संतापजनक! खाऊसाठी 5 रुपये मागितल्यानं पित्याने चिमुरडीला दारावर आपटून मारले, गोंदियातील घटना
काळीज पिळवटून टाकणारी धक्कादायक घटना गोंदियात घडली आहे. 5 रुपयांसाठी रागाच्या भरात बापाने पोटच्या चिमुकलीची दारावर आपटून हत्या केली आहे. या प्रकरणी आरोपी पित्याला तिरोडा पोलिसांनी अटक केली आहे.
गोंदिया : जन्मदात्यासाठी पोटची मुलगी जीव की प्राण असते. मुलगी चालताना साधी जमिनीवर पडली तरी बापाचा जीव कासावीस होतो. बाप आणि मुलीच्या पवित्र नात्याबद्दल जास्त काही सांगायला नको. मात्र या नात्याला काळिमा फासणारी संतापजनक घटना गोंदियात घडली आहे. ते ही केवळ पाच रुपयांसाठी. तिरोडा तालुक्यातील लोणारा गावात एका पित्याने खाऊसाठी पाच रुपये न दिल्याने रडणाऱ्या मुलीला दारावर आपटून जीवे मारले. विवेक उईके (28) असं या नराधम बापाचं नाव आहे. तर वैष्णवी विवेक उईके असं त्या दुर्देवी चिमुरडीचं नाव आहे. ती केवळ वीस महिन्यांची होती. विवेकला तिरोडा पोलिसांनी अटक केलं आहे.
या प्रकरणात मृत मुलीची आई वर्षा विवेक उईके (22) रा. लोणारा ता. तिरोडा यांनी तिरोडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. माहितीनुसार वर्षा व आरोपी विवेक यांचे लग्न 2018 मध्ये झाले होते. लग्नाला 3 वर्षांचा कालावधी होत आहे. मात्र, विवेक नेहमी दारू पिऊन तिला मारहाण करायचा. पतीचे दारू पिणे व मारहाण करणे या प्रकाराला कंटाळून वर्षा पतीसोबत केवळ 1 वर्ष राहिली व नंतर चिमुकल्या वैष्णवीसह ती आपले वडील घनश्याम कंगाले रा. खडकी, पालोरा, ता. मोहाडी, जि. भंडारा यांच्याकडे राहायला गेली.
एक दिवस पती विवेकने आपला मेहुणा राकेश घनश्याम कंगाले (वय 19) याला फोन करून पत्नी व मुलीला लोणारा येथे आणून देण्यास सांगितले. त्यावरून डिसेंबर 2020 मध्ये राकेशने आपली बहिण वर्षा व आपल्या भाचीला त्याने विवेककडे आणून दिले. तेव्हापासून मुलीसह ती पतीकडेच राहत होती. वर्षाची सासू ताराबाई विश्वनाथ उईके (वय 55), दीर शुभम विश्वनाथ उईके (वय 25) हे दोन्ही घराला लागूनच वेगळे राहतात. तर सासरे विश्वनाथ उइके (60) हे कामासाठी बाहेरगावी राहतात. वर्षा वनमजुरीचा व्यवसाय करून आपले व चिमुकल्या मुलीचा उदरनिर्वाह सांभाळत होती. 2 फेब्रुवारीच्या संध्याकाळी मुलगी रडत असल्याने आईने खावू घेवून देण्यासाठी विवेककडे 5 रुपये मागितले होते. यावेळी पैसे का मागते म्हणून विवेकने 20 महिन्याच्या मुलीला दारावर आपटले. यात चिमुरड्या वैष्णवीचा जीव गेला.