ठाणे : बाल लैंगिक अत्याचारप्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे (Akshay shinde) याच विधानसभा निवडणुकांपूर्वी एन्काऊंटर करण्यात झाल्याची घटना घडली होती. या घटनेसाठी न्यायालयीन समितीचा अहवाल आज मुंबई उच्च न्यायालयात सादर करण्यात आला. त्यामध्ये, 5 पोलिसांवर ठपता ठेवत हा एन्काऊंटर बनावट असल्याचं म्हटलं. त्यामुळे, पुन्हा एकदा अक्षय शिंदे प्रकरण चर्चेत आलं आहे. त्यातच, न्यायालयाच्या (Court) अहवालावर अक्षयच्या आई-वडिलांनी समाधान व्यक्त करत, आमचा मुलगा निर्दोष होता, असे म्हटलं आहे. दरम्यान, अक्षयच्या घरी भेट दिली असता जना स्मॉल फायनान्स कंपनीकडून घेतलेल्या कर्जाचे हप्ते वेळेत चुकवले नसल्याने फायनान्स कंपनीने मृत आरोपी अक्षय शिंदेच्या घराच्या दाराला नोटीस चिटकवल्याचं पाहायला मिळालं. एन्काऊंटरमध्ये मयत झालेला आरोपी अक्षय शिंदे याच्या आई-वडिलांनी जना स्मॉल फायनान्स या कंपनीकडून 2 लाख 49 हजार 999 रुपये कर्ज घराच्या दुरुस्तीसाठी घेतले होते. त्या कर्जाचे हप्ते वेळेत भरले नसल्याने फायनास कंपनीकडून घराच्या दाराला नोटीस चिटकवण्यात आली आहे.
बदलापूर शाळेतील बाल लैंगिक अत्याचार प्रकरणामधील आरोपी अक्षय शिंदे यांच्या घराला जना स्मॉल या फायनान्स कंपनीने नोटीस लावली आहे. अक्षय शिंदे याचे वडील अण्णा मारुती शिंदे आणि अलका अण्णा शिंदे या दोघांनी मिळून जना स्मॉल फायनान्स कंपनीकडून दोन लाख 49 हजार 999 रुपये घरबांधणीसाठी कर्ज घेतले होते. या घेतलेल्या कर्जाचा हप्ता महिन्याला 6,134 रुपये असा होता आणि तो एकूण 72 महिन्यांसाठी परतफेड असल्याने अण्णा शिंदे यांनी या हप्त्यांची परतफेड न केल्यामुळे फायनान्स कंपनीने डिसेंबर 2024 मध्येच घराला नोटीस लावल्याचे समोर आले आहे. बदलापूरमधील एका नामांकित शाळेमध्ये झालेल्या अत्याचाराच्या घटनेमध्ये आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काऊंटर झाल्यानंतर अक्षय त्याचे आई-वडील हे राहाते घर सोडून कल्याण परिसरामध्ये उदरनिर्वाह करत आहेत.
दरम्यान, बदलापूरमधील घडलेल्या घटनेमुळे अक्षयच्या आई-वडिलांच्या हाताला कुठलेही काम मिळत नसल्याने ते हतबल झाले असून कल्याण परिसरामध्ये भीक मागून खात असल्याची प्रतिक्रिया एबीपी माझाच्या प्रतिनिधीला बोलताना अक्षयच्या आईने दिली. अक्षयचे आई-वडील हे बदलापूरच्या घरात राहत नाहीत, त्यांच्या हाताला रोजगार नाही त्यामुळे या फायनान्स कंपनीचे हप्ते त्यांनी भरले नाहीत. मात्र, आज उच्च न्यायालयामध्ये अक्षय शिंदे एन्काऊंटर झालेल्या अहवालाचे वाचन झाले. या वाचनानंतर घराला नोटीस लावण्याचे प्रकरण समोर आले आहे. फायनान्स कंपनीने घराला चिकटवलेल्या नोटीससध्ये कर्जाची रक्कम पतरफेड न केल्याचेही म्हटले आहे. मात्र, मुलावरील गंभीर आरोपीनंतर स्वत:च्या जगण्याची भ्रांत झालेल्या शिंदे कुटुंबीयांना कर्जाचे हफ्त फेडण्यासाठी पैसे कुठून येणार, ते हफ्ते फेडून घराचा ताबा घेतील का, असे अनेक प्रश्न सध्या अनुत्तरीत आहेत.