कोविडमुळे पतीचा मृत्यू, धक्का सहन न झाल्याने पत्नीने चिमुकल्यासह आयुष्य संपवलं; नांदेडमधील हृदयद्रावक घटना
कोरोनामुळे पतीचा मृत्यू झाल्याचे कळताच पत्नीने चिमुकल्यासह तळ्यात उडी घेऊन आयुष्य संपवल्याची हृदयद्रावक घटना नांदेडच्या लोहा शहरात घडली आहे. गंदम दाम्पत्याच्या मृत्यूने त्यांच्या दोन मुली मात्र अनाथ झाल्या आहेत.
नांदेड : राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. कोविडमुळे पतीचा मृत्यू झाल्याचे कळताच पत्नीने आपल्या दोन मुलींना घरी ठेऊन तीन वर्षीय चिमुकल्यासह तलावात उडी घेऊन आत्महत्या केली. नांदेड जिल्ह्याच्या लोहा शहरात घडलेल्या या हृदयद्रावक घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
मूळचे आंध्रप्रदेश इथले रहिवासी असणारे शंकर गंदम हे गेल्या अनेक वर्षांपासून व्यवसायानिमित्त लोहा शहरातील बालाजी मंदिर परिसरात पत्नी, दोन मुली आणि मुलगा यांच्यासह वास्तव्यास होते. शंकर गंदम हे कोरोनाच्या अँटिजेन तपासणीसाठी लोहा ग्रामीण रुग्णालयात गेले होते. त्यात त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर त्यांना लोहा येथील रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं. परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच त्यांच्या पत्नी पद्मा गंदम यांना मोठा धक्का बसला. पतीच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने पद्मा गंदम यांनी आपल्या तीन वर्षांच्या मुलासह तलावात उडी मारुन आयुष्य संपवलं. परंतु गंदम दाम्पत्याच्या या मृत्यूने त्यांच्या दोन मुली मात्र अनाथ झाल्या आहेत.