातील 10 मुद्दे

Uddhav Thackeray Speech Today: उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत निवडणूक आयोग, भाजप आणि शिंदे गटावर हल्ला केला आहे. उद्धव ठाकरेंच्या भाषणातील  दहा महत्वाचे मुद्दे. अधिक माहितीसाठी वाचा सविस्तर...

CM Eknath Shinde On Sanjay Raut : संजय राऊत यांचं आक्षेपार्ह वक्तव्य, मुख्यमंत्र्यांचं प्रत्युत्तर, म्हणाले...

CM Eknath Shinde On Sanjay Raut : संजय राऊत यांनी केलेल्या आक्षेपार्ह टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. "खालच्या भाषेत टीका करणाऱ्यांना टीका करु दे, ते जेवढी टीका करत राहतील, तेवढं कामाने उत्तर देईन," असं मुख्यमंत्री म्हणाले.  अधिक माहितीसाठी वाचा सविस्तर...

Maharashtra Nagpur Accident : नागपुरात कारनं माय-लेकाला चिरडलं; फरार कंत्राटदाराला वरोरा येथून अटक

Nagpur News : पोलिसांनी दीडशेहून अधिक सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. शोध घेतला असता कार रेवतीनगरमध्ये एका अपार्टमेंटजवळ झाकूण ठेवण्यात आल्याचे आढळले. अधिक माहितीसाठी वाचा सविस्तर...

Maharahtra Nashik Crime : सुक्या खजुराच्या नावाखाली अडीच कोटींच्या सुपारीची तस्करी; नाशिकच्या विमानतळाजवळ कारवाई

Nashik Crime : नागपूर सीमा शुल्क विभागाने नाशिकमध्ये धडक कारवाई केली आहे. दुबईमधून (Dubai) सुक्या खजुराच्या नावाखाली आयात केलेल्या 33 टन सुपारीची तस्करी नाशिक विमानतळाच्या (Nashik Airport) बाजूलाच असलेल्या जानोरी येथील ड्रायपोर्टवर नागपूर सीमा शुल्क विभागाच्या (Nagpur) पथकाने उघडकीस आणली आहे. तब्बल अडीच कोटी रुपयांची सुपारी असून बाजारात सुपारीची किंमत सहा कोटीहून अधिक असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. अधिक माहितीसाठी वाचा सविस्तर...

Maharashtra Politics Shiv Sena Bhavan: विधिमंडळातील कार्यालयासोबतच शिवसेना भवनावरही दावा; शिंदे गटातील आमदाराचं मोठं वक्तव्य

Maharashtra Politics: निवडणूक आयोगाने शिंदे गटालाच खरी शिवसेना असल्याचं म्हणत निर्णय दिला असून, त्यानंतर हा दावा करण्यात आला आहे. अधिक माहितीसाठी वाचा सविस्तर...

Nilam Gorhe: निलम गोऱ्हेंना मातृशोक, लतिकाताई दिवाकर गोऱ्हे यांचे पुण्यात निधन

Nilam Gorhe:  शिवसेना ( ठाकरे गट ) नेत्या नीलम गोऱ्हे यांच्या आई लतिकाताई दिवाकर गोर्हे यांचे पुण्यात निधन झाले आहे.  संध्याकाळी 5 वाजता नवी पेठ येथील वैकुंठ स्मशानभूमी येते त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे

कोकणच्या जगप्रसिद्ध हापुसला वातावरणाचा फटका, उष्माघाताचा फटका बसून आंब्यावर डाग उठल्याने आंबे खराब होऊन गळ

