उपमुख्यमंत्री अजित पवार नितीन गडकरींच्या भेटीला, राजकीय चर्चांना उधाण
दिवसभराच्या कार्यक्रमात कुठेही नितीन गडकरी यांची भेट घेण्याचे नियोजित नसताना अजित पवार त्यांना भेटल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

नागपूर : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज नागपुरात अचानकच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. नागपुरात पोलीस भवनाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमानंतर अजित पवार नागपूर जिल्ह्यातील सावनेरला पोलीस स्टेशनच्या लोकार्पण कार्यक्रमासाठी गेले होते. तेथून नागपूरला परत आल्यानंतर अजित दादा दिलीप वळसे पाटील यांच्यासह थेट नितिन गडकरी यांच्या वर्धा रोडवरील घरी त्यांच्या भेटीला गेले. सुमारे अर्धा तास तिघांची भेट रंगली. विशेष म्हणजे यावेळी माजी मंत्री अनिल देशमुख यांचे ज्येष्ठ चिरंजीव देशमुख उपस्थित होते.
सावनेरवरून परत आल्यानंतर अजित पवार यांचे प्रेमनगर परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका आभा पांडे यांच्या प्रभागात कार्यक्रमात पोहोचण्याआधी अचानकच नितीन गडकरी यांना भेटण्यासाठी गेल्याची माहिती आहे. नितिन गडकरी यांनी मागील वर्षी रस्ते विकासासाठी केंद्राच्या निधीतून महाराष्ट्राला चांगला वाटा दिला होता. या वर्षी त्यांच्याकडून तसाच सहकार्य मिळावे. याबद्दल त्यांची भेट घेतल्याची माहिती अजित पवार यांनी दिली आहे.
रेल्वे ओव्हरब्रिज तसेच रेल्वे अंडरब्रीज संदर्भात काही निधी नितीन गडकरी यांच्या विभागाकडे असून त्याची आम्हाला माहिती मिळाल्यावर महाराष्ट्रातील सर्वच विभागातील रेल्वे ओव्हर ब्रिज आणि अंडर ब्रिज या निधीतून व्हावे ही मागणी ही त्यांच्या समोर ठेवली आहे. तसेच जीएसटीमध्ये महाराष्ट्राच्या वाट्या संदर्भातही त्यांच्याशी सकारात्मक बोलणं झाल आहे असे अजित पवार म्हणाले.
दिवसभराच्या कार्यक्रमात कुठेही नितीन गडकरी यांची भेट घेण्याचे नियोजित नसताना अजित पवार त्यांना भेटल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला ऊत आला आहे. राज्याच्या राजकारणात सध्या अनेक वाद रोज निर्माण होत असताना अजित दादांनी गडकरी यांची भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा होणार हे निश्चित आहे.
संबंधित बातम्या :