फळांचा राजा कोकणचा हापूस आंब्याला सततच्या बदलत्या वातावरणाचा फटका बसला आहे. कोकणात दिवसा तापमानात झालेल्या वाढीमुळे उष्माघाताचा फटका आंब्याला बसला असून बहुतांश ठिकाणी आंब्यावर डाग उठल्याने आंबे खराब होऊन गळू लागले आहेत. यामुळे जगप्रसिद्ध कोकणच्या हापूसचे पहिल्या टप्प्यातील पीक धोक्यात आले आहे. रात्री कमी होणारे तापमान आणि दिवसा अचानक वाढणारे तापमान याच्या तफावतीमुळे हा परिणाम आंब्यावर होत असून सन बर्न झालेले हे आंबे बागायतदारांना फेकून देण्याशिवाय पर्याय नाही. फळांच्या दक्षिण भागाला सन बर्न म्हणजे उष्ण तापमान सहन होत नसल्याने आंब्याची मोठी फळगळ होत आहे. कोकण किनारपट्टी भागातील आंबा बागायदारांना याचा सर्वाधिक फटका बसला होता. 

Sharad Pawar: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा उद्धव ठाकरे यांना फोन : सूत्र 

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा उद्धव ठाकरे यांना फोन- सूत्र 


पक्ष आणि चिन्ह गेल्याच्या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा


आगामी कायदेशीर लढाई बाबत चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती


महाविकास आघाडी उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असल्याचा दिला विश्वास

Sanjay Raut : नाशिक पाठोपाठ संजय राऊतांविरोधात ठाण्यातही गुन्हा दाखल

Sanjay Raut : संजय राऊत यांच्या विरोधात ठाण्यातील शिवसेना महिला आघाडी आक्रमक झाली असून त्यांच्या विरोधात संध्याकाळी आंदोलन केल्यानंतर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आलीय.


ठाण्यातील नगर पोलिस ठाण्यात संजय राऊत यांच्या विरोधात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आलाय..

शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळाल्यानंतर शिंदे गट विधानभवनातील शिवसेना कार्यालयावर आज दावा करणार

Mumbai News : शिंदे गटाला शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळाल्यानंतर आज विधानभवनातील कार्यालयावर दावा करणार आहे. याबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेऊन त्यांना पत्र दिलं जाणार आहे. यासाठी शिंदे गटाच्या आमदारांची आज मुंबईत बैठक होणार आहे. या बैठकीला शिंदे गटाचे आमदार उपस्थित राहणार आहेत. 

Mumbai News: मुंबईत उद्यापासून डबलडेकर एसी बस सीएसएमटी-एनसीपीए दरम्यान धावणार; तिकीट अवघे 6 रुपये

Mumbai News: मुंबईत मंगळवारपासून पर्यावरणपूरक, स्वस्त आणि गारेगार प्रवास घडवणारी पहिली डबलडेकर इलेक्ट्रिक एसी बस सीएसएमटी आणि एनसीपीएदरम्यान धावणार आहे. त्यासाठी प्रवाशांना पहिल्या पाच किलोमीटरसाठी 6 रुपये मोजावे लागणार आहेत. 


बेस्टच्या ताफ्यातील ही देशातील पहिली डबलडेकर एसी बस असून या महिन्याच्या अखेरीपर्यंत आणखी 5 डबलडेकर ताफ्यात सामील केल्या जाणार आहेत, अशी माहिती बेस्ट उपक्रमाचे व्यवस्थापनाकडून सांगण्यात आली आहे.

Kollhapur Breaking : ठाकरे गटाचे आणखी एक माजी आमदार एकनाथ शिंदे यांच्या गळाला

Kollhapur Breaking : ठाकरे गटाचे आणखी एक माजी आमदार एकनाथ शिंदे यांच्या गळाला


माजी आमदार चंद्रदीप नरके एकनाथ शिंदे यांच्या धनुष्यबाणासोबत


धनुष्यबाण घेऊनच आगामी विधानसभा निवडणुकीत उतरणार असल्याची घोषणा

खासदार संजय राऊत यांच्यां विरोधात नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Sanjay Raut : खासदार संजय राऊत यांच्यां विरोधात नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल


- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत अपशब्द वापरल्या प्रकरणी गुन्हा दाखल


- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सारख्या व्यक्तीच्या आणि मुख्यमंत्री पदाच्या लौकिकास बाधा आणून बदनामी केल्या प्रकरणी गुन्हा दाखल


- ठाकरे गटातून शिंदें गटात गेलेल्या शिवसैनिक योगेश बेलदार यांनी केला गुन्हा दाखल
- नशिकमध्ये ठाकरे आणि शिंदे गट यातील संघर्ष वाढला


- शिवसेना पक्ष चिन्ह आणि नाव शिंदे गटाला बहाल केल्यानंतर पहिला गुन्हा दाखल


- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उध्दव ठाकरेंवर केलेल्या टीकेला उत्तर देताना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यां विरोधात अपशब्द वापरल्याने गुन्हा दाखल

Maharashtra Politics: जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचे काम बंद करा; फ्रस्ट्रेशन मध्ये उद्धव ठाकरे असे बोलत असतील : चित्रा वाघ

Maharashtra Politics: भाजप महिला मोर्चाच्या वतीने  महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चा अध्यक्षा सौ चित्रा ताई वाघ यांच्या उपस्थितीत हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन भिवंडीतील सहयोग नगर  येथे करण्यात आले यामध्ये सैकडो महिला सहभागी झाल्या होत्या. जातीजाती मध्ये तेढ निर्माण करण्याचा काम बंद झाले पाहिजे तसेच चांगले काम करणाऱ्या सरकारला प्रोत्साहन देण्याचा काम केलं पाहिजे असे म्हणत उद्धव ठाकरेंवर टोला हाणला आहे . 


तर दुसरीकडे महाराष्ट्रात येण्यासाठी मोदींना बाळासाहेब ठाकरे यांच्या चेहरा लावावा लागतो यावर उत्तर देताना चित्रा वाघ यांनी सांगितले की उद्धव ठाकरे वैफल्यग्रस्त मनस्थितीतून किंवा त्यांना झालेल्या त्रासामुळे ते असे बोलत असतील बाळासाहेब ठाकरे यांनी उभी केलेली शिवसेना याच पानिपत कस झालं हे सर्वांनी पाहिलं आणि त्या फ्रस्ट्रेशन मध्ये उद्धव ठाकरे असे बोलत असतील . म्हणून फडणवीस नेहमी बोलतात फक्त जन्माने वारसा असून चालत नाही तो विचारांचा वारसा असावा लागतो जो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थपणे चालविताना दिसतात . अशी टीका चित्रा वाघ यांनी ठाकरेंवर केली आहे

 

अल्पवयीन मुलीवर होणारे बलात्कार आपण पाहतो आणि हे पाहून आपला  जीव जळतो तसेच या नराधमांना कोणतीही जात नसते  यासाठी यांना कठोर शिक्षा व्हावी यासाठी लवकरच मोदी सरकारच्या माध्यमातून 12 वर्षाखालील मुलीवर अत्याचार करणाऱ्या नाराधामला फाशीची शिक्षा होणार आहे व 16 वर्षीय खालील मुलीवर दुरव्यवहार करणाऱ्या ला 20 वर्ष तुरुंगात सोडवण्याचा काम मोदी सरकार लवकरच करणार आहे . 
Beed News: पुन्हा एकदा आमदार संदीप क्षीरसागर यांनी केला तुफान डान्स

Beed News: बीडचे राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शिवजयंती महोत्सवाला राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या आई सुनंदाताई पवार यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी आमदार संदीप क्षीरसागर यांच्याकडून सुनंदाताई पवार यांना तलवार भेट देऊन त्यांच स्वागत करण्यात आलं.


नवा महाराष्ट्र घडवण्यासाठी संस्कारात्मक पिढीची आवश्यकता

 

या शिवजयंतीच्या कार्यक्रमात तरुणांना मार्गदर्शन करताना सुनंदाताई पवार यांनी नवा महाराष्ट्र घडवण्यासाठी शिवाजी महाराजांचे विचार आणि संस्कारात्मक  पिढीची आवश्यकता आहे त्यामुळे आपण छत्रपती शिवाजी महाराज राजमाता जिजाऊ आणि संभाजी महाराज यांचे विचार आणि त्यांचं आपल्या राष्ट्राविषयी असलेलं प्रेम हे आचरणात आणलं पाहिजे.. तर दुसरीकडे या महाराष्ट्राला महिलांचा सन्मान करणारी पिढी देखील हवी आहे असं त्या म्हणाल्या आहेत..

 

शिवजयंतीच्या कार्यक्रमांमध्ये वेगवेगळ्या चित्तधारक कसरतीची प्रात्यक्षिक दाखवण्यात आली यावेळी शिवप्रेमींनी संदीप क्षीरसागर यांना आग्रह केल्यानंतर त्यांनी देखील हातात भगवा झेंडा घेऊन कार्यकर्त्यांमध्ये जाऊन तुफान डान्स केला. नेहमीच आपल्या डान्समुळे चर्चेत असलेले आमदार संदीप क्षीरसागर आज देखील शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आपल्या शैलीत तुफान डान्स करायला विसरले नाहीत. 

 
Akola Crime : अकोल्यात प्रेमी युगुलाने केलं विषप्राशन

Akola Crime : अकोला (Akola) जिल्ह्यातील सांगवी येथील प्रेमी युगूलाने (Couple) शनिवारच्या (18 फेब्रुवारी) रात्री विष (Poison) प्राशन केलं. दोघांनीही आधी विष प्राशन केल्यानंतर ते उरळ पोलीस स्टेशनमध्ये गेले. तेथे दोघेही अत्यवस्थ झाल्याने त्यांना पोलिसांनी रुग्णालयात दाखल केलं. मुलीच्या घरातून दोघांच्या प्रेमाला विरोध होता. यातील प्रियकर मुलगा अतुल वायधने हा सांगवी बुद्रुक गावातील होता. तर अल्पवयीन प्रेयसी सांगवी खुर्द गावातील आहे. यात प्रियकर अतुलचा रविवारी (19 फेब्रुवारी) उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर मुलीची प्रकृती गंभीर असून तिच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, पोलीस स्टेशनमधील पीएसआयच्या दबावामुळे भावाने आत्महत्या केल्याचा आरोप मृताच्या भावाने केला आहे.


पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


पुण्यातील कसबा पेठ (Pune bypoll election) आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या प्रचाराचा आजपासून धुरळा उडणार आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विरोधकांच्या सभा होणार आहेत. याबरोबरच निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात ठाकरे गट आज सुप्रिम कोर्टात याचिका दाखल करणार आहे. 


ठाकरे गट आज सुप्रिम कोर्टात याचिका दाखल करणार 


 निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात ठाकरे गट आज सुप्रिम कोर्टात याचिका दाखल करणार आहे. चिन्ह आणि पक्ष शिंदे गटाला दिल्यामुळं ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे. आज निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरोधात ठाकरे गटाच्या वतीनं सुप्रिम कोर्टात याचिका दाखल करण्यात येणार आहे. 


मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची आमदारांसोबत बैठक 


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व आमदारांची आज तातडीची बैठक बोलवली आहे. सकाळी 9.30 वाजता बाळासाहेब भवन येथे ही बैठक होणार आहे. या बैठकीत कार्यकरणी कधी बोलवायची ? आयोगाच्या निकालानंतर पुढची रणनिती काय असेल यावर चर्चा होणार आहे. 


हेमंत रासनेंच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यांची सभा


कसबा विधानसभा पोटनिवडणुकीचे भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह युतीच्या नेत्यांची एकत्रित सभा होणार आहे. संध्याकाळी 6 वाजता कसब्यात ही सभा होईल.


रविंद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी  अजित पवार आणि बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत रोड शो


कसबा विधानसभा पोटनिवडणुकीचे  कॉंग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी विरोधी पक्षनेते अजित पवार आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत रोड शो आणि बाईक रॅलीच आयोजन करण्यात आलंय. संध्याकाळी पाच वाजता बाईक रॅलीला सुरूवात होईल.. 


अकोला जिल्ह्यातील वाडेगाव येथे ओबीसी महासंघ आणि वंचित बहूजन आघाडीची 'ऐतिहासिक परिषद'


आज अकोला जिल्ह्यातील वाडेगाव येथे ओबीसी महासंघ आणि वंचित बहूजन आघाडीची 'ऐतिहासिक परिषद' होणार आहे. सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत ही परिषद होणार आहे.  वंचित बहूजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर या परिषदेला संबोधित करणार आहेत. अकोल्यासह बाजूच्या वाशिम आणि बुलडाणा जिल्ह्यातून किमान 30 ते 35 हजार लोकांचं नियोजन वंचितनं यासाठी केल आहे.  


जेजुरीच्या खंडेरायाची यात्रा


अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडेरायाची आज सोमवती यात्रा आहे. सोमवती यात्रेनिमित्त सकाळी पालखीतून खंडेरायाला 7 वाजता कऱ्हा नदीवर कऱ्हा स्नानासाठी नेण्यात येईल. सकाळी 11 वाजताच्या दरम्यान काऱ्हा स्नान होईल. या सोहळ्यासाठी हजारो भाविक जेजुरीत दाखल होत असतात. 


पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन


 आज सकाळी 10 वाजता बालगंधर्व चौक येथे एमपीएससी निर्णयाची अंमलबजावणी व्हावी या मागणीसाठी आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे उपस्थिती राहणार आहेत. 
 
नाना काटे यांच्या प्रचारासाठी सभा


चिंचवडचे महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव, माजी मंत्री धनंजय मुंडे यांची सायंकाळी 5 वाजता एकत्रित सभा होणार आहे.  


सांगलीत सहकारमहर्षी गुलाबराव पाटील जन्मशताब्दी सांगता सोहळा


सांगलीत सहकारमहर्षी गुलाबराव पाटील जन्मशताब्दी सांगता सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, एच. के. पाटील उपस्थित राहणार आहेत. तरुण भारत स्टेडियमवर सकाळी 10 वाजता हा कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमाला महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती  नीलमताई गोऱ्हे, सांगलीचे पालकमंत्री सुरेश खाडे, राज्य उत्पादन शुल्कमंत्री शंभूराजे देसाई, खासदार श्रीनिवास पाटील, खासदार रजनीताई पाटील, खासदार संजयकाका पाटील, माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ उपस्थित रहाणार आहेत. 


अंबादास दानवे आज नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर  


विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आज नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. ईगतपुरीतील जिंदाल पॉलिमर कंपनीतील आग दुर्घटना स्थळाची दुपारी तीन वाजता पाहणी करणार आहेत. तसेच स्थानिकांना रोजगार मिळावा यासाठी जिंदाल कंपनीच्या व्यवस्थापनाशी चर्चा करणार आहेत.  


प्रकाश आंबेडकर यांची पत्रकार परिषद


वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांची सकाळी 11 वाजता अकोला येथे महत्वाच्या विषयावर पत्रकार परिषद
 
एकनाख खडसे यांच्याविरोधात सुरू असलेल्या खटल्यावर  सुनावणी
 
भोसरी जमीन घोटळा प्रकरणी एकनाख खडसे यांच्याविरोधात सुरू असलेल्या खटल्यावर सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. तपासयंत्रणा खटल्यात जाणूनबुजून विलंब करत असल्याचा खडसेंच्या वकीलानं कोर्टात दावा केलाय. तर राजकीय हेतूने आपल्याविरोधात कारवाई केली जात असल्याचा खडसेंनी याचिकेतून आरोप केलाय. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.